राजस्थानच्या 97 वर्षांच्या आजी जेव्हा सरपंच होतात

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
- Author, मोहर सिंह मीणा
- Role, बीबीसी हिंदी
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातल्या नीमकाथाना ब्लॉकमधली पुरानाबास ग्राम पंचायत सध्या बरीच चर्चेत आहे. इथे 97 वर्षांच्या विद्या देवी पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. विद्या देवी स्वतः कधीच शाळेत गेल्या नाहीत. मात्र, स्त्री शिक्षणावर त्यांचा भर आहे.
26 जानेवारी रोजी विद्या देवी यांनी सरपंच पदाची शपथ घेतली. त्या राजस्थानमध्ये आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्वांत वयोवृद्ध सरपंच ठरल्या आहेत.
विद्या देवी यांनी याच वर्षी 1 फेब्रुवारी रोजी 98 वा वाढदिवस साजरा केला. अनेकांचा तर आयुष्याचा प्रवासच या टप्प्यापर्यंत पोचत नाही. मात्र, विद्या देवी यांनी या वयात लोकप्रतिनिधी बनण्याचा मान मिळवला आहे.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
पुरानाबासच्या गावकऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि गावाचा विकास होईल अशी आशा व्यक्त केली. जिंकून आल्यावर त्या निवडणुकीआधी दिलेली वचनं पूर्ण करण्यात व्यग्र झाल्या. त्यांनी गावात स्वच्छता अभियान सुरू केलं. त्यांच्या या कामाची साक्ष पुरानाबासचे स्वच्छ रस्ते देतात.
त्यावरून लोक त्यांना उपरोधिकपणेही बोलतात. तुम्हाला गावातला फक्त कचराच तेवढा दिसला का? असंही त्यांना काही लोक म्हणाले. त्यावर त्या म्हणतात, "मी त्यांना म्हणते की मोदीही उचलतात कचरा. गेल्या दोन सरपंचांच्या कार्यकाळाविषयी बोलताना त्या म्हणतात की दहा वर्षांत पहिल्यांदा तो सरपंच झाला. त्यानंतर त्याची बायको सरपंच झाली. पण कचरा कुणीच उचलला नाही. मी उचलला."

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
झुनझुनूच्या जहागीरदार कुटुंबात विद्या देवी यांचा जन्म झाला. त्या काळी सहसा मुलींना शाळेत पाठवले जात नसे. त्यामुळे विद्या देवीसुद्धा कधी शाळेत गेल्या नाहीत. मात्र, गावातल्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं, अशी विद्या देवी यांची इच्छा आहे. त्या म्हणतात, "त्या काळी कुणी मुलींना शिकवत नव्हतं. आता तर मुली खूप शिकतात."
गावकरी सांगतात की विद्या देवी स्वतः कधीच शाळेत गेल्या नसल्या तरी या वयातही त्या गावातल्या महिलांशी शिक्षणावर बोलतात.
या वयात थकवा येत नाही का, या प्रश्नावर त्या म्हणतात, "कुठलाच आजार नाही. शरीर निरोगी आहे. आता तर नरेंदर गेल्यानंतर डोळ्यांची दृष्टी थोडी कमी झाली आहे.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
मुलाच्या आठवणीने विद्या देवींचे डोळे पाणवले. 17 जानेवारी 2020 रोजी पुरानाबास ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती. 13 जानेवारी रोजी जयपूरमध्ये त्यांचा मुलगा नरेंदर यांचा मृत्यू झाला. तेव्हा गावात प्रचार करत असलेल्या विद्या देवी कुटुंबासोबत जयपूरला गेल्या.
त्यांचे चिरंजीव अश्विनी कुमार कृष्णिया म्हणतात, "घरातले सगळे जयपूरला जाताच गावात सरपंच पदाच्या उमेदवार विद्या देवी यांना आयसीयूमध्ये दाखल केल्याची अफवा पसरली. मात्र, लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या 270 मतांनी निवडून आल्या."
'पूर्ण कुटुंबच राजकारणात'
शेखावटी क्षेत्राच्या झुन्झुनू जिल्ह्यातल्या विद्या देवी यांचं एका शेतकरी कुटुंबात लग्न झालं आणि त्या सीकर जिल्ह्यातल्या पुरानाबास गावात आल्या. इथे त्यांचे सासरे सुबेदार सेडूराम सरपंच होते.
विद्या देवींचे चिरंजीव अश्विनी कुमार सांगतात की आजोबा त्याकाळी आठ गावांचे सरपंच होते. गावकऱ्यांच्या प्रत्येक समस्येवेळी ते हजर असायचे.
त्यांच्या सासऱ्यांचा विषय आला तर त्या म्हणतात, "माझ्या सासऱ्यांनी जे नाव कमावलं तसंच नाव मला कमवायचं आहे."

