कोरोना लॉकडाऊन: जम्मूमध्ये अडकलेल्या पुण्याच्या तीन तरुणांना शिक्षकाने दिला आधार

- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
"हे तिघेच काय, 300 लोक जरी असते तरी आम्ही हेच केलं असतं. शेवटी माणसंच माणसांच्या कामी येऊ शकतात. कठीण काळ निघून जातो, पण याच गोष्टी नंतर आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात" पुण्यातून जम्मूत एका माहितीपटाच्या शूटसाठी गेलेल्या तीन तरुणांना महिनाभर आपल्या घरात ठेवून घेणारे नझीम मलिक फोनवरून म्हणाले.
पुण्याचे नचिकेत गुत्तीकर, शमीन कुलकर्णी आणि निनाद दातार 15 मार्चला आपल्या प्रोजेक्टच्या शूटसाठी जम्मूमधल्या डोडा जिल्ह्यातल्या गाथा या गावी पोहोचले.
23 तारखेला त्यांचा शूट संपणार होता नंतर ते पुढच्या शूटसाठी काश्मीरला जाणार होते. पण मध्येच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि पुण्याचे हे तिघे तरूण जम्मूमध्येच अडकले.
नचिकेत यापूर्वीही जम्मू-काश्मीरमध्ये कामाच्या निमित्ताने येत-जात राहिलाय. नझीम मलिक यांच्याशी त्याची याच निमित्ताने ओळख झाली होती. शूटचा एक आठवडा ते तिघे नझीम यांच्या कुटुंबाबरोबर राहत होते.
पण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर समोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पण नझीम यांच्या कुटुंबाने आठवडाभर राहण्यासाठी आलेल्या या पाहुण्यांना लॉकडाऊन संपेपर्यंत आपल्याचकडे राहू देण्याचं ठरवलं.
नचिकेत सांगतो, "ओळख असली तरी एक आठवडा राहणं वेगळं आणि एक महिना राहणं वेगळं. पण नझीम यांनी कधीही आम्हाला याची जाणीव करून दिली नाही किंवा दुसरीकडे सोय करा असंही सांगितलं नाही. आम्हीच निघण्याचा प्रयत्न केला, पण वाहतुकीची सगळी साधनं बंद आहेत त्यामुळे आम्ही निघू शकलेलो नाही."
'कोरोनाचा प्रसार बळावायच्या आधीच जम्मूत पोहोचलो'
15 मार्चला जेव्हा नचिकेत, निनाद आणि शमीन चित्रीकरणासाठी डोडा जिल्ह्यात दाखल झाले तेव्हाच त्यांचं तापमान मोजलं गेलं होतं. "खबरदारीचा उपाय म्हणून नंतर आम्हाला विलगीकरणातही राहायला सांगितलं.
2 आठवडे क्वारंटाईन व्हा असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. एक आठवडा त्यांनी आम्हाला तिथल्यात हॉस्पिटलमध्ये राहायलं सांगितलं. तिथे वेगळा वॉर्ड तयार केलेला होता. आम्ही तिथे गेलो तेव्हा फक्त आम्ही तिघंच होतो", नचिकेत सांगतो.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

