कोरोना व्हायरस: औरंगाबाद शहरात रुग्णांची संख्या का वाढतेय?

औरंगाबाद, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सोमवारी औरंगाबादमध्ये 29 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर मंगळवारी दुपारपर्यंत आणखी 13 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मराठवाड्याची ही राजधानी आता अचानक कोरोनाचं हॉटस्पॉट बनू लागली आहे.

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कुलकर्णी यांच्या माहितीनुसार, शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 95 वर पोहोचली आहे, तर सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालाय.

औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा अचानक का वाढला, याबाबत औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे सांगतात, "कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्यामागचं प्रमुख कारण, म्हणजे चाचण्यांच्या क्षमतेत झालेली वाढ. महापालिकेकडून पहिल्यापेक्षा जास्त कोरोना संशयीतांच्या चाचण्यात केल्या जात आहेत.

"कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. महापालिकेची विशेष पथकं कोरोना संशयीत रुग्णांचा शोध घेत आहेत."

कोरोना
लाईन

महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील रुग्ण खालीलप्रमाणे आहेत -

  • परदेशी प्रवासाचा इतिहास-2
  • देशांतर्गत प्रवास-1
  • हॉटस्पॉट म्हणून घोषित शहरात प्रवास करून आलेले- 10 (मुंबई-पुणे,नागपूर)
  • या कोरोनाबाधितांमुळे त्यांचे कुटुंबीय आणि संपर्कात आलेल्या 38 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबादच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात सद्य स्थितीला 55 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे.

औरंगाबाद जिल्हा सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "आत्तापर्यंत रुग्णालयातून 23 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. उपचार घेत असलेल्यांपैकी काहींना अजिबात लक्षणं नाहीत. तर काही रुग्णांना सौम्य लक्षणं दिसून आली आहेत."

कशी आहे पालिकेची तयारी?

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणतात, "शहरात ज्या भागांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आढळून आली आहे, अशा हॉटस्पॉटमध्ये डोअर-टू-डोअर जाऊन तपासणी केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची लवकर ओळख पटली तर त्यांच्यावर योग्यवेळी उपचार होतील. ज्यामुळे रुग्ण कोरोनामुक्त होण्याची संख्या वाढण्यास मदत होईल."

औरंगाबाद, महाराष्ट्र
फोटो कॅप्शन, औरंगाबाद

याबाबत बीबीसीशी बोलताना औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडिले म्हणाले, "शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेता संचारबंदी कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

"दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हॉटस्पॉट परिसरातील नागरिक प्रशासनाला सहकार्य करत नाहीत. एरिया सील केल्यानंतरही घराबाहेर पडतायत. यामुळे संसर्ग पसरण्याची भीती आहे. प्रत्येकामागे पोलीस लावणं शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केल्यावरच कोरोनावर विजय मिळवणं शक्य होईल."

औरंगाबाद शहरातील कंटेनमेंट झोन

नूर कॉलोनी, किरादपुरा, पंचकूआ, बैजीपुरा, बिसमिल्हा कॉलोनी, असोफिया कॉलनी, हिलाल कॉलनी, समता नगर, भीमनगर, पुंडलिक नगर हे शहरातले भाग कंटेनमेंट झोन आहेत.

सोमवारी या कंटेनमेंट झोन परिसरातील 4,583 घरात 22,058 लोकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. कंटेनमेंट झोनमध्ये महापालिकेच्या 81 टीम कार्यरत आहेत.

औरंगाबाद, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद महापालिकेच्या रिपोर्टनुसार, आत्तापर्यंत 2,26,853 लोकांची पालिकेच्या टीम भेट देवून चौकशी केली. त्यातून आत्तापर्यंत 1686 संशयीत आढळून आले आहेत.

याबाबत महापौर घोडिले पुढे म्हणाले, "पालिकेने घरोघरी तपासणी सुरू केलीये. क्वारंन्टाईन सेंटर, कोव्हिड-19 केअर रुग्णालय यांची योग्य सोय करण्यात आली आहे. सद्यस्थितीला संशयित रुग्णांचा शोध आणि उपचार यांच्यावर आम्ही भर दिलाय."

लक्षणं दिसून न येणारे रुग्ण इन्स्टिट्युशनल क्वॉरेंन्टाईन

राज्यात जवळपास 80 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण asymptomatic म्हणजे कोणतंही लक्षण दिसून न येणारे आहेत. रुग्ण एसिप्टोमॅटिक असला तरी त्यांच्यापासून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील asymptomatic रुग्णांना होम क्वॉरेंन्टाईन न करता इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे.

औरंगाबाद, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना

याबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, "एसिम्प्टोमॅटिक म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोणतंही लक्षण दिसत नसेल. तरी हे रुग्ण कोरोना विषाणूचे वाहक असतात. यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची भीती असते. एसिम्प्टोमॅटिक लोकं शहरभर फिरतात, बाहेर जातात, नियम पाळत नाहीत.

कोरोनाचाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना होम क्वारंटाईन न ठेवता इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे, जेणेकरून ही लोकं शहरभर फिराणार नाहीत."

लाईन

इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन

  • देवगिरी मुलांचं होस्टेल-0
  • संत तुकाराम होस्टेल- 36
  • कलाग्राम- 62
  • कोव्हिड-19 केअर सेंटर (CCC) दाखल रुग्ण
  • एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स- 83
  • एमआयटी मुलांचं हॉस्टेल- 72
  • किलेआर्क- 82
लाईन

(स्त्रोत-औरंगाबाद महापालिका)

"एखादा व्यक्ती कोरोना चाचणीत निगेटिव्ह आला. तर, सात दिवसांनंतर पुन्हा त्याची चाचणी करण्यात येते. या व्यक्तीला कोणतही इन्फेक्शन नाही याची खबरदारी घेवूनच घरी सोडण्यात येतं, असं डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले.

कोरोनाग्रस्तांमध्ये तरुणांचं प्रमाण जास्त

औरंगाबाद महापालिकेच्या रिपोर्टनुसार, 22 एप्रिलची वयोगटानुसार स्थिती काही अशी होती -

  • 11-20 वयोगट- 6 रुग्ण
  • 21-30- 10 रुग्ण
  • 31-40- 8 रुग्ण
  • 41-50- 5 रुग्ण

याबाबत ट्विटरवर माहिती देताना, महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे म्हणतात, "तरुणांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या ही चिंतेचा विषय आहे. 21 ते 40 या वयोगटात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे.

"तरुण घराबाहेर पडतायत, कोरोना घेऊन घरी जात आहेत. यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांना याची लागण होत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, की कोरोनाचा सर्वांत जास्त धोका घरातील ज्येष्ठ नागरिकांना आहे. त्यामुळे तरुणांनी जबाबदारीने वागावं."

औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी सारी, म्हणजेच सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी इलनेस या आजारामुळे 16 लोकांचा मृत्यू झाला होता. पालिका प्रशासनाच्या रिपोर्टनुसार, सोमवारी शहरात एकही सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी इलनेसचा रुग्ण आढळून आला नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)