रत्नाकर मतकरी 'सोपं, सुबोध लिहिणं हे अवघड काम आहे,' असं का म्हणायचे?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचा आज (17 मे) स्मृतीदिन आहे.

सुमारे सात दशकं ते नाटक आणि लेखनाच्या क्षेत्रात कार्यरत होते. लहान मुलांसाठी, गावागावात, झोपडपट्टीतल्या मुलांपर्यंत नाटक जावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.

बालसाहित्यातील समग्र योगदानासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला हा संवाद आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

प्रश्न : बालसाहित्यातील समग्र योगदानासाठी पुरस्कार जाहीर झाल्यावर आपली दखल काहीशी उशिरा घेतली गेली, अशी प्रतिक्रिया आपण व्यक्त केली आहे...

खरंच आहे. दखल घ्यायला खुपच उशीर झाला आहे. मी बालसाहित्याच्या क्षेत्रात प्रवेश करून 40-45 वर्षे झाली. त्यातील नंतरची 30 वर्षे बालरंगभूमीसाठीही दिलेली आहेत.

70च्या दशकातील कामाची आता दखल घेतली जात आहे म्हणून उशीर झाला, असं म्हणायचं. या गतीने दखल घ्यायची म्हटलं तर मग इतर सगळ्या साहित्याची दखल घ्यायला दीडशे-पावणेदोनशे वर्षे लागतील असं मला वाटतं.

1959-60 च्या आसपास 'मधुमंजिरी' आणि 'कळलाव्या कांद्याची गोष्ट' या दोन नाटकांच्या लेखनाने मी सुधा करमरकरांच्या संस्थेसाठी काम सुरु केलं. तोपर्यंत लहानमुलांसाठी फुल लेंग्थ म्हणावित अशी नाटकं केलीच नव्हती. सानेगुरुजींनी अनुवादित केलेल्या नाटकाचा आणि एखाददोन नाटकांचा अपवाद सोडला तर पूर्णवेळाच्या बालनाटकांसाठी नंतरही कोणी फारसं काम केलेलं नाही.

नाटिका वगैरेंचे प्रयोग होत राहिले. पण प्रौढांच्या नाटकासारखी मोठी पूर्ण वेळाची नाटकं झाली नव्हती. सुधा करमरकरांची बालनाट्याबद्दलची भूमिका थोडी वेगळी होती. त्यांना ही नाटकं रिअ‍ॅलिस्टिक व्हावीत असं वाटायचं पण माझ्यामते नाटकांमधून मुलांच्या नाटकाला चालना मिळाली पाहिजे. त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर होईल असं नाटक व्हावे असं मला वाटायचं त्यामुळे 1962 साली बालनाट्यसंस्थेची स्थापना झाल्यावर 'निम्माशिम्मा राक्षस' हे पूर्णवेळ नाटक रंगभूमीवर आले. तत्पूर्वी मी काही नाटिकाही लिहिल्या होत्या. मात्र 'निम्माशिम्मा' नंतर पूर्णवेळ नाटकाचा प्रवास सुरू झाला.

प्रश्न :बालसाहित्य, लहान मुलांची नाटकं हा आपल्याकडे मोठ्या माणसांनी वाचायच्या साहित्याच्या आधी काढलेल्या पुस्त्या आहेत किंवा बालसाहित्य हे सुरुवातीला लिहायचे साहित्य आहे असा आरोप आपल्याकडे सर्रास केला जातो किंवा उपहासाने तसे बोलले जाते, याबाबत आपलं काय मत आहे?

हा अत्यंत चुकीचा आरोप आहे, बालनाट्य लिहिताना, ती सादर करताना माझं इतरही काम सुरुच होतं. मुलांचं नाटक लिहिणं हे मोठ्या माणसांच्या नाटकापेक्षा कठीण काम आहे. कारण लहान मुलांचं नाटक लिहिण्यासाठी एक व्हीजन असावी लागते. मुलं कशी विचार करतात हे तुम्हाला माहिती असायला लागतं. एवढं सगळं करुन मुलांचं रंजन ही करायचं असतं. दोन मिनिटंही नाटक कंटाळवाणं झालं की, मुलं चुळबूळ करतात.

