उद्धव ठाकरे : कोरोना महाराष्ट्र, महिला हिंसाचार आणि इतर 13 मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपण काही गोष्टी सुरू करणार असलो तरी, कोरोनाला रोखण्यासाठी व्हायरसची वाहतूक व्हायला नको, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोना काळात, महिलांवर अन्याय किंवा अत्याचार व्हायला नको. दुर्देवाने अशी परिस्थिती ओढवल्यास 100 क्रमाकांवर फोन करा, असंही त्यांनी सांगितलं.

"बंधन घालणं क्लेशदायी असतं. तुम्ही सहकार्य करत आहात. केंद्र सरकारशी आमचं बोलणं झालं. स्थलांतरित कामगारांनो चिंता करू नका. कोरोनाचं संकट संपेल तेव्हा आम्ही तुमच्या घरी जाण्याची व्यवस्था करू. हा काही दिवसांचा प्रश्न आहे. खुशी के दिन लौट आयेंगे. लढायचंच आणि जिंकायचंच."

महत्त्वाचे मुद्दे

1.शनिवार संध्याकाळपर्यंत 66हजार 800 जणांच्या टेस्ट घेण्यात आल्या. या टेस्टमध्ये 3 हजार 600 पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचे 75 टक्के रुग्ण सौम्य लक्षणं असलेली आहेत.

2.सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असतील तर हॉस्पिटलमध्ये जाऊन चाचणी करा. लोक वाळीत टाकतील अशी भीती बाळगू नका. न घाबरता दवाखान्यात या.

3.कोरोना झाला म्हणजे संपलं असं नाही. गंभीर झालेले रुग्णही बरे होऊन घरी परतत आहेत. सहा महिन्यांचं बाळ ते 83 वर्षांच्या आजींपर्यंत अनेक माणसं बरे झाले आहेत.

4.खाजगी क्षेत्रातील डॉक्टर्स क्लिनिक, हॉस्पिटल्स विशेषत: बिगर कोव्हिड मुंबईत सुरू राहतील. पीपीई किटसारख्या उपकरणांचा तुटवडा आहे. केंद्र सरकारकडून पुरवठा होतो आहे, राज्य सरकारने अनेकविध पीपीई किट खरेदी केली आहेत.

कोरोना
लाईन

5.सवलतीच्या दराने अन्नधान्य देत आहोत. केंद्र सरकारने मोफत तांदूळ दिला आहे. तांदुळाबरोबर डाळ आणि गव्हाची मागणी आम्ही केली आहे. जसा डाळी, गव्हाचा पुरवठा होईल तसं वितरण करू.

6.लॉकडाऊन 3 मे पर्यंत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात आकडे कमी होत आहेत. आपण भ्रमात राहायला नको. कोरोनाची आकडेवारी वरखाली होत राहते. गाफील राहून चालणार नाही.

7.अर्थचक्र कोरोनाच्या चिखलात रुतलं आहे. ते सुरू करावं लागेल. उद्यापासून गणपती बाप्पा मोरया घोषणा देऊन, काही गोष्टी सुरू होत आहेत.

8. तुम्ही कर्मचाऱ्यांची काळजी आवारात घेणार असाल तर परवानगी मिळेल. मालवाहतूक वेगळी आणि व्हायरस वाहतूक वेगळी. व्हायरसची वाहतूक कळत नकळत होते आहे. तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलं आहे. ही शिक्षा तुम्ही कर्तव्य म्हणून भोगता आहात.

9. लतादीदींच्या 'सरणार कधी रण' या गाण्याची आठवण झाली. शत्रू दिसत नाही ही पंचाईत आहे. शत्रू आपल्याच लोकांच्या माध्यमातून हल्ला करतो आहे. आपण अभूतपूर्व पराक्रम दाखवला आहे. संयम, धैर्य, जिद्द तुम्ही दाखवली आहे. सोमवारी कोरोनाविरुद्धचं युद्ध सुरू होऊन सहा आठवडे पूर्ण होतील.

10. जिल्ह्यांच्या वेशी बंदच राहतील. जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक सुरू राहील. या जिल्ह्यातली माणसं दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकणार नाहीत.

11. काहींच्या मनासारखं होत नाही. वृत्तपत्रांवर बंदी नाही. पेपर स्टॉलवर उपलब्ध असतील. मुंबई-पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, घरोघरी पेपरचं वाटप होणार नाही. ही आरोग्यविषयक आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. हे संकट मला संपवायचं आहे. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार आहे.

12. पी हळद हो गोरी असा उतारा कोरोनावर आढळलेला नाही. अँटी कोरोना पोलीस भूमिका आपण निभवायला हवी. लहान मुलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत. बाळगोपाळांना सांगू इच्छितो, तुमच्या भवितव्यासाठी हे सगळं करत आहोत. तुमचं कौतुक आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत. सरकार खंबीर आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत येते आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलटीसाठी वेगळं अकाऊंट काढून दिलं आहे.

13. वैफल्यग्रस्त वाटत असेल तर सरकारने त्यासाठी व्यवस्था केली आहे. मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्यावतीने 1800 120 8200 50 तर आदिवासी विभाग-प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्ला संस्थेतर्फे 1800 102 4040 या क्रमांकावर संपर्क करा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)