कोरोना वॉरियर्स : 'कधीतरी हे सगळं संपेल आणि मी परत घरी जाईन'

शरद उघाडे
फोटो कॅप्शन, शरद उघाडे
    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आपल्या स्वत:च्याच घरात दरवाजाबाहेर उभं राहून शरद उघाडे पत्नीकडे पाहून हसत होते. त्यांच्या पत्नीचा त्यादिवशी वाढदिवस होता. 8 मे रोजी त्यासाठीच ते घराबाहेर आले. पण घरात जाऊन पत्नीला साध्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही देऊ शकले नाहीत.

37 वर्षीय उघाडे जी साऊथ वॉर्डचे आयुक्त आहेत. कोरोनापासून संरक्षण कसं करावं याची माहिती ते सातत्याने लोकांना देत आहेत. त्यामुळेच ते 26 मार्चपासून आपल्या 150 सहकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये राहत आहेत.

मुंबईतील जी साऊथ वॉर्डात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आणि रुग्णसंख्या वाढू लागली. परिस्थिती आव्हानात्मक होती. जिजामाता झोपडपट्टी आणि जनता कॉलनी हे हॉटस्पॉट बनले. त्यामुळे संपूर्ण परिसर सील करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या ठिकाणी एक चौरस किलोमीटरमागे जवळपास 82 हजार रहिवासी राहतात.

29 मार्चला जी साऊथ वॉर्डकडे येणारे सर्व प्रवेश मार्ग आणि बाहेर पडणारे एक्झिट पॉईंट्स बंद केले. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली. पुढील पाच दिवसांत रहिवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. त्यांचं सर्वेक्षणही करण्यात येत होतं.

कोळीवाडा परिसरात अती आणि कमी धोका असलेले रहिवासी अशी विभागणी करण्यात आली. ज्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे अशांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत होते. या लोकांना सर्व वस्तू आवश्यक विलगीकरण कक्षात उपलब्ध करुन देण्यात आल्या.

कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखायचा कसा? ब्ल्यू प्रिंट, काही संदर्भ, एकसमान केसेस असं काहीच नव्हतं ज्यावरुन ठोस अशी कोणतीही रणनीती कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोनसाठी करता येऊ शकत होती. दाटीवाटीची वस्ती, निमुळते रस्ते, खिडकीतून हात बाहेर काढला तर समोरच्या घराच्या खिडकीत जाईल एवढं दोन घरांमधील अंतर.

धुळे जिल्ह्यातील एका झोपडपट्टीतच उघाडे लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील मिल कामगार होते. ते मोठ्या शिफ्ट्समध्ये काम करायचे. दहा बाय दहाच्या खोलीत ते राहत होते. त्यामुळे इथल्या लोकांना आपण मार्गदर्शन करू शकू असा विश्वास त्यांच्या मनात होता.

मला इथल्या समस्या माहीत आहेत, असं ते फोनवर म्हणाले.

झोपडपट्टी म्हणजे घनिष्ट संबंध आणि एका कुटुंबाचे दुसऱ्या कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध असं उघाडे सांगतात.

2012 मध्ये ते मुंबई महामगरपालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर रुजू झाले. देशातली सर्वांत मोठी झोपडपट्टी आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेली धारावी झोपडपट्टी त्यांच्या वॉर्ड अंतर्गत येत होती.

कोरोना व्हायरस

उघाडे यांच्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती नवीन नाही. यापूर्वीच्या पोस्टिंगमध्ये त्यांनी अंडरवर्ल्ड, माफिया यांचाही सामना केलाय. त्यामुळे या व्हायरसची भीतीही त्यांना नाही. "कोरोनासे जो डर गया, वह मर गया," असं ते म्हणाले आणि हसले.

पुढे त्यांनी एक शेर ऐकवला,

"कुछ इस हालात से गुजरी है जिंदगी इन दिनो,

अब जख्म तो होते है पर दर्द नहीं होता.

मंजिले तो हासिल होती है पर जश्न नहीं होता."

दाटीवाटीच्या वस्तीत प्रतिबंध

21 मार्चला मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. कोरोना व्हायरसचा प्रसार इतका वाढेल असं त्यावेळी आजिबात वाटलं नव्हतं. वरळीच्या वर्ल्ड टॉवरमध्ये परदेशातून आलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. त्यानंतर 27 मार्चला वरळी-कोळीवाड्यात 3 रुग्ण आढळले आणि तेव्हापासून वरळीत रुग्णसंख्या वाढत गेली.