प्रौढांमध्ये एकवेळ एकवेळ थोडं मागेपुढे झालेलं चालू शकतं. भाषा सोपी, सुबोध असावी लागते तसंच दर्जाही राखावा लागतो. आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे लहान मुलांच्या नाटकातून योग्य तो संस्कार करण्याची जबाबदारी असते. शिवाय ते केले जात आहेत हे जाणवताही कामा नये. प्रवचन दिलेलं चालत नाही.

उदाहरण द्यायचं झालं तर 'अलबत्या-गलबत्या'मधली चेटकी म्हातारी आहे म्हणून तुम्ही तिला हसू शकत नाही तर तिच्या मूर्खपणाच्या कारस्थानांना ती कशी फसली याला हसता. हा अप्रत्यक्षपणे केला जाणारा संस्कार आहे. या नाटकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतात. लहान मुलांच्या नाटकांमध्ये प्राण्याचं काम लहान मुलांनाच करावं लागायचं. पण मी ते नाटकातील आवश्यकतेनुसार बदललं. म्हणजे 'अलबत गलबत्या'मधल्या कुत्रयांचे काम रवी पटवर्धन, मधुकर नाईक, अजय वढावकर असत. लहान मुलांना मिशी लावून त्यांना मोठ्यांचं काम करायला लावायचं असं आम्ही केलं नाही.

प्रेक्षकांचा म्हणजे लहान मुलांचा सहभाग तर आम्ही आधीपासूनच ठेवलेला होता. एकवेळ मोठी माणसं प्रतिसाद द्यायला लाजतील पण मुलं आनंदानं प्रतिसाद द्यायची. या प्रयोगांची तेव्हा माधव कुलकर्णी, माधव मनोहर यांच्यासारख्या समीक्षकांनी दखल घेतली होती. विजय तेंडुलकरांनीही एका नाटकावर लिहिले होते.

मुलांची नाटकं लिहिणं अवघडच नाही तर जे लोक प्रौढांचं चांगलं लिहू शकतात तेच चांगले बालनाट्य लिहू शकतात. मोठ्या लोकांच्या नाटकाचे सगळे नियम येथे लागू आहेत. मुळात आधी चांगलं लिहिता आलं पाहिजे. मोठ्या माणसांचं लिहिता आलं नाही म्हणून बालकांचं लिहिलं असलं इथं चालणार नाही. फिचर फिल्म जमली नाही म्हणून डॉक्युमेंटरी करतो, तेही जमलं नाही तर आणखी काहीतरी करतो असं असलं तर काहीच नीट होणार नाही. जे हातात घेतलं ते पूर्ण ताकदीनं करावं लागतं.

प्रश्न: हेच लहान मुलांच्या गाण्याच्याबाबतीतही झालंय का?

अगदी. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकरांनी लहान मुलांसाठी उत्तम गाणी लिहून ती एका उंचीवर नेऊन ठेवली होती. पण मग त्यांचं बघून इतरांनीही सगळ्या प्राण्यांच्या शाळा वगैरे काढल्या, तेच गिरवण्याचा प्रयत्न केला. पण ते तसं होत नसतं. करंदीकरांच्या कवितेत एक इमॅजिनेशन होती, त्याला सांस्कृतिक संदर्भ होता.

प्रश्न:बालनाट्यसंस्थेसाठी तुम्ही शाळांमध्ये नाटक घेऊन गेलात, ते सगळं कसं आणि का केलंत?

