कोरोना गुजरात: 'माझ्या बहिणीचं कुटुंब माझ्या डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत होतं अन् मी काहीच करू शकलो नाही'

- Author, रॉक्सी गागडेकर छारा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
खुशाली तमाईची… माझी भाची… बारावीचा निकाल हाती आला आणि तिचा बांध फुटला… तिच्या वर्गातून फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी ती एक होती.
मात्र, निकाल घेताना वडिलांचा चेहरा तिच्या नजरेसमोरून जात नव्हता. उमेश तमाईची… खुशालीचे वडील. या दिवसाची ते किती आतुरतेने वाट बघत होते. तो दिवस उजाडला. मात्र, मुलीचं कौतुक करायला ते या जगात नव्हते. काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.
उमेश 44 वर्षांचे होते. अहमदाबाद मेट्रो कोर्टात ते वरिष्ठ वकील होते. 12 मे रोजी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे रिपोर्ट आले. 11 मे रोजी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझी बहीण शेफाली त्यांना घेऊन जवळच्याच आनंद सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गेली. हे हॉस्पिटल त्या भागात बरंच नावाजलेलं आहे आणि काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद महापालिकेने या हॉस्पिटलला कोव्हिड हॉस्पिटल घोषित केलं होतं.
शेफालीने मला हॉस्पिटलमधून कॉल केला आणि सगळी परिस्थिती सांगितली.
हा फोन माझ्यासाठी धक्कादायक होता. कारण कोरोना आता माझ्या दारापर्यंत येऊन ठेपला होता. जवळपास महिनाभर घरात थांबल्यानंतर मी पहिल्यांदाच आउटडोअर शूटसाठी घराबाहेर पडलो होतो आणि सुरेंद्रनगरच्या लिमडीतून घरी परत येत असताना मला बहिणीचा फोन आला होता. तिने सांगितलं उमेश यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे ते संशयित कोरोना रुग्ण असल्याची शंका माझ्या मनात डोकाऊन गेली.
मी शेफालीला शांत केलं. धीर दिला आणि त्यानंतर आनंद सर्जिकल हॉस्पिटलमध्ये काही कॉल केले. मात्र, सर्वांनी मला एकच सांगितलं की त्यांचं हॉस्पिटल कोव्हिड हॉस्पिटल म्हणून घोषित केलं असलं तरी त्यांच्याकडे स्वतंत्र आयसोलेशन रूम नाही, व्हेंटिलेटर्स नाहीत आणि कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठीचे डॉक्टर्सही नाहीत.
मी शेफालीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. ती एकापाठोपाठ एक अनेक हॉस्पिटलमध्ये गेली. मात्र, कुठल्याही हॉस्पिटलने त्यांना किमान प्राथमिक उपचारही दिले नाही.
त्याच भागातल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शेफालीने खूप विनवण्या केल्या. त्यांना नेमकं काय झालं आहे, हे कळावं म्हणून किमान एक्स रे तरी काढा, अशी विनंती केली. तेव्हा त्या हॉस्पिटलमने उमेश यांच्या छातीचा एक्स-रे काढून दिला.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

माझी बहीण शेफाली तमाईची भारतातल्या एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत जनरल मॅनेजर आहे. कुबेरनगरच्या चारनगरमध्ये हे कुटुंब राहतं. हा भाग मुंबईतल्या धारावीचं छोटं रूप म्हणता येईल.
दाटीवाटीने उभी असलेली घरं, चिंचोळ्या गल्ल्या, घाणीचं साम्राज्य, पाणी, स्वच्छतागृह अशा सोयी नाही आणि कुठल्याही पूर्वनियोजनाशिवाय बांधलेली घरं. अवैध दारू तयार करण्यासाठी हा परिसर बदनाम आहे. मध्यमवर्ग या वस्तीकडे तुच्छ नजरेने बघतो. आम्ही दोघेही चारनगरमध्ये एकत्रच लहानाचे मोठे झालो. मात्र, पुढे मी दुसऱ्या भागात शिफ्ट झालो. शेफालीने मात्र, तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.