एक चौरस किलोमीटर भागात जवळपास 80 हजार राहिवासी राहतात. त्यामुळे अपेक्षित सोशल डिस्टन्सिंग पाळणं जवळपास अशक्यच आहे. त्यांना कल्पना होती हे एखाद्या टिकिंग टाईम बॉम्बसारखं आहे.

"झोपडपट्टीची भौगोलिक रचनाच अत्यंत दाटीवाटीची असल्याने त्यांच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे सोशल डिस्टसिंग प्रत्यक्षात शक्य नाही," असंही ते म्हणाले.

मुंबईची लोकसंख्या सुमारे 2 कोटी इतकी असून हे देशातलं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. मुंबईतली बहुतांश लोक झोपडपट्टीत राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार मोठ्या शहरांपैकी मुंबईत सर्वाधिक झोपडपट्टया आहेत.

कोरोना व्हायरस

वरळी-कोळीवाड्यात दररोज रुग्ण वाढू लागले. रुग्णांना कोरोनाचा संसर्ग कसा झालाय याची कारणं अस्पष्ट होती. त्यामुळे वरळीत समूह प्रसार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अशाप्रकारे वरळी-कोळीवाडा मुंबईतील पहिला कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन ठरला.

29 मार्चला वरळी कोळीवाड्याच्या शेजारचा परिसर सील मुक्त करण्यात आला. हा निर्णय घेणं जिकिरीचं होतं. सकाळी 5 ते 8 दुधाचे वाटप सुरू केले. पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन दूध पोहोचवू लागले.

त्यांनतर मेडिकल स्टोअर्स सुरू करण्यात आली. लोकांना पैसे काढता यावे म्हणून कार्ड स्वाईप करण्यासाठी मशिन्स बसवण्यात आले. रेशन सुरू करण्यात आलं. त्यांच्याकडे तांदूळ, पीठ, तेल, चहा इत्यादींच्या 27 किट्स उपलब्ध होत्या.

कोरोना व्हायरस

"आम्हाला सहकार्य करण्यासाठी काही संस्था पुढे आल्या. सीएसआर प्रकल्पाच्या माध्यमातून ते मदत करत होते. आम्ही जेव्हा संपूर्ण परिसर सील केला तेव्हा जीवनावश्यक वस्तू कशा पोहोचवायच्या याचा आम्ही खरंच विचार केला नव्हता. कारण रुग्णसंख्येचा गुणाकार होत होता. जर आम्ही तेव्हा सील करण्याचा निर्णय घेतला नसता तर कोरोना व्हायरसचा प्रसार नियंत्रणाबाहेर गेला असता," असं उघाडे सांगतात.

इटली, चीन, इंग्लंड, न्यूयॉर्क या देशांमधली विदारक चित्रं त्यांनी टीव्हीवर पाहिली होती. पण तिथे इथल्यासारख्या दाट झोपडपट्ट्या नाहीत.

'गरोदर बायकोसाठी वेळ नाही'

या दिवसांत शरद उघाडे एकदाही घरी गेलेले नाहीत. त्यांच्या व्हॉट्सअप डीपीवर कधी त्यांच्या पत्नीचा फोटो असतो तर कधी त्या दोघांचा.

त्यांच्या पत्नी मयुरी उघाडे 33 वर्षांच्या असून त्या सहा महिन्याच्या गरोदर आहेत. त्यांना 9 वर्षांची मुलगी आहे. ती बाबांची खूप आठवण काढते. कधीतरी उघाडे घराखाली येऊन खिडकीबाहेरुन आवाज देतात. ते एकमेकांना असेच भेटतात. त्यांच्याकडे हसून पाहत निघून जातात. त्यांना माहितंय ते सध्या प्रचंड व्यस्त आहेत.

दहा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. वर्षभरातच त्यांना मुलगी झाली. त्यानंतर ते स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात व्यस्त झाले. त्यामुळे कुटुंबापासून दूर राहावं लागायचं. पण यावेळी एकमेकांसोबत वेळ घालवता येईल असं त्यांना वाटलं होतं.

"पण आता ते शक्य नाही. गेल्या काही वर्षांत अनेकदा आपतकालीन परिस्थितीला तोंड द्यावे लागले. पण यावेळची परिस्थिती अभूतपूर्व आहे." मयुरी सांगत होत्या.

