कोरोना व्हायरसमुळे रंगपंचमी खेळणं धोकादायक ठरू शकतं का?

फोटो स्रोत, NurPhoto/Getty
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
रंगपंचमी हा एरवी उत्साहात साजरा होणारा सण. पण यंदा अनेकजण रंग उडवायचे की नाही, अशा पेचात पडलेयत. कारण, कोरोनाव्हायरस.
या विषाणूपासून होणाऱ्या कोव्हिड या आजाराची साथ चीनच्या वुहान शहरातून सुरू झाली आणि जगातल्या 70 हून अधिक देशांत त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विट करून कोरोना व्हायरसचा धोका पाहता, आपण होळी खेळणार नसल्याचं जाहीर केलं.
पण खरंच कोव्हिडच्या साथीची भीती असताना रंग खेळणं धोकादायक ठरू शकतं?
आम्ही त्याविषयी डॉक्टर्सना विचारलं. त्यांचं म्हणणं आहे, की कुठल्याही साथीच्या रोगांच्या काळात, रंग न खेळणं, किंवा पुरेशी काळजी घेऊनच ती खेळणं योग्य ठरतं.
कोरोनाव्हायरस किंवा इतर श्वसनाच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टर्स नाका तोंडाला हात न लावणं चांगलं असं सांगतात. त्यांच्या मते साथीच्या काळात लोकांशी हात मिळवणंही टाळलेलं बरं. पण धुळवडीचे रंग खेळताना एकमेकांच्या हातानं तोंडाला रंग लावला जातो, जे टाळता येत नाही.

फोटो स्रोत, Hindustan Times/getty
गर्दीच्या जागी गरज नसेल तर जाऊ नका, असा सल्लाही जगभरातल्या तज्ज्ञांनी दिला आहे, त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकांना तीच विनंती केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात, मी महाराष्ट्राच्या जनतेला एकच आव्हान आणि विनंती करतो. घाबरुन जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकार दक्षता घेत आहे. पुढचे दहा ते पंधरा दिवस काळजी घेण्याची गरज आहे.
रंगपंचमीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या पिचकाऱ्या किंवा बाकी अनेक वस्तू, खेळणी चीनमधून आयात होतात. काही जणांनी भीतीमुळं तीही वापरणं बंद केलं आहे. पण त्यात तथ्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, NurPhoto
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "कोरोना व्हायरसचा उगम चीनमध्ये झाला हे खरं असलं तरी तिथून आलेल्या वस्तूंच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसार होत नाही. रुग्ण व्यक्तीच्या खोकल्यावाटे याचा प्रसार होतो. पण तिथून आलेल्या वस्तूंपासून आपल्याला काहीही धोका नाही."
तज्ज्ञांचा सल्ला आहे, की अचानक ताप आला, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास जाणवला, तर अजिबात वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरकडे गेलेलं चांगलं. तुम्ही अशी लक्षणं जाणवत असतील, तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन मोफत तपासणी करुन घेऊ शकता.
तुमची सुरक्षा आणि सावधानता बाळगणं हे तुमच्या हातात आहे, त्यामुळं रंगपंचमी साजरी करायची की नाही, किंवा ती कशी साजरी करायची हेही तुम्हालाच ठरवायचं आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








