You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात औषधांच्या तुटवड्याची भीती, भारताने आणली निर्यातीवर मर्यादा
कोरोनाव्हायरसमुळे भारताने काही औषधांच्या निर्यातीवर मर्यादा आणल्याने जगभरात काही औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण झालीय.
जेनेरिक औषधांचा जगातला सर्वात मोठा पुरवठादार असणाऱ्या भारताने 26 घटक पदार्थ आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या औषधांच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.
यामध्ये पॅरासिटमॉल या जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वेदनाशामकाचाही समावेश आहे.
औषधनिर्मितीसाठी आवश्यक घटकांचं उत्पादन करणाऱ्या चीनमधल्या उत्पादकांनी उत्पादन कमी केल्याने वा थांबवल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.
भारतातले औषध उत्पादक त्यासाठी लागणाऱ्या घटकांसाठी चीनवर 70 टक्के अवलंबून आहेत. आणि जर कोव्हिड-19 आजार असाच पसरत राहिला तर या औषधघटकांचा तुटवडा निर्माण होण्याचा इशारा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलाय.
"चीनमध्ये उत्पादन न होणाऱ्या औषधांतले मूळ घटकही चीनमधून येतात. जर चीन आणि भारत या दोघांनाही याचा फटका बसला तर जगभरात तुटवडा निर्माण होईल," चायना मार्केट रिसर्च ग्रुपचे तज्ज्ञ शॉन रीन यांनी सांगितलं.
भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांद्वारे करण्यात येणाऱ्या निर्यातीच्या जवळपास 10% घटक आणि औषधं या निर्बंधांच्या यादीत आहेत. यामध्ये टिनीडॅझॉल (Tinidazole), एरिथ्रोमायसिन (Erythromycin), प्रोजेस्टेरॉन हार्मोन (Progesterone) आणि व्हिटामिन B12चा समावेश आहे.
घटकांच्या तुटवड्यामुळे किंमती वाढण्याची चिन्हं दिसत असल्याचं ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे प्रमुख अर्थतज्ज्ञ स्टीफन फोरमन यांनी सांगितलं. ते म्हणाले, "भारताला होणारा पुरवठा कमी झाल्याने तिथल्या किंमती बऱ्यापैकी वाढल्याचं दिसून आलं होतं."
या घोषणेनंतर भारत सरकारने लोकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलंय. 3 महिने पुरेल इतका साठा आपल्याकडे असल्याचं सरकारने म्हटलंय.
अमेरिकेच्या फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननुसार 2018 साली अमेरिकेने भारतातून केलेल्या एकूण आयातीपैकी 25% ही औषधं होती आणि 30 टक्क्यांपेक्षा जास्त आयात ही औषधं तयार करण्यासाठीच्या घटकांची होती.
आता भारताने घातलेल्या या निर्बंधांचा अमेरिकेतल्या औषध पुरवठ्यावर आणि अत्यावश्यक औषधांवर काय परिणाम होईल याचा अंदाज घेण्यात येत असल्याचं अमेरिकेचे FDA कमिशनर स्टीफन हान यांनी मंगळवारी अमेरिकन सिनेटर्सना सांगितलं.
तर आपण आपल्या इतर पुरवठादारांवर लक्ष ठेवून असल्याचं अमेरिकेतल्या प्रमुख औषध उत्पादक कंपन्यांनी म्हटलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)