कोरोना
लाईन

हॉटेलमध्ये रहायला जाण्यापूर्वी उघाडे घरातच वेगळे राहत होते. पण घरी राहणं आता सुरक्षित नसल्याने त्यांना घराबाहेर पडणं योग्य वाटलं.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांची मुलगी अवनी आनंदात होती. तिला वाटलं होतं आपले बाबा आता आपल्यासोबत वेळ घालवतील.

"तिला वाटलं व्हॅकेशन सुरू झालं. पण आता तिलाही कळालंय. जर कॉलनीत कुणी मास्क घातलं नसेल तर ती बाबांना फोटो पाठवते. आम्ही व्हिडिओ कॉलवरही बोलतो," असं मयुरी यांनी सांगितलं.

मयुरी कधीतरी त्यांना रगडा पॅटीस पाठवतात. ही त्यांची आवडती डिश असल्याचं सांगत त्या म्हणतात, "ते खूप मेहनती आणि समर्पण भावाने काम करतात. मला त्यांचा अभिमान आहे."

हॉटेलच्या खोलीत बसून उघाडे कधीतरी विचार करतात, हे सगळं कधी संपेल? पण हे सर्व लवकर संपणार नाही, याची त्यांना कल्पना आहे.

साखळी तोडण्याचे आव्हान

सुरुवातीपासूनच शेजारी काम करणाऱ्या 20 इंजिनिअर आणि डॉक्टरांच्या टीमने घरी न जाता हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना कोरोना व्हायरसची साखळी तोडायची होती. तसंच व्हायरस घरांपर्यंत पोहचणार नाही याचीही दक्षता घ्यायची होती.

त्यांच्यापैकीच एक डॉ. ओमकार छोछे. 31 वर्षीय डॉ. छोछे यांची पोस्टिंग जवळपास 40 हजार रहिवासी असलेल्या जिजामाता नगरला झाली.

स्थानिक संसर्गातून सार्वजनिक शौचालय वापरल्यामुळे तिथे पहिला रुग्ण आढळला.

कोरोना व्हायरस

यानंतरची पहिली पायरी होती कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्यांना शोधणे.

"झोपडपट्टी परिसरात तुम्ही किती जलद गतीने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधता यावर सर्वकाही अवलंबून होतं," असं डॉ. छोछे सांगतात.

या कामासाठी अनेकांनी मदत केली. यात 50 वर्षांवरील 10 सामाजिक आरोग्य स्वयंसेवकांचाही समावेश होता. घराघरात जाऊन रहिवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठीही त्यांनी मदत केली.

ते म्हणतात, "हे प्रेरणादायी चित्र होतं. प्रत्येक जण प्रचंड मेहनत करत होता."

डॉ. ओमकार छोछे
फोटो कॅप्शन, डॉ. ओमकार छोछे

ड्युटीवर गेल्यापासून डॉ. छोछे घरी परतलेले नाहीत. घरी त्यांचे आईृ-वडील आणि लहान बहीण असते. ते यावर म्हणाले, "मी थेट लोकांमध्ये काम करत असल्याने मला कधीही बाधा होऊ शकते. त्यामुळे संसर्गाचा धोका आपण घरी का घेऊन जायचा? अजूनही बरंच काम आहे. त्यामुळे परत घरी कधी जाईन कल्पना नाही."

'सार्वजनिक शौचालय वापरायची भीती वाटते'

2 एप्रिलला 25 वर्षांच्या तेजस मोहितेला ताप आला. आई आणि भावासोबत छोट्या खोलीत राहणाऱ्या तेजसला अस्वस्थ वाटू लागलं. तेजस विद्यार्थी असून ऑफीस बॉयचे कामही करतो.

दुसऱ्या दिवशी तेजस बाईकवर जवळच्या डॉक्टरांकडे गेला. पण डॉक्टर नव्हते. त्यामुळं तो नायर रुग्णालयात गेला. तिकडे त्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे 4 एप्रिलला निष्पन्न झाले.

जिजामाता नगरमध्ये सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्यांपैकी तेजस एक होता. तेजसचा रिपोर्ट येण्याआधी पालिका कर्मचारी त्याच्या घरी पोहचले. त्याच्या कुटुंबातील 12 जण आणि काही मित्रांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 जणांमध्ये लक्षणं दिसून आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात नेण्यात आले.

कोरोना व्हायरस

तेजस रुग्णालयात रडत होता. त्याने दोन मृत्यू पाहिले होते. मला मरायचे नाही असं तो रुग्णालयात ओरडून सांगत होता.

