मुंबईतील बीकेसीच्या कोव्हिड-19 रुग्णालयात खरंच पाणी साचलं होतं का?

फोटो स्रोत, Mayank Bhagwat
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
मुंबईच्या बीकेसीत बांधण्यात आलेलं कोव्हिड रुग्णालय पुन्हा एकदा वादाचा मुद्दा बनलं आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईत दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झाला.
पहिल्या पावसातच बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयात पाणी साठलं, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.
किरीट सोमय्या यांनी याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि मुख्य सचिव अयोज मेहता यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे मुंबई महापालिका आणि एमएमआरडीए प्रशासनाने कोव्हिड रुग्णालयात पाणी साचल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्यांचे आरोपभाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरूवारी कोव्हिड रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले, "बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयात अनेक ठिकाणी आतमध्ये पाणी साचलं आहे. अजूनतर पहिला नाजूक पाऊस आहे. पावसाळ्यात मुंबईत मोठी भरती आणि पाऊस चार वेळा एकत्र येतात. आणि इथे पाणी भरलं आहे. अशा परिस्थितीत रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय म्हणजे गरीबांवर अत्याचार आहे.""अचानक २५० रुग्णांना या ठिकाणाहून शिफ्ट करण्यात आलं. रुग्णांना बरं-वाईट झालं असतं तर?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

MMRDAने आरोप फेटाळलेमात्र, किरीट सोमय्या यांचे आरोप पालिका आणि MMRDA प्रशासनाने फेटाळून लावलेत. याबाबत बीसीसीशी बोलताना एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले, "बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयात पाणी साचलं नाही. पाणी साचल्याची माहिती चुकीची आहे. रुग्णालयाला कोणत्याही स्वरूपाचं नुकसान झालेलं नाही. बीकेसीतील दुसऱ्या फेजच्या रुग्णालयाच्या बांधकामालाही सुरूवात करण्यात आली आहे.""या रुग्णालयाची क्षमता ८० किलोमीटर वेगाचे वारे झेलण्याची होती. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळ आलं तर याची काय परिस्थिती होईल याची आम्हाला साशंकता होती. म्हणून दोन दिवसाआधीपासून मजबूतीकरणाचं काम पूर्ण केलं होतं," असं MMRDAचे आयुक्त पुढे म्हणाले. तर, किरीट सोमय्यांच्या आरोपाबाबत बीबीसीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी, सोमय्यांनी त्यांना कोव्हिड रुग्णालयाच्या अवस्थेबाबत पत्र पाठवल्याचं मान्य केलं. मात्र, पालिका आयुक्तांनी सोमय्यांच्या आरोपावर बोलणं टाळलं.

किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर बीकेसीतील रुग्णालयाच्या कामाबाबत कौतुक करणारा व्हीडिओ टाकला होता. तो व्हीडिओ पालिका आयुक्तांनी बीबीसीसोबत शेअर केला. "दोन्ही वक्तव्य ऐकून तुम्हीच ठरवा, आणि निर्णय घ्या," असा मेसेज पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बीबीसीला पाठवला. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरूवारी एक व्हीडीओ शेअर करून बीकेसीच्या कोव्हिड रुग्णालयातील परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही ट्विटरवर फोटोच्या माध्यमातून लोकांना कोव्हिड रुग्णालयाला मोठं नुकसान झालं नसल्याचा दावा केला आहे.

फोटो स्रोत, Twitter
मुंबई महापालिकेने ट्वीटवर दिलेल्या माहितीनुसार, "निसर्ग चक्रीवादळामुळे बीकेसीतील जम्बो फॅसिलिटीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती खोटी आहे. रुग्णालयाचं स्ट्रक्टर एकदम सुस्थितीत असून, रुग्णालय मजबूत आहे. रुग्णालयाच्या बाहेरील कुंपणाचं किरकोळ नुकसान झालं आहे. संध्याकाळपासून येथील कार्य सुरळीतपणे सुरू केलं जाईल."कोव्हिड रुग्णालयाची चौकशी करा- सोमय्या"बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयाची परिस्थिती गंभीर आहे. कोव्हिड रुग्णालयाच्या बांधकामाचा निर्णय घेणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी मी मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. त्याचसोबत रुग्णालयाचं सेफ्टी ऑडीट केल्याशिवाय रुग्णांना इथे ठेवू नये," असं किरीट सोमय्या पुढे म्हणाले. बुधवारी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मुंबईसह, रायगड, पुणे या जिल्ह्याला झोडपलं. मुंबईत वाऱ्यांचा वेग ताशी १०० किलोमीटर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे पालिकेने बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयात दाखल रुग्णांना वरळीतील डोममध्ये तात्पुरत शिफ्ट केलं.

बुधवारी याबाबत माहिती देताना मुंबई महापालिका आयुक्त म्हणाले होते, "स्ट्रक्चरल इंजीनिअर्सच्या माहितीप्रमाणे १०५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असतील, तर सेंटरला धोका नाही. पण, आम्हाला १२०-१३० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही २१२ रुग्णांना वरळी डोममध्ये शिफ्ट केलं. चक्रीवादळ गेल्यानंतर एक-दोन दिवसात पुन्हा आम्ही रुग्णांना त्या सेंटरमध्ये पाठवू."राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील निसर्ग चक्रीवादळाबाबत जनतेला माहिती देताना बीकेसीतील रुग्णांना वरळीत शिफ्ट केल्याची माहिती दिली होती. येत्या काही दिवसात मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादाचा दुसरा अंक सुरू होण्याची शक्यात नाकारता येत नाही.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








