अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध सोनिया गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यांप्रकरणी FIR दाखल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. सोनिया गांधींविरोधातील वक्तव्यांप्रकरणी अर्णब गोस्वामींविरोधात FIR दाखल
महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वीमी यांच्याविरोधात नागपूरमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.
धर्माच्या आधारे दोन समुदायांमध्ये भांडणं लावण्याच्या उद्देशानं केलेलं वक्तव्य, धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेली कृती या बाबींचा या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एका कार्यक्रमात पालघर लिंचिंग प्रकरणाबाबत बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीविरोधात वक्तव्यं केली आहेत. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेयर होत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दरम्यान, अर्णब आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीवर गुरुवारी (23 एप्रिल) दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यात अर्णब आणि त्यांच्या पत्नी समिया यांना कोणतीही दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2. कोरोनाच्या संकटात राजकारणाचा डमरू वाजवू नये – नितीन गडकरी
“आपला देश कोरोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये,” असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Nitin Gadkari
"कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब जनता अडचणीत सापडली आहे. या काळात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये. मलादेखील अनेकदा महाराष्ट्र सरकारच्या काही बाबी पटत नाहीत. तेव्हा मी थेट मुख्यमंत्री किंवा सचिवांशी चर्चा करतो. चुका सगळ्यांकडून होतात. अशावेळी चर्चा करुन मार्ग काढायचा असतो. एकमेकांवर जाहीर टीका करून वाद निर्माण करणे टाळायला पाहिजे," असं गडकरींनी म्हटलं.
"अमेरिकेत 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय पक्ष आपापसातील वाद बाजूला ठेवून एकत्र आले होते. त्यामुळे आपणही कोरोनासारख्या संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. आपला राजकीय डमरू वाजवण्याची ही वेळ नाही. एकदा हे संकट सरल्यानंतर आपण पुन्हा राजकारण करायला मोकळे आहोत," असंही त्यांनी म्हटलं.
3. 'कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा अधिक असू शकतो'
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा जितका सांगितला जात आहे, त्याहून कैकपटीनं अधिक मृत्यू कोरोनामुळे झाले असण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क टाइम्स आणि फायनान्शियल टाइम्सनं केलेल्या अभ्यासात हे समोर आलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

इकॉनॉमिक टाइम्सच्या अभ्यासानुसार एप्रिल 10 पर्यंत कोरोनाबाधितांच्या मृत्यू 75 टक्क्यांनी वाढ झाली.
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, जगभरातल्या 11 देशामंधील मृत्यूंचा अभ्यास केल्यास समोर आलं, की सध्या माहिती असलेल्या मृत्यूंपेक्षा 25 हजार अधिक मृत्यू झाले असण्याची शक्यता आहे.
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी 27 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या महिनाभरात अशा पद्धतीची तिसरी बैठक पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांसोबत करत आहेत.

फोटो स्रोत, PMO INDIA
सध्या देशातल्या लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर देशातल्या लॉकडाऊनची रणनीती काय असावी याची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
5. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत
राज्यात गेल्या तीन महिन्यांत ठिकठिकाणी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (22 एप्रिल) दिले. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निर्णयानुसार योग्य ती मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात वाढत असलेली पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन टँकरने पाणीपुरवठा करण्याचे अधिकारही प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








