Delhi Results: सत्यजीत तांबे यांची काँग्रेस पक्षावर पराभवाबाबत टीका #5मोठ्याबातम्या

सत्यजित तांबे

फोटो स्रोत, facebook

आजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :

1. सत्यजित तांबे यांचा पक्षाला घरचा आहेर

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना देखील आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिल्याची बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

सत्यजित तांबे म्हणाले, "काँग्रेसला खातंही उघडता न आल्याने भाजप आनंदी आहे. भाजपचा पराभव होऊन ते सत्तेपासून दूर राहिल्याने काँग्रेस आनंदी आहे. मात्र माझ्यासाठी आपचा दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजय जास्त महत्त्वाचा आहे. आपण (काँग्रेसचे नेते) यावर विचार करणार आहोत की नाही? की आजचा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच असणार आहे?"

त्यांच्याप्रमाणेच काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही पक्षाने जागी होण्याची गरज असल्याचं ट्वीट केलंय. "आम्ही पुन्हा उद्ध्वस्त झालो. आत्मपरीक्षण करणं आता पुरे झालं. आता कृतीची गरज आहे," असं त्या म्हणाल्या. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

2. आसामची NRC यादी अधिकृत वेबसाईटवरून गायब

आसामच्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) यादीतील माहिती अचानकपणे NRCच्या अधिकृत वेबसाईटवरून नाहीशी झाली आहे. या यादीत NRC यादीत समाविष्ठ करण्यात आलेल्या तसेच यादीतून वगळण्यात आलेल्यांची नावे होती.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ही यादी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

News image

आसामचे विरोधी पक्ष नेते देबब्रता सैकिया यांनी मंगळवारी रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांना ऑनलाईन माहिती नाहीशी होण्याबाबत पत्र लिहिलं. त्यावर "सदर माहिती क्लाऊड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आली आहे. या क्लाऊड स्टोरेजची मुदत संपल्यामुळे ती दिसू शकत नाही. क्लाऊड स्टोरेजची मुदत वाढवून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं उत्तर सरकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे."

3. आप आमदाराच्या ताफ्यावर हल्ला, 1 ठार

आम आदमी पक्षाचे दिल्लीतील महरौली येथील आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री हल्ला झाला. ही बातमी दैनिक लोकसत्ताने ली आहे.

यादव जेव्हा मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते, तेव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अरुणा असफ अली मार्गावर हल्ला करण्यात आला. यात आपचे कार्यकर्ते अशोक मान यांचा मृत्यू तर अन्य एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नरेश यादव

फोटो स्रोत, Ani

दुसरीकडे, पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये शिवसेनेचे युवा नेते हनी महाजन यांच्यावर गोळीबार झाला. त्यामध्ये ते जखमी झाले. गोळीबारानंतर महाजन यांना तातडीने गुरुदासपूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मात्र या वेळी बाजूच्या एका दुकानदाराला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही बातमी ट्रायब्यून इंडियाने दिली आहे.

4. कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीने एकाची आत्महत्या

कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या भीतीपोटी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात घडली. बालकृष्णय्या असं आत्महत्या केलेल्या 54 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. द न्यूज मिनिट वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

बालकृष्णय्या हे मूत्राशयाच्या संसर्गाने ग्रस्त होते, पण आजारपणाची लक्षणं कोरोना व्हायरसची असल्याचा त्यांचा गैरसमज झाला. डॉक्टर तसंच कुटुंबीयांनी समजावून सुद्धा त्यांच्या मनातील संशय दूर होऊ शकला नाही.

कोरोना व्हायरसच्या धास्तीतून त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना आपल्यापासून दूर जाण्यास सांगितलं. ते जवळ आल्यास त्यांनाही लागण होईल असं ते म्हणायचे. याच भीतीतून त्यांनी पुढे आत्महत्या केली, असं बालकृष्णय्या यांच्या मुलाने सांगितलं आहे.

5. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 6 मार्चला

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवारपासून (24 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला सादर होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

सकाळने ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्र विधानभवन

फोटो स्रोत, Maharashtra dgipr

विधानभवनात विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी परब म्हणाले, "अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये 18 दिवस कामकाज होईल. 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.

"2014-15, 2015-16 आणि 2016-17 या वर्षाच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर करण्यात येतील. तसंच अधिवेशनात पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडून विचारात घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर पाच अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे प्रस्तावित आहे," असंही ते म्हणाले.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)