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
राजकारणाचा अनुभव आणि आत्मविश्वास त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. त्यांचे पती मेजर साहब हेसुद्धा 55 वर्षांपूर्वी सरपंचपदी निर्विरोध निवडून आले होते आणि त्यांनी गावातले बंद रस्ते खुले केले, असं विद्या देवी सांगतात.
पुरानाबास गावातच राहणारे 63 वर्षीय मोहर सिंह नीमकाथानामध्ये खाजगी नोकरी करतात. ते सांगतात, "सरपंचपदी निवडून येताच विद्या देवी यांनी स्वतःच्या पैशातून गावात स्वच्छता केली."
गावातल्या पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड जास्त असल्याचं मोहर सिंह सांगतात. विद्या देवी यांनी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. त्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करतील, असा विश्वास वाटत असल्याचं मोहोर सिंह सांगतात.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
आपण कधी सरपंच होऊ, असं वाटलं होतं का, असं विचारल्यावर विद्या देवी हसत हसत सांगतात, "मला तर कधी वाटलं नव्हतं. पण हा माझा नातू आहे ना मोटू तो म्हणाला आजी निवडणुकीला उभी हो आणि गावकऱ्यांनी निवडून दिलं."
विद्या देवी यांचे पती लष्करात मेजर होते. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने विद्या देवी गढवाल, महू, दिल्ली सह देशातल्या अनेक भागात राहिल्या आहे. त्या सांगतात, "मेजर साहेब दिल्लीत होते तेव्हा राष्ट्रपती भवनात गेले होते. सर्व अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं होतं. तेव्हा तिथे गेले होते."
50 वर्षांपूर्वी पुरानाबास गावाहून निघून 7 किमीवर असलेल्या नीमकाथानाला राहण्यास गेलेले कैलाश मीणा सामाजिक कार्यकर्ते आहेत.
'आजी जेव्हा जुन्या आठवणीत रमतात'
विद्या देवी सरपंचपदी निवडून आल्यानंतरची एक घटना सांगतात. त्या म्हणाल्या, "सरपंच झाल्यावर पोलीस जीपमध्ये बसवून घरी सोडणार होते. ते म्हणाले, या आई तुम्हाला जीपमध्ये बसवतो. तेव्हा मी हसून म्हणाले मला का बसवता. मी स्वतःच बसेन."

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
पूर्वी विद्या देवी पहाटे चार वाजता उठायच्या. मुलांना कुशीत घेऊन जात्यावर दळण दळायच्या. विहीर दूर होती. तिथून पाणी आणायच्या. दोन घागरी डोक्यावर घेऊन पायऱ्या चढून जावं लागायचं.
जुने दिवस आठवून त्या म्हणतात,"पूर्वी फार मेहनत करायची." मग स्वतःच आपल्या हातावर टाळी देत म्हणाल्या, "आता तेवढं जमत नाही."
'त्यांच्या अनुभवाचा गावकऱ्यांना फायदाच होईल'
जेएनयू दिल्लीचे सहप्राध्यापक गंगासहाय मीणा म्हणतात, "97 वर्षांच्या वयोवृद्ध आजी निवडून येणं राजकारणात वयोमर्यादेला गौण ठरवतं. त्या गावाला जेवढं ओळखतात कदाचित कुणीच तेवढं ओळखत नसावं. या वयाच्या एखाद्या व्यक्तीला, ते ही एका महिलेला लोकांनी निवडून दिलं ही अभिमानाची बाब आहे. गावाच्या विकासात त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी आशा मला आहे."
पुरानाबास ग्रामपंचायतीतल्या बांकली गावतील एक शेतकरी मूलचंद म्हणतात, "97 व्या वर्षी इतकं सक्रिय मी कुणीच बघितलेलं नाही. विद्या देवी कायम वृद्धांना निवृत्ती वेतन, गावात स्वच्छता, मुलांना शिक्षण देण्याविषयी बोलत असतात." मूलचंद स्वतः 70 वर्षांचे आहेत. 2000-2005 या काळात ते स्वतः गावचे उपसरपंच होते. ते म्हणतात, "उनके (विद्या देवी यांचे) विचार चांगले आहेत. त्या काम करतील."
तर विद्या देवी म्हणतात, "मरणानंतरही लोकांनी लक्षात ठेवावं, असं काम करून दाखवायचं आहे."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








