राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नव्या ऑफिसमधील 'त्या' बॅनरचा अर्थ काय?

राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, Twitter

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि यावेळी निमित्त आहे त्यांचं नवं कार्यालय.

अहमदगरमधील श्रीरामपुरात विखे पाटलांनी नवं कार्यालय उघडलंय. मात्र, या कार्यालयात लावलेलं बॅनर सध्या चर्चेचं केंद्र बनलंय.

विखेंच्या कार्यालयातील बॅनरवर 'चलो एक पहल की जाए... नए रास्ते की ओर...' अशा दोन ओळी आणि केवळ फोटो आहे. बॅनरवर ना पक्षचिन्ह (भाजप), ना मोदी-शाहांचा फोटो.

राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, Getty Images

विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात फारसा प्रभाव दाखवू न शकल्यानं आणि त्यानंतर नगरमधील पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांनी पक्षाकडे विखे पाटलांविरोधात केलेल्या तक्रार केल्यानं विखे पाटील काहीसे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळतायत.

या फोटोमागे कसलंही राजकारण नाही. आपण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच पुढील राजकीय वाटचाल करू असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी बीबीसी मराठीला म्हटलं आहे.

असं असलं तरी विखे पाटलांच्या या बॅनरची चर्चा अद्याप तरी थांबण्याचं नाव घेत नाहीये.

त्यांच्या कार्यालयातील बॅनरवरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जातायत. त्यामुळं बीबीसी मराठीनं या बॅनरचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

News image

मुळातच विखेंच्या कार्यालयातील बॅनरला इतकं महत्त्व येण्याचं कारण विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडी. त्यामुळं त्या घडामोडी काय होत्या, हे थोडक्यात पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल.

त्यातील निवडक घडामोडींवर एक नजर टाकणं महत्त्वाचं ठरेल:

1) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते पक्षात आल्यानं किमान नगरमध्ये मोठा प्रभाव पडेल, असा अंदाज असताना, नेमकं उलटं घडलं.

अहमदनगर जिल्ह्यातील 12 जागांपैकी केवळ 3 जागांवर भाजप विजयी झाली. त्यामुळं विखेंना घेऊन भाजपला किती फायदा झाला, हा प्रश्न तेव्हाच उपस्थित झाला होता.

2) दुसरं म्हणजे, भाजपचे जे उमेदवार पराभूत झाले, त्यांनी पक्षाकडे विखेंविरोधात तक्रार केली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर नजर असलेले वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलम सांगतात, "नगरमधील पराभूत भाजप उमेदवारांनी पक्षाकडे तक्रार केलीय की, विखेंमुळं आमचा पराभव झाला. प्रदेश पातळीवरुन आता चौकशीही सुरू आहे."

राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, Getty Images

3) तिसरी गोष्ट म्हणजे, राधाकृष्ण विखे आणि भाजपचे नगरमधील नेते राम शिंदे यांच्यात सख्य नाही. याबाबत विजयसिंह होलम सांगतात, "विखेंना राम शिंदे यांचा पहिल्या पासूनच विरोध होतात. आता या दोन्ही नेत्यांमध्ये तर उघड संघर्ष सुरू झालाय."

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांच्या श्रीरामपुरातील कार्यालयात लावण्यात आलेल्या बॅनरवरुन सुरू झालेल्या तर्क-वितर्कांकडे दुर्लक्ष करता येत नाही.

'विखे भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत'

सकाळ वृत्तपत्राच्या अहमदनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक बाळासाहेब बोठे पाटील हे विखेंच्या बॅनरबाबत लढवले जाणारे तर्क नाकारतात.

बोठे पाटील म्हणतात, "विखे कुटुंब कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. त्यांच्या मतदारसंघात ते स्वत:च पक्ष आहेत. त्यांना पक्षाची लेबलं नाहीत. तसंही ते ऑफिस विखेंचं स्वत:चं आहे, पक्षाचं नाही. त्यामुळं त्यांनी पक्षाचं नाव का टाकावं?"

विखे पाटलांची काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यताही बोठे पाटील खोडून काढतात. ते म्हणतात, "विखे आता कुठं भाजपमध्येच स्थिरस्थावर व्हायला लागलेत. काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा दहाव्या स्थानावर राहणं ते पसंत करणार नाहीत. त्यापेक्षा भाजपमध्येच स्थान बळकट करतील."

मात्र, नगरमधीलच वरिष्ठ पत्रकार अशोक निंबाळकर थोडं वेगळं मत नोंदवतात. ते म्हणतात, या बॅनरच्या माध्यमातून विखे पाटील भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत.

राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, Getty Images

"भाजपमध्येही त्यांना दबाव निर्माण करायचाय. माझ्यावर कारवाई करायला जाल, तर मी तिकडे जाऊ शकतो, असा मेसेज भाजपला त्यांना द्यायचाय," असं निंबाळकर म्हणतात.

नगरमधील पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर प्रदेश भाजपकडून चौकशी सुरू असल्याचा संदर्भ निंबाळकरांच्या अंदाजाला आहे.

निंबाळकरांच्या अंदाजाला वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलमही सहमती दर्शवून म्हणतात की, स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठीच विखेंनी सगळा प्रकार सुरू केलाय.

यावेळी विजयसिंह होलम 'विखे यंत्रणे'चा उल्लेख करतात. ते म्हणतात, "पक्ष वगळून राजकारण करण्याची विखेंची खासियत आहे. मात्र भाजपमध्ये राहून त्यांना ते काही जमत नाही. त्यात नगरमध्ये विखेंचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. विखे यंत्रणा असं तिला म्हणतात. काँग्रेसमध्ये ही यंत्रणा राबवणं शक्य होतं, मात्र आता भाजपमध्ये तसं करता येत नाही. त्यामुळं भाजपवर दबावासाठी हे सर्व सुरु आहे. पक्षांतर वगैरे ते करतील असं दिसत नाही."

भाजपवर दबावासाठी जरी विखे पाटील हे सर्व करत असले, तरी ते कधीही यू-टर्न घेऊ शकतात आणि फक्त लगेच न जाता, त्यासाठी वेळ साधतील, असंही अशोक निंबाळकर म्हणतात.

'काँग्रेसमध्ये गेले तर थोरातांचं नेतृत्व ते स्वीकारतील का?'

अशोक निंबाळकर यांची शक्यता खरी मानल्यास आणखी पुढे काही प्रश्न उपस्थित होतात. ते म्हणजे, काँग्रेसमध्ये जाण्याचा विखेंनी निर्णय घेतल्यास बाळासाहेब थोरात यांच्याशी असलेल्या संघर्षाचं काय?

याबाबत अशोक निंबाळकरच पुढे सांगतात, "बाळासाहेब थोरातही विखेंना पक्षात घ्यायचं झाल्यास फार विरोध करणार नाहीत. मात्र पक्षाला दाखवून देतील की, यांच्यावर (विखे पाटील) विश्वास ठेवायला नको. पक्षालाही मोठ्या नेत्यांची गरज आहे. काँग्रेसमध्ये थोरात-अशोक चव्हाण-पृथ्वीराज चव्हाण वगळता प्रभावी नेते नाहीत."

बाळासाहेब थोरात

फोटो स्रोत, Getty Images

"थोरातांचं नेतृत्व मर्यादित आहेत. ते फारसे प्रभावी नाहीत. विखे म्हटल्यावर अनेक गोष्टी होतात. लोकनेता काँग्रेसला का नको?" असा प्रश्न निंबाळकर उपस्थित करतात.

मात्र, विजयसिंह होलम हे विखे-थोरात संघर्षाची आठवण करुन देतात. ते म्हणतात, "नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्यात काँग्रेसमध्ये असल्यापासूनच संघर्ष आहे. आता बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष आहेत. जरी विखे काँग्रेसमध्ये परतले तरी थोरातांना 'बॉस' म्हणून सहन करावं लागेल."

शिवाय, विखेंमुळं नगर किंवा इतर ठिकाणी काँग्रेसला फायदा दिसून येत नाही, असंही मत होलम नोंदवतात.

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "जर एखादी व्यक्ती येण्यामुळं पक्ष बळकट होत असेल, तर अशा नेत्यांना घेण्याबाबत पक्ष नक्कीच विचार करु शकतो. "

आता रस्ता बदलण्याची गरज नाही - विखे पाटील

विखेंच्या कार्यालयातील बॅनरबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना बीबीसी मराठीनं राधाकृष्ण विखे पाटलांनाच याबाबत विचारलं.

विखे पाटील म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्‍ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली मी जो रस्‍ता स्वीकारलेला आहे, तो योग्‍यच आहे आणि मी त्यात समाधानी आहे. आता रस्‍ता बदलण्‍याची गरज नाही."

राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, Getty Images

"श्रीरामपूर येथील कार्यालय संपर्क कार्यालय आहे. ज्‍या फलकावरुन चर्चा सुरू आहे. त्‍यावरील वाक्‍य हे श्रीरामपूरची होत असलेल्या अधोगती संदर्भात आहे. भविष्‍यात या तालुक्‍यालाच आम्‍हाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचे असल्‍याने तो निश्‍चय या वाक्‍यातून आम्‍ही व्‍यक्‍त केला आहे," असं विखे पाटील म्हणाले.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)