उमेश आणि शेफाली दोघांनीही बरेच कष्ट उपसले आणि चारनगरमधल्या नवखोलीमध्ये घर बांधलं. त्यांना दोन मुली आहेत आणि दोघीही इंग्रजी शाळेत शिकतात. एका अशा परिसरात जिथे मुलींच्या शिक्षणावर पैसा खर्च करणं योग्य मानलं जात नाही, तिथे ही मोठी गोष्ट होती. थोरली मुलगी खुशालीने बारावीची परीक्षा दिली होती आणि ती NEET ची तयारी करत होती. तर धाकटी उर्वशी 15 वर्षांची आहे. तिने दहावीची परीक्षा दिली होती. तिला पुढे वडिलांसारखं वकील व्हायचं आहे.
एक्स-रे मिळाल्यानंतर शेफालीने मला कॉल केला आणि सांगितलं की रेडियोलॉजिस्टच्या मते हा कोरोना असण्याची शक्यता आहे. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच मी कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे सज्ज आहे, यावर एक स्टोरी केली होती.
त्यासाठी मी आरोग्य संचालक जयप्रकाश शिवहरे आणि तत्कालीन अहमदाबाद जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय निरीक्षक जी. एच. राठोड यांची मुलाखतही घेतली होती. त्यावेळी बोलताना हे दोन्ही अधिकारी म्हणाले होते की कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. अहमदाबाद जिल्हा रुग्णालयात उत्तम दर्जाचे व्हेंटिलेटर्स आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे.

त्यावेळी मला ही स्टोरी आठवली आणि मी शेफालीला उमेश यांना घेऊन प्राथमिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. इतर कुठल्याही हॉस्पिटल्सच्या ओपीडीप्रमाणे या हॉस्पिटलमध्येही कोरोनाग्रस्तांची मोठी गर्दी होती. शेफाली तिथे पोहोचण्याआधीच मी वैद्यकीय निरीक्षक आणि संबंधित डॉक्टरांना कॉल केला होता. आम्ही रुग्णाला बघून हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं की नाही हे ठरवू, असं त्यांनी सांगितलं.
छातीचा एक्स-रे बघितल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना भर्ती होण्याचा सल्ला दिला. त्यांना आधी संशयित रुग्णांच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये त्यांना हलवण्यात आलं.
हॉस्पिटलमध्ये उमेश यांना योग्य उपचार मिळणार नाही, अशी काळजी मला वाटत होती. मी उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांना फोन केला. तेच गुजरातचे आरोग्यमंत्रीही आहेत. त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर डॉक्टरांनाही फोन करून उमेश यांची सर्व काळजी घ्यायला सांगितलं.
सर्वसामान्यपणे असा नियम आहे की रुग्णाची परिस्थिती कशी आहे, याची माहिती डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना कळवतात. मात्र, आम्हाला कुणाचाच फोन आला नाही.
मंगळवारी दुपारी उमेश यांची प्रकृती अधिक ढासळली. तेव्हा त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात त्यांना योग्य उपचार मिळत असतील, त्यांची काळजी घेतली जात असेल, याबाबत मला शंका होती. त्यामुळे मी त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत होतो.
मी स्टरलिंग हॉस्पिटलला संपर्क केला. स्टरलिंग हेसुद्धा कोव्हिड हॉस्पिटल आाहे. त्यांना संपर्क करणंही सोपं नव्हतं. मला उत्तर मिळालं की हॉस्पिटल फुल आहे. त्यानंतर मी HCG हॉस्पिटलला फोन केला. त्यांनीही हॉस्पिटल फुल असल्याचं सांगितलं. त्यानंतर चंदखेडामधल्या SMS हॉस्पिटलला कॉल केला. त्यांनी सांगितलं की जिल्हा रुग्णालयातल्या रुग्णाला घेणं नियमबाह्य असल्याने आम्ही तसं करणार नाही.
