राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडला, कारण...

राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राधाकृष्ण विखे पाटील
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसनं ज्या पद्धतीनं माझी कोंडी केली, ते सर्वांनी पाहिलं आहे, असं त्यांनी राजिनामा देतेवेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

राधाकृष्ण विखे यांनी गेली 5 वर्षं राज्यात विधान सभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नाव सतत चर्चेत होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कारण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी स्वत:च दिले आहेत. पण, विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष का सोडला? असा प्रश्न आता विचारला जातोय.

काँग्रेसचं धोरण चुकलं?

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतीत काँग्रेस पक्षाचं धोरण चुकलं, असं मत दैनिक लोकमतच्या नगर आवृत्तीचे प्रमुख सुधीर लंके व्यक्त करतात.

ते सांगतात, "गेली 5 वर्षं राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते असूनसुद्धा सरकारविरोधात मवाळ भूमिका घेतली. 2014मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसनं आक्रमक व्हायला हवं होतं, पण तसं झालं नाही. उलट त्यांनी मवाळ धोरण स्वीकारलं. काँग्रेस पक्षानं त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन कराला हवं होतं. विरोधी पक्षनेते म्हणून सक्षमपणे काम का करू शकत नाही, याचा जाब विचारायला हवा होता."

"दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत नगर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघातून उमेदवार लढवण्याची विखेंची इच्छा होती. पण, त्याकडेही काँग्रेसनं कानाडोळा केला. यामुळे मग विखेंच्या मुलानं सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नगरची जागा जिंकली. या माध्यमातून विखेंनी त्यांची जिल्ह्यातली ताकद सिद्ध केली," लंके पुढे सांगतात.

राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील

फोटो स्रोत, DR SUJAY VIKHE PATIL/ FACEBOOK

फोटो कॅप्शन, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यासुद्धा या मताशी सहमती दर्शवतात.

त्यांच्या मते, "राधाकृष्ण विखे पाटील यांना असं वाटत होतं की, आपल्या मुलाला म्हणजेच सुजय विखे यांना आघाडीकडून नगरचं तिकीट मिळेल. पण ते काही मिळण्याची शक्यता दिसली नाही, मग त्यांच्या मुलानं भाजपमध्ये प्रवेश केला. खरंतर निवडून येण्याची क्षमता असताना देखील काँग्रेसनं आपापसातल्या वादामुळे विखेंना तिकीट नाकारलं. मग विरोधी पक्षनेत्यालाच पक्षात हे स्थान असेल, तर पक्षात राहायचं तरी कशासाठी हा प्रश्न विखेंच्या मनात आला असेल."

बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे पाटील

विखेंच्या भाजप सोडण्याला आणखी एक बाब कारणीभूत असू शकते, अशी शक्यता लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे व्यक्त करतात.

ते म्हणतात, "नगरच्या राजकारणात राधाकृष्ण विखे- पाटील आणि बाळासाहेब थोरात हा संघर्ष नेहमीच राहिला आहे. काँग्रेसमध्ये राजीव सातव, हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचा एक गट आहे. यामुळे मग बाळासाहेब थोरात यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं कायम निमंत्रित सदस्याचं पद गेलं. आणि थोरात यांचं जिल्ह्यातील वर्चस्व वाढत गेलं.

डॉ. सुजय विखे-पाटील

फोटो स्रोत, FACEBOOK/SUJAY VIKHE-PATIL

"याशिवाय थोरात आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत. सुजय विखे यांना तिकीट मिळू नये म्हणून जी व्यूहरचना करण्यात आली, त्यात थोरात सामील होते, असंही म्हणतात. त्यामुळे मग नेतृत्वाच्या बाजूला विखे मागे पडत चालले होते."

सत्तेला पसंती?

राधाकृष्ण विखे यांनी नेहमीच सत्तेसोबत राहणं पसंत केलं, असं लंके यांना वाटतं.

ते सांगतात, "नगरमधील सगळेच नेते जिल्ह्यापुरताच विचार करतात. कारण राज्यातील सगळ्यांत मोठा जिल्हा आणि 12 विधानसभा मतदारसंघ आहेत.

"या मतदारसंघात सत्ता मिळवून हे नेते जिल्ह्यावरील वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण जिल्ह्यातील राजकारण सहकाराचं आहे. सत्ता गेली की, सगळ्या संस्था, कारखाने ताब्यातून जातील, अशी भीती या नेत्यांना असते. विखे पाटील यांचा विचार केला तर त्यांनी नेहमीच सत्तेसोबत राहणं पसंत केलं. यावेळेस तर त्यांनी काँग्रेसची विचारसरणी आणि तत्त्वांना तिलांजली देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला."

विठ्ठलराव विखे, बाळासाहेब विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, विठ्ठलराव विखे, बाळासाहेब विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील

अशोक तुपे यांच्या मते, विखे कुटुंबीयांचं राजकारणाविषयीचं निरीक्षण खूप चांगलं आहे.

ते सांगतात, "राधाकृष्ण विखे यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील काँग्रेसमधून शिवसेनेत गेले होते. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांनी वाजपेयी मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं. पण, शिवसेना-भाजपचं पतन होत आहे, हे लक्षात आल्यावर ते परत काँग्रेसमध्ये आले.

असंच राधाकृष्ण विखे पाटील यांचं आहे. भाजप-सेना सत्तेत येईल, असं विखे यांना समजलं होतं. त्यामुळेच मग त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजपशी चांगले संबंध ठेवले."

काँग्रेसच्या इमेजवर परिणाम?

विखेंच्या भाजपमध्ये जाण्यानं काँग्रेसच्या इमेजवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील, असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई नोंदवतात.

ते म्हणतात, "राधाकृष्ण विखे पाटील हे फार काही प्रभावी नेते नाहीत. पण ते ज्या भागातून येतात त्या अहमदनगर आणि शिर्डीमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा झाला आहे. विखेंच्या भूमिकेमुळे तिथं काँग्रेस संपल्यात जमा आहे. विखेंच्या भाजपमध्ये जाण्याने काँग्रेसच्या इमेजवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहेत."

पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण

फोटो स्रोत, Getty Images

"राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्यान काँग्रेस पक्षात नेतेही उरणार नाहीत. कारण अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. सुशीलकुमार शिंदेही निवडणूक हरले आहेत. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडलं आहे," असं ते पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)