एका अनोळखी गावात, घरच्यांपासून दूर एका वेगळ्याच संकटाच्या काळात या तिघांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये राहायला सांगितलं गेलं तेव्हा साहजिकच त्यांच्या चेहऱ्यांवर भीती होती असं नझीम सांगतात.
"मी पटकन माझ्या पत्नीशी बोललो आणि ती पण म्हणाली की आझीम (नझीम आणि नझमा मलिक यांचा मुलगा) ला पण तिथेच ठेवा जेणेकरून त्या तिघांनाही जरा मदत होईल. माझी पत्नी म्हणाली की जेव्हा या तिघांच्या आई-वडिलांना कळेल की आपली मुलं दवाखान्यात आहेत तेव्हा त्यांना भीती वाटेल. पण आपलाही मुलगा तिथे आहे म्हटल्यावर त्यांना जरा धीर येईल. या तिघांच्या जागी आम्ही असतो तर आमचीही हीच अवस्था झाली असती." नझीम पुढे सांगतात.
नझीम यांनी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना तशी विनंती केली. इतर कोणतेच पेशंट्स नसल्यामुळे त्यांनीही ती विनंती मान्य केली आणि एक आठवडा हे तिघे आणि नझीम यांचा मुलगा आझिम त्या हॉस्पिटलमध्येच राहिले.
स्वतःच्या मुलाला असं ह़ॉस्पिटलमध्ये राहायला सांगण्याची रिस्क तुम्ही कशी घेतलीत असं विचारलं तेव्हा नझीम म्हणतात "माझ्या मित्रांनीही मला हेच विचारलं. मी विचार केला की दवाखान्यात काम करणारे तरुण डॉक्टर, नर्स ही सगळी पण आपलीच मुलं आहेत. ते सुद्धा अशी रिस्क घेतायत. मग आपणही इतकं करूच शकतो. अल्लाहची कृपा होती त्यामुळे सगळं सुरळीत झालं."
हे चौघे दवाखान्यात असताना नझमा चौघांसाठी घरचं जेवण बनवून पाठवायच्या. "हे लोक आता आमच्या घरातलेच झालेत. आम्हाला दोन मुलं आहेतच, आता 5 मुलं झाली" पन्नाशीत असलेले नझीम हसत हसत सांगत होते.
'दाखवत नाहीत, पण भार पडत असणारच'
इथे राहताना कुठलीही अडचण येत नसली तरी नझीम यांच्या कुटुंबावर आपला भार पडत असणारच असं नचिकेतला वाटतं.
"आम्ही सगळे एकत्र असल्याने लॉकडाऊनचं फिलींग येत नाहीय. पण ते कितीही सपोर्ट करत असले तरी त्यांच्यावर थोडाफार भार येत असणारच आहे. ते सरकारी शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या वडिलांचं पेन्शन येतं. मुलाचं आत्ताच शिक्षण संपलंय, मुलीचं सुरू आहे. पाच जणांच्या कुटुंबात आणखी 3 लोकांचा भार, खर्च तर येतोच ना."
पण नझीम या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "लोक मोलमजुरी करून 10-15 लोकांच्या कुटुंबाचं पोट भरू शकतात. मी एक शिक्षक आहे. मी 7-8 लोकांचं कुटुंब एक-दोन महिन्यासाठी नाही चालवू शकत का?" ते प्रतिप्रश्न करतात.

फोटो स्रोत, Nachiket Guttikar
नझीन यांचा परिवार आता 8 जणांचा झालाय. ते सगळे त्यांच्या बागेत दुपारी क्रिकेट खेळतात. रात्री गप्पा मारत बसतात, लुडो खेळतात. सगळ्यांचा वेळ मजेत जातो.
नझीम म्हणतात "या सगळ्यांच्या असण्यामुळे घरात कायम आनंदांचं वातावरण आहे. लॉकडाऊन आहे असं आम्हाला वाटतच नाही. आम्हाला हे आमचं सद्भाग्य (खुशकिस्मती) वाटतं की हे लोक आमच्याबरोबर राहतायत. आमचाही वेळ त्यामुळे चांगला जातो."
'रमजानचा महिना आणि लॉकडाऊन'
रमजानचा महिना सुरू होतोय. यंदाचा रमजान कसा असेल याबद्दल बोलताना नझीम म्हणतात "सध्या आम्ही सगळे गप्पा मारत रात्री उशीरापर्यंत जागतो, मजा करतो. आता रमजानच्या काळात आम्ही त्यांना म्हटलंय की रात्रीचं जेवण लवकर करून लवकर झोपू कारण पुन्हा सेहरीसाठी उठायचं असतं. एवढाच काय तो बदल. बाकी सगळं आहे तसंच सुरू राहील."
नचिकेत सांगतो की रमजानमधला जितका काळ ते इथे असतील तितका काळ ते नझीम आणि त्यांच्या कुटुंबासह रोजे पाळणार आहेत.

फोटो स्रोत, Nachiket Guttikar
जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही इंटरनेट सेवा पूर्णपणे सुरळीत झालेल्या नाहीत, मोबाईल इंटरनेट फक्त 2G सुरू आहे. याबद्दल बोलताना नचिकेत सांगतो की 2Gवर कोणत्याही वेबसाईट लोड होण्यात खूप वेळ जातो त्यामुळे बातम्या मिळण्याचं एकमेव साधन म्हणजे टीव्ही.
"टीव्ही न्यूज मधून माहिती कमी आणि इतर गोष्टीच जास्त मिळतात. आमच्यासारखे जे लोक बाहेर अडकलेत त्यांना माहिती मिळणं हे खूप गरजेचं आहे. जर सरकार आणि मीडिया या गोष्टी जास्त प्रॉडक्टिव्हली पोहोचवू शकले तर जास्त मदत होईल, खासकरून जम्मू-काश्मीरमध्ये."
"टाळ्या वाजवणं, दिवे लावणं याची घोषणा दोन दिवस आधी होते पण लॉकडाऊनची अनाउन्समेंट 4 तास आधी होते हे frustrating आहे. जे जे लोक आपल्या राज्याबाहेर अडकलेत त्यांना या गोष्टी खूप त्रास देत असणार आहेत," नचिकेत आपली तक्रार बोलून दाखवतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