बालरंगभूमी जगविण्यासाठी आम्ही शाळाशाळांमधून- गावांमध्ये गेलो. भरपूर अडथळ््यांचा सामना करत वर्षाला आम्ही शंभर-शंभर प्रयोग करत असू. प्रत्येक शाळेत स्टेज मिळेल असेलच नाही. लहान स्टेज असलं तरी ते मोठं कसं दिसेल, मुलांना थिएटर एक्स्पीअरन्स मिळाला पाहिजे असे प्रयत्न केले जात असे. पण काहीतरी तडजोड करुन त्या अनुभवात कमतरता येऊ दिली नाही.

प्रत्येक ठिकाणचं स्टेज शाम आडारकर किवां रघुवीर तळाशीकरला दाखवून त्याच्याप्रमाणे सेट तयार करत असू. जाता जाता काहीतरी करायचं असं कधीच त्यामागे नव्हतं. आनंदयात्री नावाच्या प्रकल्पात तर आम्ही सरळ ट्रकच्या दोन्ही बाजूंचे पाखे पाडून ट्रकचा उपयोग स्टेजसारखा करायचो.

प्रश्न:हे सगळं पुढे का थांबलं?

शाळाशाळांमध्ये जायची धडपड 30 वर्षे केल्यावर हे समाजालाच नकोय असं जाणवायला लागलं. सर्वत्र उदासिनता असल्याचा अनुभव यायचा. मग हे सगळं आपण कोणासाठी करतोय, आपल्यासाठी करतोय का असे प्रश्न मनात यायला लागले. बालनाट्यांचा उपयोग मुलांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी, अभ्यासक्रमात करता येईल असं सांगितलं तरी शाळा उदासीन राहायच्या.

शनिवारी नाटक ठेवू नका आम्हाला वह्या तपासायच्या असतात, रविवारी ठेवू नका आम्हाला एकच तर रविवार मिळतो अशी उत्तरं मिळत. अचानक एखाद्या प्रयोगाला मुलांची संख्या कमी व्हायची, तेव्हा त्याचं कारण विचारल्यावर शाळा सहज उत्तर देत, आज परीक्षा सुरु आहे... पण मग हे आम्हाला आधीच सांगितलं पाहिजे असं त्यांना वाटायचं नाही. अगदी सहजपणे ते सांगून टाकत.

भायखळ्याच्या एका इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका मिशनरी होत्या. त्यांनी 'निम्माशिम्मा राक्षस' पाहिल्यावर आम्हाला मुलांच्या अभ्यासक्रमात काही प्रयोग करण्यासाठी तुमची मदत लागेल असं सांगितलं होतं. पण त्या बदलून गेल्यावर त्यांच्या जागेवर एक मराठी बाई आल्या. त्यांनी लगेच सांगून टाकलं, की आम्ही नाटक वगैरे काही करत नाही.

काही शाळा निधी उभारण्यासाठी मोठ्यांची नाटकं लावतात आणि त्याची तिकिटं मुलांना खपवायला लावतात. दुर्दैवाने जगभरात एकूणच बालनाट्याबाबत फारच अनास्था आहे. बाकीच्या राज्यांमध्येही फारसं काही घडताना दिसत नाही. मात्र जर्मनीमध्ये ग्रिप्स थिएटरसारख्या काही ठिकाणी चांगलं काम होत आहे.

प्रश्न :झोपडपट्टीपर्यंत नाटक नेण्याचा प्रयोग तुम्ही केलात त्याबद्दल थोडे सांगा...

वंचितांचा रंगमंच ही संकल्पना झोपडपट्टीमधील मुलांसाठी सुरु केली. ज्या शाळा एकांकिकांमध्ये सहभागी होतात त्यांना शाळेच्या नाटकासाठी सेट, लाईट, मेक-अप, कपडे व्यावसायिक लोकांकडून जमवणं परवडत असतं. बरं त्यातील मुलांनाही स्वत:चं काही फारसं करता येत नाही. केवळ ठोकळ्यासारखं उभं राहायचं आणि ती चार वाक्य म्हणायची. पण झोपडपट्टीतल्या मुलांना तेही करायला मिळत नाही. म्हणून आम्ही झोपडपट्टीतल्या मुलांना तुम्हीच तुमचं नाटक बसवा असं सांगितलं. तुम्हीच विषय निवडा, ते लिहा आणि करा. आम्ही त्यात लुडबूड करणार नाही फक्त मदत करू असं सांगितलं.