त्यानंतर सॅटेलाईट भागातल्या तपन हॉस्पिटल, सायंस सिटी रस्त्यावरचं CIMS हॉस्पिटल त्यानंतर रखिलातलं नारायणी हॉस्पिटल सर्वांना फोन केले. मात्र, त्यांनी माझ्या एकाही कॉलला उत्तर दिलं नाही. थोडक्यात काय तर एका बेडसाठी मी शहरातल्या अनेक खाजगी हॉस्पिटल्सना फोन केले. पण संपूर्ण शहरातल्या एकाही हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नव्हता.

त्यानंतर मी माझ्या काही सहकाऱ्यांना फोन केले. आरोग्य बीट सांभाळणारे पत्रकार, गुन्हेगारी बीट सांभाळणारे पत्रकार, अशा सर्वांना कॉल केले. त्या सर्वांनीही खूप प्रयत्न केले. पण 12 आणि 13 मे या दोन्ही दिवसात त्यांनाही एकाही हॉस्पिटलने होकार दिला नाही. कुठेही एकही रुम शिल्लक नव्हती.
मी महापौरांना कॉल केला. त्यांनी मला सांगितलं की खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं अवघड आहे. त्या म्हणाल्या की त्या जिल्हा रुग्णालयातल्या निरीक्षकांशी बोलतील आणि उमेश यांना योग्य उपचार मिळतील, याची खबरदारी घ्यायला सांगतील. मला वाटतं त्यांनी तसं केलंही असणार.
जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळणार नाही. तेव्हा मी जिल्हा रुग्णालायत उमेश यांना कशाप्रकारे चांगले उपचार मिळू शकतील, यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. माझ्या अनेक पत्रकार मित्रांनीही सांगितलं की याक्षणी जिल्हा रुग्णालयच उत्तम पर्याय आहे.
मी या कोव्हिड हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांशी बोललो. त्यांनीही सुरुवातीला तीन दिवस माझ्या कॉलला उत्तर दिलं. मात्र, तरीही उमेश यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. बाह्य ऑक्सिजन पुरवठ्याची गरज वाढत होती.
उमेश यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर नेण्याआधी मला डॉ. कमलेश उपाध्याय या डॉक्टरांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांचा श्वासोच्छावस अजूनही पूर्ववत झालेला नाही त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर हलवावं लागणार आहे. त्यांनी व्हिडियो कॉलवर मला दाखवलं की उमेश यांना ऑक्सिजन घेण्यासाठी किती त्रास होतोय. त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांनी हातवारे करून फक्त एवढंच सांगितलं की त्यांना श्वास घेता येत नाहीय.
एक सुदृढ आणि तंदुरुस्त व्यक्ती, जी नियमित व्यायाम करायची, ज्याची शरीरयष्टी बळकट होती, ज्याला कुठलाच आजार नव्हता, जिचा औषधोपचारांपेक्षा इच्छाशक्तीवर जास्त विश्वास होता तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की एका परकीय भूमीतला एखादा अनोळखी विषाणू त्यांना अतिदक्षता विभागातल्या बेडवर नेऊन ठेवेल आणि चटणी, भाकरी आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्याऐवजी त्यांना काही मिलीलीटर ऑक्सिजनसाठी संघर्ष करावा लागेल. ते मनाने ढासळलेले, कमकुवत आणि कोरोनाविरोधातली लढाई जवळपास हरल्याचं दिसत होते. त्यांना म्हणायचं होतं की तुम्हाला करता येईल ते सगळं करा पण मला माझ्या कुटुंबाकडे परत पाठवा.
त्यांचं कुटुंब तर दुसऱ्याच आघाडीवर लढत होतं. शेफाली चार समाजातली एक शिकलेली मुलगी होती. ती एक खंबीर स्त्री होती. आपल्या स्वप्नांसाठी तिने निकराचा लढा दिला होता.

अशा खंबीर स्त्रिला खचून गेलेली बघणं खूपच दुर्दैवी होतं. कुठल्याही भावाला आपल्या धाकट्या बहिणीची अशी अवस्था झालेली कशी बघवेल? ती खचली होती, घाबरली होती आणि आता तर तिची प्रकृतीही ढासळत चालली होती.
