कोरोना लॉकडाऊन : महिना पूर्ण झाला तरी महाराष्ट्रात का वाढत आहे रुग्णांची संख्या?

कोरोना

फोटो स्रोत, Maharashtra dgipr

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 23 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. या निर्णयाला आता महिना पूर्ण झाला आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

कोरोनाच्या या वाढत्या प्रादूर्भावामुळे आता काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. लॉकडाऊनची परिणामकारक अंमलबजावणी होत नाहीये का? आरोग्य व्यवस्था योग्य दिशेने काम करतेय का ? पुरेशा टेस्ट होत आहेत का ? लक्षणं दिसत नसल्यामुळे संसर्ग होतोय का ?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.

त्यासाठी आम्ही सर्वप्रथम राज्य आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "रुग्ण वाढत चालले आहेत त्याचे नेमके कारण आम्ही सांगू शकत नाही. कम्युनिटी स्प्रेड झाला आहे असं म्हणायला केंद्र सरकारने त्यासाठी कोणते निकष लावले असतील तर याची आम्हाला कल्पना नाही."

कोरोना
लाईन

"हे खरं आहे की कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येताही अनेकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पण त्याचं एक असं कारण सांगता येणार नाही."

"टीव्हीवर आपण पाहतोय की काही नागरिक बाहेर गर्दी करत आहेत. पण बाजारात गेलेल्या लोकांमध्ये पसरतोय असंही ठोस सांगता येणार नाही."

'दाटीवाटीत राहणाऱ्या वस्तीत संसर्ग अधिक'

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, " कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग लॉकडाऊननंतर मंदावला आहे. सुरुवातीला दर अडीच दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत होती. आता हाच कालावधी सहा दिवसांवर गेला आहे. ही दिलासादायक बाब आहे."

धारावी

फोटो स्रोत, Getty Images

"रुग्णसंख्या वाढत आहे कारण आजही 20 टक्के लोकं घराबाहेर पडत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात लोकं दाटीवाटीच्या वस्तीत राहतात. मुंबईची घनता 29 हजार व्यक्ती/चौ.मीटर इतकी आहे. तिथे सोशल डिस्टंसिंग पाळणं शक्य होत नाही."

"मुंबईत धारावी, वरळी कोळीवाडा, वडाळा अशा परिसरात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळत आहेत. पुण्यातही आपण पाहिलं तर भवानी पेठ, सय्यद नगर, कोलवा अशा दाटीवाटीच्या परिसरात संसर्ग अधिक आहे."

'कोरोना टेस्ट वाढवण्याची गरज'

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, " राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे. पण तरीही कोरोनाच्या टेस्ट वाढवण्याची गरज आहे. दर 10 लाख नागरिकांमागे किमान 5 हजार टेस्ट होणं गरजेचे आहे. पण आपण महाराष्ट्रात पाहिलं तर 10 लाख नागरिकांमागे केवळ 1500 ते 1700 टेस्ट होत आहेत. या नक्कीच पुरेशा नाहीत. "

'कोरोनाची लक्षणं नसलेले सर्वाधिक रुग्ण'

राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 81 टक्के कोरोना रुग्णांना कोरोनाची लक्षणं दिसून आलेली नाहीत.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

डॉ.भोंडवे यांनी बाबीसी मराठीशी बोलताना सांगितले, " काळजी करण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे शेकडो रुग्णांना कोरोनाची लक्षणं नाहीत. त्यामुळे टेस्ट करुन उपचार सुरु करेपर्यंत उशीर झालेला असतो हा आमचा अनुभव आहे. रुग्ण हॉस्पिटलला येईपर्यंत तो अनेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतो."

तर लक्षणं नसलेल्या रुग्णांपासून धोका कमी असल्याचं WHO चा चीनबाबतचा अहवाल सांगतो, अशी प्रतिक्रिया डॉ.आवटे यांनी दिली.

सरसकट सगळ्यांची कोरोना चाचणी आवश्यक?

कोणतीही लक्षणं नसताना आणि रुग्णाच्या संपर्कात न येताही कोरोनाची लागण का होत आहे?

राज्याच्या आरोग्य विभागात काम करणा-या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्यातरी राज्यात सरसकट सगळ्या नगारिकांची कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

या विषयी बोलताना डॉ.प्रदीप आवटे सांगतात, "सगळ्यांची चाचणी करण्याचा आरोग्य विभागाचा कोणताही विचार नाही. तशी आवश्यकताच नाही. आरोग्य यंत्रणेवर ताण असताना सगळ्यांची चाचणी करणं आपल्याला परवडणारंही नाही. राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे. रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत पोहोचली आहे."

कोरोना

फोटो स्रोत, Maharashtra dgipr

"मुंबई वगळलं तर रुग्णांची संख्या 65 टक्के कमी होईल. मुंबईत रुग्ण संख्या वाढण्याची कारणे वेगळी आहेत. मुंबईला आंतरराष्ट्रीय प्रवासाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे राज्याची संख्या ही देशात सर्वाधिक दिसते."

'डॉक्टर आणि नर्सना सुरक्षा द्या'

डॉ. जयेश लेले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "आजही डॉक्टर्स आणि नर्सेसना पीपीई किट्स पुरेशा मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्टर आणि नर्सेसना कोरोनाची लागण होत आहे. आपली संपूर्ण मदार याच डॉक्टर आणि नर्सेसवर असल्याने त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवं. पीपीई किट्स सर्वांपर्यंत पोहचतील याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी."

कोरोना

फोटो स्रोत, Maharashtra dgipr

"लॉकडाऊनला 30 दिवस झाले असले तरी रुग्णांची संख्या आटोक्यात येण्यासाठी हा कालावधी कमी आहे. आणखी 2-3 आठवड्यांनी चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. यात नागरिकांनी सहकार्य करायला हवे."

महाराष्ट्र आणि इतर राज्य

देशातला पहिला रुग्ण 30 जानेवारीला केरळ राज्यात आढळला. पण आज केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे, तर महाराष्ट्रात 9 मार्चला कोरोनाचे दोन रुग्ण पुणे शहरात आढळले आणि आज दीड महिन्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराहून अधिक आहे.

महाराष्ट्रानंतर राजधानी दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. दिल्लीत रुग्णांची संख्या 2000 च्या घरात आहे. दिल्ली पाठोपाठ गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1700 ते 2000 च्या घरात आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Maharashtra dgipr

वैद्यकीय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात 20 एप्रिलपर्यंत 71 हजार 321 चाचण्या करण्यात आल्या.

या आकडेवारीची तुलना महाराष्ट्राशी केल्यास आपल्याला लक्षात येईल, की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक आहे.

राज्य सरकारचे पुढील नियोजन काय?

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, " राज्यात 75 हजार रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने काही निकषांवर परवानगी दिली आहे. त्यानुसार काही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

  • घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी 6359 पथके कार्यरत आहेत.
  • कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
  • हायड्रोक्सिक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात ह्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र ज्यांना हृदयविकार आहे आणि ६० वर्षांवरील तसंच १५ वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत.
  • काही छोट्या चाचण्या देखील करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये एक्स रे चाचणी तसेच एसपीओटू पल्सऑक्सिमीटर चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
  • ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही तर अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)