संजय राऊत: सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत का?

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येण्यासाठी सर्वाधिक मेहनत घेणाऱ्यांमध्ये सामनाचे संपादक आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र, आज मुंबईतल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती सर्वत्रच चर्चेचा विषय बनली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
संजय राऊत यांचे धाकटे बंधू आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
संजय राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आणि मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांची वर्णी या सगळ्या नाट्यमय घडामोडी तमाम महाराष्ट्राने पाहिल्या. या नाट्यमय घडामोडी घडताना माध्यमांमध्ये संजय राऊत यांचं नाव सातत्याने चर्चेत होतं.
महिनाभर चाललेल्या या सत्तापेचात संजय राऊत आजच्या घडामोडीनंतर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. या सत्तापेचातच आजारी पडल्यानंतर त्यांच्या आजारपणाचीही तितकीच चर्चा झाली.
एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले त्यांचे चांगले संबंध याचा त्यांना सत्ता स्थापनेच्या नाट्यात चांगला उपयोग झाल्याचंही दिसून आलं. महाविकास आघाडीच्या सत्त वसवण्याच्या सारीपाटात केंद्रस्थानी असलेले संजय राऊत आज मात्र सत्ताविस्तार सोहळ्यात अनुपस्थित आहेत आणि हाच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय.
सुनील राऊतांना मंत्रीपद न दिल्याने नाराजी?
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत 6 मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. उरलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज सोमवारी पार पडला. आजच्या विस्तारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून एकूण 36 आमदारांचा शपथविधी आज पार पडला. यात अनेक तरुण चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

फोटो स्रोत, Sunil Raut/Facebook
आदित्य ठाकरे यांची देखील कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. तर, शिवसेनेतल्या अनेक माजी मंत्र्यांना यावेळी डच्चू मिळाला आहे. तर, अनेकांना मंत्रिपद नव्याने मिळेल अशी चर्चा शक्यता असताना त्यांचं नाव अंतिम यादीत आलेलं नाही. विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत त्यांच्यापैकी एक आहेत.
'माझ्या नाराजीची बातमी ही अफवा'
या प्रकरणी बीबीसी मराठीने संजय राऊत यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नाही. किंवा कधीही जात नाही. फक्त एक महिन्यापूर्वी जेव्हा एक महिन्यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली तेव्हा मी तिथे हजर होतो. तेव्हा तर मी आजारी होतो. तरी मी तिथे हजर होतो. त्यानंतर आणि त्याआधी मी कधीही अशा कार्यक्रमाला गेलो नाही. मला अनेक सरकारी कार्यक्रमाला बोलावलं जातं. पण मी कधीही जात नाही. कारण तो माझा पिंड नाही आणि तो माझा स्वभावही नाही."
सुनील राऊत नाराज आहेत का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की 175 आमदारांची चर्चा होती. पण सगळ्यांना मंत्रिपदं मिळणं शक्य नाही. "आज 36 मंत्र्यांपैकी 12 मंत्र्यांना शपथ दिली. त्यातही तीन अपक्ष होते. त्यामुळे नऊ मंत्र्यांना शपथ देताना किती कसरत करावी लागते याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे नाराज व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही. सुनील राऊत यांच्यासारखे अनेक आमदार आहे ज्यांना संधी मिळायला हवी होती असं वाटतं. पण प्रत्येकाला संधी मिळत नाही. दिवाकर रावते, रामदास कदम यांनाही संधी मिळाली नाही. आघाडीच्या राजकारणात अशा तडजोडी कराव्या लागतात. " ते पुढे म्हणाले.
सुनील राऊत हे संजय राऊत यांचे भाऊ असल्याने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र, त्यांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीत न आल्याने त्यांचे मोठे बंधू संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. आजच्या मंत्रिमंडळ शपथविधीला ते अनुपस्थितीत राहिले.

फोटो स्रोत, Twitter
संजय राऊत नाराज आहेत का असा प्रश्न ANI वृत्तसंस्थेनं विचारलं असता त्यांच्याशीही बोलताना ते म्हणाले, "ही चुकीची बातमी आहे. मी आणि माझ्या कुटुंबानं सरकार बनवण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. ही अफवा कुणीतरी पसरवली आहे. मी नाराज नाही. तीन पक्षांचं हे सरकार असल्याने आमच्या वाट्याला कमी मंत्रिपदं आली आहेत.
"त्यामुळे प्रत्येकालाच संधी मिळणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी कधीच काही मागितलेलं नाही. माझा भाऊ सुनील याने देखील मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केलेली नाही. आम्ही मागणारे नसून आम्ही पक्षाला देणाऱ्या लोकांपैकी आहोत," असं राऊत म्हणाले.
'संजय राऊत नेतृत्वावर दबाव आणू पाहताहेत'
संजय राऊत यांनी ते नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, राजकीय वर्तुळात त्यांच्या अनुपस्थितीचे वेगळेच पडसाद उमटत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "संजय राऊत नाराज नसल्याचं सध्या सांगत असले तरी ते खरं नाही असं मला वाटतं. त्यांचं शपथविधीला उपस्थित न राहणं हे खूप बोलकं आहे. ते शिवसेना नेतृत्वावर या माध्यमातून दबाव आणू पाहत आहेत. मात्र, शिवसेनेत असला दबाव खपवून घेतला जात नाही आणि हे राऊतांनाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्यांचे सुनील राऊत हे राजीनामा देतील याची सुतराम शक्यता नाही. आगामी काळात हा मुद्दा लवकरच त्यांच्या पक्षात मिटवला जाईल आणि या चर्चा थांबतील असं मला वाटतं."
त्यामुळे संजय राऊत नाराज आहेत की नाही याबद्दल येणाऱ्या काळातल्या राजकीय घडामोडी अधिक प्रकाश टाकतील अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