घराजवळच कुटुंबातले बरेच जण राहयाचे. पण कुणीही तिचं सांत्वन करायला, तिला धीर द्यायला तिच्या घरी जाऊ शकत नव्हतं. घरात ती तिच्या दोन मुलींबरोबर एकटीच होती. दोन्ही मुलींना काही दिवसांपूर्वीच उमेशला 'Best Pop' असं एक ग्रीटिंग कार्ड दिलं होतं. त्यांनी ते फार कौतुकाने घराच्या ड्राईंग रुमच्या भिंतीवर लावलं होतं.
एकीकडे उमेशवर उपचार सुरू होते तर त्यांच्या थेट संपर्कात असल्यामुळे घरातल्या सर्वांचीच कोव्हिड चाचणी करून घ्यावी, असा शेफालीचा प्रयत्न सुरू होता. शेफालीला उच्चरक्तदाब आणि मधुमेह दोन्ही त्रास आहे. तिने 104 या हेल्पलाईनवर कॉल करून कोव्हिड चाचणी करायची असल्याचं सांगितलं.
मीही अनेक अधिकाऱ्यांना फोन करून तिची कोव्हिड चाचणी करा, म्हणून विनंती करत होतो. पण माझ्या प्रयत्नांना काही यश येत नव्हतं. मी सर्वात वरच्या पदावरच्या अधिकाऱ्यांशी बोलेपर्यंत तीन दिवस तिची चाचणी झालीच नाही. तिला मधुमेह असल्याने कोव्हिडची लागण झाली तर गुंतागुंत वाढेल, असी भीती आम्हाला होती.
सरकारी अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्ही नेमून दिलेल्या खाजगी लॅबमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. खाजगी हॉस्पिटलमध्ये चाचण्या होणार नाही, हा सरकारी आदेश तोवर आलेला नव्हता. लॅबने आम्हाला डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आणायला सांगितलं.
कमी उत्पन्न असणाऱ्या तिच्या भागातल्या डॉक्टरांनी आपलं क्लिनिक बंद केलं होतं. तोवर मी ज्या भागात राहतो त्या घातलोडिया भागातल्या एका खाजगी डॉक्टरांकडून प्रिसक्रिप्शन मिळवलं आणि लॅबमध्ये गेलो तर लॅबने सांगितलं की यापुढे सॅम्पल्स घ्यायचे नाही, असे सरकारचे आदेश आलेत.
खाजगी लॅबमध्ये जाण्याच्या एक दिवस आधी ती घराजवळच्या आरोग्य केंद्रात गेली होती. मात्र, तिथेही लांबच लांब रांग होती आणि आरोग्य कर्मचारी मोजकेच होते. ती आपल्या दोन्ही मुलींसोबत कर्मचाऱ्यांची वाट बघत तिथेच उभी राहिली. मात्र, उपयोग झाला नाही. शेवटी ती परतली आणि त्यानंतर खाजगी लॅबमध्ये चाचणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

तिचं दुःख बघून मी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना टॅग करून तिची परिस्थिती सांगितली. तिला चाचणी करण्यातही किती अडचणी येत आहेत, ते सांगितलं. माझं ट्वीट अनेकांनी रिट्वीट केलं. पण आम्हाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ट्वीट करण्यामागचा माझा हेतू सरकारच्या प्रयत्नांवर बोट ठेवणं हा नसून एक कुटुंब म्हणून आम्हाला कशा अडचणींचा सामना करावा लागतोय, हे सांगणं होतं.
अखेर माझ्या ऑफिसच्या एका सहकाऱ्याच्या मदतीने 15 तारखेला शेफालीची चाचणी झाली. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले. त्यात शेफाली आणि तिची धाकटी मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
16 मे रोजी दुपारी 4 ची वेळ होती. शेफाली 108 क्रमांकाच्या अॅम्ब्युलंसमध्ये बसली. मी माझ्या कारने अॅम्ब्युलंसच्या मागे होतो. सायंस सिटी रस्त्यावरच्या CIMS हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं होतं. माझ्या एका सहकाऱ्याच्या मदतीने त्या हॉस्पिटलमध्ये तिची व्यवस्था करण्यात आली.