"मी रुग्णांना व्हेंटिलेटरवर लावले असल्याचे पाहिले. माझ्यासाठी हा सगळा अनुभव नवीन होता," तेजसने सांगितले.

त्याला अनेक वॉर्ड्स आणि रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर दोन आठवड्यांनी त्याला सोडण्यात आले.

तेजस सांगतो, "सर्वकाही वेगानं घडलं. पण आता मला कामावर रुजू होता येणार नाही. माझ्या आईचे कामही गेले. ती इतरांच्या घरात काम करत होती."

तेजस आता सार्वजनिक शौचालय वापरण्यासाठी घाबरत आहे. आता तो 3 रुपये देऊन खासगी शौचालयात जातो. तेही रात्री 12 नंतर किंवा दुपारनंतर. कारण यावेळी तिथं लोकांची गर्दी नसते.

तेजस मोहिते
फोटो कॅप्शन, तेजस मोहिते

2011 सालच्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील झोपडपट्टीतील 60 टक्के घरांमध्ये शौचालय नाही. नाईलाजाने रहिवाशांना सार्वजनिक शौचालय वापरावे लागत आहे.

वरळी कोळीवाड्याले वैद्यकीय अधिकारी देवेंद्र गोल्हार सांगतात, "आम्ही सर्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरूवात केली आहे. सगळीकडे आम्ही फवारणी करत आहोत."

पावसाळा तोंडावर आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनासोबतच डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांसाठीही सज्ज राहावं लागणार आहे.

आजारमुक्तीच्या दिशेने

15 मे रोजी जी साऊथ वॉर्डमध्ये 1146 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी झाली. 630 हून अधिक रुग्णांना आता सोडून देण्यात आलंय. म्हणजेच 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण बरे झाले आहेत. जिजामाता नगर आता कंटेनमेंट झोन नाहीय. कोळीवाड्यातील 70 टक्के रहिवाशांचा समावेश असलेल्या या ठिकाणी आता केवळ लॉकडाऊनचे निर्बंध लागू आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त आशुतोष सलील यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत बहुतांश लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहत असल्याने असे परिसर प्रतिबंधित करणे आणि तिथल्या लोकांचे विलगीकरण करणे हे आव्हानात्मक आहे.

कोरोना व्हायरस

"आम्ही विलगीकरणासाठी मोठ्या जागा उपलब्ध करुन घेतल्या आहेत. शाळा, हॉटेल्स ताब्यात घेतली आहेत. रेसकोर्स मैदानातही उपाययोजना करत आहोत. MMRDA मैदानावर 2 हजार बेड्सची व्यवस्था केली आहे. गोरगाव येथील नेस्को केंद्रही व्यवस्थेसाठी ताब्यात घेतले आहे. आम्ही मुंबई मेट्रोसारख्या प्राधिकरणांची मदत घेत आहोत. अशा मोठ्या व्यवस्था त्यांनाही करायला सांगत आहोत. आर्थिक अडचणी सध्यातरी नाहीत. कारण अनेक खासगी कंपन्या आर्थिक मदत करत आहेत."

आशुतोष सलील यांची मुंबईतली ही पहिलीच पोस्टिंग. सध्या त्यांना पहाटे तीन वाजेपर्यंत झोपता येत नाही. त्यांची दोनदा कोरोनाची टेस्ट करण्यात आली. कारण त्यांच्यात काही लक्षणं दिसून येत होती. कोरोनाबाधित रुग्णांच्या ते संपर्कात आले होते.

"हे आता किती काळ सुरू राहील याची कल्पना नाही. न थांबता आम्ही काम सुरू ठेवलं आहे. सतत समन्वय साधावा लागतो. त्यासाठी सतत फोनवर संपर्क साधावा लागतो. मी यापूर्वी फोनवर इतका कधीही बोललो नव्हतो," रिपोर्टरसोबत बोलत असतानाही त्यांना दहा मिस्ड कॉल्स आले होते.

गेल्या काही दिवसांपासून हे काम असंच अविरत सुरू आहे. कित्येक महिला, पुरूष कर्मचारी घरी गेलेले नाहीत. हॉटेल्समध्ये राहत आहेत. दिवसरात्र काम करत आहेत. बेडवर आले की लगेच डोळे बंद होतात. पण कुणीही तक्रार करत नाहीय.

कधी कधी रात्री झोप लागत नाही. अशावेळी उघाडे गाणं गातात. कधीतरी हे सगळं संपेल आणि आपण घरी परत जाऊ, अशी आशाही ते व्यक्त करतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)