अडखळत अडखळत का होईना ही मुलं 25-30 मिनिटांची नाटकं करु लागली. त्यात भरपूर पुनरावृत्ती असायची, रोबस्ट स्टाइल असायची पण ती मुलं मुद्दा पोहोचवायची. शिक्षणाची पैशाविना होणारी आबाळ, दारु पिऊन मारणारा बाप, त्यातही मुलीचे फीचे पैसे हिसकावून घेणारा बाप असे अनेक विषय त्यांच्या नाटकात आले. मोठ्या थिएटरमध्ये ज्यावेळेस या मुलांना नाटक करायला मिळाली तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. त्यांनी कधी थिएटर पाहिलेलंही नव्हतं इतके ते गरीब होते. ही सगळी मुलं गाड्या पुसणारी, कचरा गोळा करणारी, पेपर टाकणारी मुलं होती. पण 8 बाय 8 च्या झोपडीत राहाणाऱ्या मुलांनी स्वत:ची नाटकं उभी केली.

त्यानंतर आम्ही युवांसाठीही हा प्रयोग केला आणि तोही यशस्वी झाला. युवकांपाठोपाठ महिलांचे नाचक सुरु झाले. झोपडपट्टीतल्या मुली, महिलांनी अगदी बोल्ड विषय हाताळले. त्यांच्या नाटकांमध्ये घटस्फोटांपासून मासिक पाळीपर्यंत सर्व विषय आले. ते एकदम विचार करायला लावणारं होतं. युवकांच्या नाटकांमध्ये त्यांच्या आजूबाजूचे स्वच्छतेचे प्रश्न, तळं बुजवण्यापासून हिजड्यांच्या प्रश्नांपर्यंत विषय होते.

प्रश्न : प्रायोगिक नाटकांनी प्रेक्षकांच्या जवळ जावं असं तुमचं मत का आहे ?

हो, प्रायोगिक नाटकाचे कसेबसे काही प्रयोग होतात आणि लोक ते विसरुनही जातात. नाट्यगृहांचे भाडेही नाटकाला परवडणे शक्य नसते. त्यामुळे नाटकांनी सोसायट्यांमध्ये जावे. उदाहरणार्थ-ठाण्यासारख्या शहरांमध्ये मोठमोठ्या वसाहती आहेत. तेथे सदस्य तयार करुन प्रत्येक नाटकाला 50 जोडपी आली तरी सोसायटीच्या हॉलमध्ये, अ‍ॅम्फीथिएटर, स्टेजवर नाटकं होऊ शकतात, तेही नसेल तर गच्चीवर नाटक होऊ शकेल. पण नाटक व सोसायटी यांना जोडणारी तरुणांची एजन्सी आपल्याकडे नाही.

या मुलांनी वर्षभरात 5 ते 6 नाटकं दाखवण्यासाठी प्रत्येक सोसायटीत मेंबर करुन घेतले तरी पुरे. पण एरव्ही भरपूर वेळ वाया घालवणारे तरुण हे काम करत नाहीत. कारण प्रत्येकाला स्वत:ची अ‍ॅम्बिशन आहे. कोणाला नट व्हायचंय, कोणाला दिग्दर्शक, कोणाला निर्माता. काहीच झालं नाही तर मालिका, मग त्यात अडकून पडायचं. जर थिएटर जगलं तरच काम करणार ना. आम्ही बालरंगभूमी जगावी यासाठीच प्रयत्न केले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)