रस्त्यात जिल्हा रुग्णालयासमोरून जाताना माझ्या एका नातलगाचा फोन आला आणि त्यांनी मला उमेशची प्रकृती कशी आहे, याची विचारपूस करायला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की मी सकाळपासून डॉक्टरांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. पण कुणीही उत्तर देत नाहीय. आत काय सुरूय काही कळायला मार्ग नाही. त्यांनी सांगितलं की सकाळीच उमेश यांचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलंय.
मी काहीच बोलू शकलो नाही. काहीच विचार करू शकलो नाही. काहीच करू शकलो नाही. मी अॅम्ब्युलंसच्या मागे होतो आणि त्यामुळे कारही थांबवता येत नव्हती. मी सगळा धीर एकवटून डॉ. कमलेश उपाध्याय यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की आज त्यांची शिफ्ट नव्हती. त्यामुळे उमेश यांची प्रकृती कशी आहे, याची त्यांना कल्पना नाही. हे उत्तर अनपेक्षित होतं. एव्हाना मला कळून चुकलं की उमेश यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून मी चूक केली आहे.
मी आणखी काही कॉल केले. डॉ. मैत्रेय गुज्जर यांना कॉल केला. त्यांनी सांगितलं की उमेश यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. मात्र, हे मला सांगण्याची तसदी डॉक्टरांनी घेतली नाही. जोवर मी संध्याकाळी 5 वाजता कॉल केला नाही. तोवर मला कुणीच हे सांगितलं नाही.
त्यावेळी माझी काय अवस्था झाली होती, याचा कल्पनाही करू शकत नाही. कोरोना विषाणूने एक कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं. शेफालीची अॅम्ब्युलंस CIMS हॉस्पिटलला पोचली.
तिच्या नवऱ्याच्या निधनाची बातमी तिला सांगणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं. ज्या माणसाने तिच्यावर आयुष्यभर प्रेम केलं त्याच्या वाटेला एकाकी मरण आलं होतं. इतकंच नाही तर बऱ्याच तासांपासून त्याचं पार्थिव तिथेच होतं. कुणाचंच त्याकडे लक्ष नव्हतं. पण, मला हे सांगणं भाग होतं.
अॅम्ब्युलंस तिला घरी सोडायला तयार नव्हती. खाजगी गाडी नव्हती आणि मीही तिला माझ्या कारमध्ये बसवू शकत नव्हतो. तिला घरी परत नेणं अवघड होतं. मी तिला खोटं सांगितलं की हॉस्पिटलने आता भर्ती करून घ्यायला नकार दिला आहे. त्यामुळे आपल्याला आता घरी जावं लागणार आहे. उद्या पुन्हा येऊ. मी एक स्कूटर मिळवली आणि तिला घरी परत जायला सांगितलं. मी तिच्या मागे होतो. ती घरी पोहोचली तेव्हा तिला उमेशच्या निधनाची बातमी सांगितली.
ती किंचाळत होती, रडत होती. थोड्या वेळाने थोडं शांत होत मला म्हणाली, "दादा, तू म्हणाला होतास उमेश घरी परत येतील. माझा उमेश कुठे आहे?"
गेल्या 20 वर्षांत तिने जो संसार उभा केला होता तो कोरोना विषाणूने अवघ्या तीन दिवसात उद्ध्वस्त केला होता. ती एकटी पडली होती. माझ्या बुद्धीमत्तेवर, माझ्या हुशारीवर तिने विश्वास ठेवला होता की मी तिचा नवरा तिला परत आणून देईल. पण मी सपशेल अपयशी ठरलो होतो.
गेल्या 20 वर्षांपासून मी या शहरात पत्रकारिता करतोय. राज्यातल्या मोठ्यातले मोठे पदाधिकारी, राजकीय नेते या सर्वांना मी ओळखत होतो. ज्या गोष्टी सहज व्हायला हव्या होत्या, त्यासाठी मी कितीतरी वेळा कॉल केले होते, यामुळे मला खूप हतबल वाटू लागलं होतं, संकोच वाटत होता. अहमदाबाद शहरात कोरोनाने जे थैमान घातलं होतं त्यापुढे माझ्या सगळ्या ओळखी, माझी पत्रकारिता सगळं निकामी ठरलं होतं.
