कोरोना अपडेट : मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार ही अफवा- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ShivSena/facebook

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे

लॉकडाऊन गतिरोधक आहे. आपल्याला गती कमी करण्यात यश मिळालं, पण कोरोनाची साखळी तोडण्यात यश नाही आलं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद-जालना रेल्वेमार्गावर झालेल्या दुर्घटनेचा उल्लेख केला आणि या घटनेनं आपण व्यथित झाल्याचं म्हटलं. मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अस्वस्थ होऊ नका. संयम ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार ही अफवा असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. "या लढाईतले जवान आपण सगळे आहोत. हे युद्ध आपल्याला लढायचं आहे. लष्कर मुंबईत येणार नाही," असं उद्धव यांनी म्हटलं.

संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर असल्याचं उद्धव यांनी म्हटलं.

उद्धव यांनी गुरूवारी (7 मे) सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसह अन्य नेते उपस्थित होते. या बैठकीबद्दल बोलताना उद्धव यांनी म्हटलं, की सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी सूचना दिल्या. त्यातल्या अनेक सूचना अंमलात आणत आहोत. बैठकीत एकजूट दिसली.

उद्धव यांच्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे-

  • औरंगाबाद-जालना रेल्वेमार्गावर जे घडलं त्या घटनेनं मी दुःखी झालो. इतर राज्यातले जे मजूर जायला निघाले आहेत त्यांना मी पूर्वीच सांगितलं आहे, की इतरत्र कोठे जाऊ नका.
  • इतर राज्यांशी बोलणी सुरू. जिथून मजूर जाऊ इच्छितात आणि जिथे त्यांना जायचं आहे, ट्रेन सुरू.
  • हे करताना गर्दी करायला नको. कारण त्यामुळे आतापर्यंत जे केलं, ते ठप्प होईल.
  • संकट गंभीर आहे. संयम ठेवा असं आवाहन मजुरांना केलं.
  • कृपा करुन जिथे आहेत, तिथेच थांबा. जसजशी सोय होईल तसं आम्ही तुम्हाला घरी पाठवतो आहोत. अस्वस्थ होऊ नका. अतिशय संयमानं आम्ही हे काम करत आहोत.
  • मुंबईमध्ये लष्कर येणार अशी गेले दोन दिवस मुंबईत अफवा आहे. लष्कराची काय गरज आहे? मी जे काही केलं ते सांगून केलं आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्यानं लागू केला.
  • संकट मोठं आहे, पण सरकार गंभीर आहे.
  • BKC, गोरेगाव, इत्यादी ठिकाणी सेंटर्स उभे करत आहोत. बीकेसीतली क्षमता गरज असल्यास दुप्पट करू. आपण तयारी करून ठेवत आहोत.
  • सगळी सरकारी यंत्रणा तणावाखाली काम करत आहे.
  • केंद्र सरकारला विनंती करतो की पोलिसांना विश्रांती देण्यासाठी अधिकचं मनुष्यबळ हवं आहे.
  • इतर राज्यांतल्या आपल्या मजुरांना, विद्यार्थ्यांना आणत आहोत.
  • लॉकडाऊन गतिरोधक आहे. आपल्याला गती कमी करण्यात यश मिळालं, पण कोरोनाची साखळी तोडण्यात यश नाही आलं.
  • शिथिलता वाढवू तशी जबाबदारीसुद्धा वाढणार आहे.
  • आणखी काही दिवस तुमचं सहकार्य सरकारला हवं आहे.
  • काही कोव्हिड पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली, पण मुलं कोव्हिड निगेटिव्ह आहेत - हा निसर्गाचा चमत्कार
  • हॉस्पिटलमध्ये गलथानपणा अजिबात सहन करणार नाही.
  • कारवाई करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. दफ्तर दिरंगाईला थारा नाही.
  • लॉकाडऊनचं काय करायचं हे तुम्ही ठरवायचंय. तुम्ही जेवढी कडक बंधनं पाळाल, तेवढं लवकर हे संपेल. अजूनही काही ठिकाणी शिस्त बिघडलेली दिसतेय. जेवढी बंधनं तोडाल, तेवढी दिरंगाई होईल.
कोरोना
लाईन
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)