देवेंद्र फडणवीसः राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही, हे सरकार आपोआपच कोसळेल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1) राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही, हे सरकार आपोआपच कोसळेल - फडणवीस
"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी आणि सरकार स्थापन करावं, अशी आमची कोणतीही इच्छा नाही," असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिलीय.
फडणवीस पुढे म्हणाले, "आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन करोनाविरोधातील लढाई लढायची आहे. अशावेळी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी किंवा कोणतेही राजकीय संकट उभे राहावे, असे आम्हाला अजिबात वाटत नाही."
मात्र, यावेळी त्यांनी सरकारवर निशाणाही साधला.

फोटो स्रोत, Getty Images
"महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हे सरकार कसेबसे चालले आहे. त्यामुळे हे सरकार कुणी पाडण्याची गरज नसून ते आपोआपच कोसळेल," असं फडणवीस म्हणाले.
2) मोदी सरकार 2.0 साठी भाजपचं महिनाभर अभियान
केंद्रातील मोदी सरकारला उद्या (30 मे) एक वर्ष पूर्ण होईल. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात दुसऱ्यांदा केंद्रात भाजपनं सत्ता स्थापन केली. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाची वर्षपूर्ती भाजपकडून महिनाभर साजरी केली जाणार आहे. न्यूज 18 नं ही बातमी दिलीय.
भाजपकडून मोदी सरकार 2.0 च्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'डिजिटल रॅली' काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी भूपेंद्र यादव यांनी भाजप कार्यकर्त्यांनी कोरोना व्हायरसदरम्यान केलेल्या कामाचीही माहिती दिली.
यादव यांच्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांनी 19 कोटी फूड पॅकेट्स आणि चार कोटींहून अधिक रेशन पॉकेट्सचं वाटप केलं.
3) काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास आनंदच - पटोले
काँग्रेसचं अध्यक्षपद महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, त्यावर अधिकृतरित्या कुणीही बोलण्यास तयार नव्हते. अखेर नाना पटोले यांनी 'पुढारी' वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं की, "पक्षानं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर आनंदच होईल."
पक्षानं जबाबदारी दिल्यास, त्या पदाला योग्य तो न्याय देऊ, असंही नाना पटोले म्हणाले. मात्र, पक्षात सध्या असा कोणताच विचार केला जत नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

फोटो स्रोत, FACEBOOK/NANA PATOLE
विशेष म्हणजे, परवापासून नाना पटोले हे दिल्लीत आहेत. त्यामुळे काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चांनी आणखीच जोर धरला होता.
4) मुंबई अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण
मुंबईत कुठेही आगीची घटना घडल्यास प्राणाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील 41 जणांना कोरोनाची लागण झालीय. 'आपलं महानगर'नं ही बातमी दिलीय.
या 41 कोरोनाग्रस्तांमध्ये अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
दोन कोरोनाग्रस्त जवानांनी आपला प्राणही गमावला आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

41 जणांपैकी 22 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, चार जण आयसीयूत आहेत, तर 14 जण कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.
5) एक जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता - IMD
अगदी दोनच दिवसात म्हणजे एक जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवलीय. झी न्यूजनं ही बातमी दिलीय.
मालदीवमध्ये तर यंदा मान्सून अंदाजित वेळेच्या आधीच पोहोचणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. तसंच, कोमोरिन, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि अंदामान समुद्रा या ठिकाणीही मान्सूनचं आगमन लवकर होईल.

फोटो स्रोत, NITESH RAUT
मान्सूच्या आगमनाची चाहुल लक्षात घेता, केरळ सरकारनं मासेमारी करण्यास समुद्रात जाण्यास बंदी आणली आहे. जे आधीच मासेमारीसाठी समुद्रात गेलेत, त्यांनाही आज रात्रीपर्यंत परतण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








