You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंदुरीकर महाराजांचा कोल्हापुरातील कार्यक्रम का रद्द झाला?
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे.
शिवाजी विद्यापीठात आज (28 फेब्रुवारी) संध्याकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र अहमदनगर इथून महाराज कोल्हापूर इथं वेळेत पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळ कार्यक्रम रद्द करण्यात आला, असं कारण आयोजकांनी सांगितलं.
शिवाजी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीकडून शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत वेगवेगळे 10 कार्यक्रम होणार आहेत. त्याअंतर्गत आज संध्याकाळी चार वाजता इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता.
मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संघटनानी या कार्यक्रमाला जोरदार विरोध केला होता.
"स्त्रियांच्या बाबतीत लांच्छनास्पद विधान करणारे, अवैज्ञानिक दावे करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी कायद्यावर घाला घातला आहे. त्यामुळे असंवैधानिक विधानं करणाऱ्या व्यक्तीला विद्यापीठात येऊ देऊ नये," अशी मागणी अंनिसच्या सीमा पाटील यांनी केली.
"शिवाजी विद्यापीठ ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. स्त्रियांच्या बाबतीत संविधानिक मूल्यांना छेद देणारी भूमिका इंदुरीकर महाराजांची आहे. जर विद्यापीठात त्यांचा कार्यक्रम झाला तर समाजात वेगळा संदेश जाईल त्यामुळं विद्यापीठाची बदनामी होईल," असं सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले यांनी सांगितलं.
समतेचा विचार पसरवणाऱ्या कोल्हापूरसारख्या राजर्षी शाहू महाराजाच्या नगरीत हा कार्यक्रम होऊ नये यासाठी युवकाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न असल्याचं भोसले यांनी सांगितलं.
मात्र, इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. "युवा पिढी महाराजांकडे आकर्षित होते. महाराजांच्या चांगल्या विचारांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र ज्या संघटना या कार्यक्रमाला विरोध करत आहेत. त्या केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी विरोध करत असल्याचं" मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मंदार पाटील यांनी सांगितलं.
तर युवकांना मार्गदर्शन व्हावं, आईवडिलांबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम होणार होता. मात्र प्रसिद्धीसाठी होणारा विरोध डावलून कार्यक्रम घेणारचं अशी भूमिका युवासेना शहरप्रमुख मकरंद माने यांनी घेतली होती.
हा कार्यक्रम रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन देणासाठी पुरोगामी संघटना आणि कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या संघटना शिवाजी विद्यापीठात समोरासमोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर या संघटनांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे यांच्याशी चर्चा करत आपली बाजू मांडली. यावेळी विद्यापीठात विज्ञान दिनाचे कार्यक्रम न घेता अवैज्ञानिक गोष्टी घडू नयेत अशी मागणी एआयएसएफचे गिरीश फोंडे यांनी कुलगुरुकडे केली.
तसंच विद्यार्थ्यांनी महाराजांना विरोध केला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली. त्यामुळं हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी फोंडे यांनी केली. त्यावर तांत्रिक बाबी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचं कुलगुरुंनी सांगितलं.
ही सर्व चर्चा झाल्यानंतर आयोजक प्रवीण कोडोलीकर यांनी हा कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती दिली. यामागे इंदुरीकर महाराज कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचणार नसल्याचं कारण देण्यात आलं. मात्र येत्या 3 ते 4 महिन्यात दुसऱ्या ठिकाणी इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचं कोडोलीकर यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या या कार्यक्रमाला पुरोगामी संघटनानी केलेल्या विरोधामुळे वाद टाळण्यासाठी हा कार्यक्रम रद्द झाला असल्याची चर्चा आहे.
इंदुरीकर महाराज यांचा कार्यक्रम विद्यापीठात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर इथल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं. त्यावर घटनेने दिलेल्या अधिकारानुसार, स्त्री-पुरूष भेदभाव करणं अयोग्य आहे. त्यामुळं महाराजांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं प्रज्ञा पाटील हिने सांगितलं. तर इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्य चुकीचं असलं तरी त्यामागे त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घ्यायचं असल्याचं गिरिजा माने हिने सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)