उमेश यांच्या मृत्यूच्या 20 दिवसांनंतरही मला अजूनही कळलेलं नाही की त्यांच्यावर कोणते उपचार करण्यात येत होते? किती वाजता त्यांचा मृत्यू झाला? त्यांना वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी डॉक्टरांनी कोणते प्रयत्न केले? त्यांना कोणतं व्हेंटिलेटर लावण्यात आलं होतं? ते धमन-1 व्हेंटिलेटर होतं का, ज्यावरून सध्या शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. हे व्हेंटिलेटर नाही, ही फसवणूक आहे, असा आरोप सध्या होतोय.
अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. पण मी आणि माझी बहीण त्या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. उमेश यांचा मोबाईल फोनही हरवला, सिम कार्ड हरवलं आणि त्यांच्या हातातलं घड्याळही हरवलं आहे. त्याचंही उत्तर जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांकडे नाही. कदाचित त्यांच्या मृतदेहावरून कुणीतरी ते चोरलं असण्याची शक्यता आहे.
मी ज्यांना कुणाला हे सगळं सांगितलं तो प्रत्येकजण मला म्हणाला की विचार करा तुमच्याबाबतीत असं घडलं तिथे सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल. अशी माणसं ज्यांच्या ओळखी नाहीत त्यांना आणि त्यांच्या नातलगांबाबत काय घडत असेल.
अहमदाबाद शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मात्र, हॉस्पिटल्समध्ये बेड कमी पडत आहेत. सध्या ज्यांना लक्षणं असतील त्यांचीच कोव्हिड चाचणी होतेय. म्हणजेच आज अशी परिस्थिती आहे की ज्या ज्या लोकांची चाचणी होतेय त्या सर्वांना बेड आणि डॉक्टरची गरज आहे. पण शहरात अतिरिक्त बेड आणि अतिरिक्त डॉक्टर्स नाहीत.
अहमदाबादमधील परिस्थिती भयानक आहे.
मी या सर्व परिस्थितीचा सामना केला असल्याने अनेकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून देण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे मला रोज अनेकांचे फोन येत आहेत. नुकताच मला 60 वर्षांचे सुरसिंग बजरंगी भेटले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या मुलानेही त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी अनेक हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले.
कुणाचाही सरकारी हॉस्पिटलवर विश्वास नसल्याचं वाटतंय. मीही अनेक हॉस्पिटल्सना कॉल केला. अखेर आश्रम रस्त्यावरील सेव्हिअर खाजगी रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतलं.
मी ज्यावेळी हे लिहितोय त्यावेळी निकुल इंद्रेकर नावाच्या एका तरुण मुलाच्या आईला झायडस खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज रात्री त्यांच्या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट येणार आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यांनाही कोव्हिडसाठीच्या दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवावं लागणार आहे.
निकुलनेही आतापर्यंत अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये संपर्क केला. मात्र, एकाही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. त्याचा सरकारी हॉस्पिटलवर विश्वास नाही आणि खाजगी हॉस्पिटल्स म्हणतात की त्यांच्याकडे बेड नाही. त्यामुळे वाट बघण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही.
अहमदाबादमध्ये ही हतबलता रोज बघायला मिळते. अनेकांचा घरीच मृत्यू होतोय. कारण बेड्स उपलब्ध नाहीत. निकुल म्हणाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये माझ्या आईसाठी एक बेडही मिळू शकत नसेल तर अशा विकासाचा काय उपयोग?
शेफालीप्रमाणे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. पण परिस्थिती कशी हाताळावी, हे सरकारला कळत नसल्याचं चित्र आहे. यापेक्षा चांगले उपचार आणि सन्मानजनक मृत्यू, आपल्या सर्वांचा अधिकार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








