'शाळेतील बाबरीच्या नाटकाला एक न्याय आणि NRCच्या नाटकाला दुसरा न्याय, असं का?'

शाहीन स्कुल
    • Author, दिप्ती बत्थिनी
    • Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये एका शाळेत स्नेहसंमेलनादरम्यान 9 ते 12 वर्षं वयाच्या मुलांनी सादर केलेल्या नाटकामुळे एका शिक्षिकेला आणि एका विद्यार्थिनीच्या आईला तुरुंगात जावं लागलं आहे. इतकंच नाही तर या शाळेतल्या मुलांचीही पोलिसांनी चौकशी केली.

नझबुन्नीसा (26) असं या आईचं नाव आहे. नझबुन्नीसा सिंगल मदर आहेत आणि घरकाम करून उदरनिर्वाह चालवतात. 30 जानेवारी रोजी नझबुन्नीसा आणि त्यांची मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेतल्या शिक्षिका फरिदा बेगम (52) या दोघींना अटक करण्यात आली. दोघींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीबीसी तेलुगूने बिदर कारागृहात या दोघींशी बातचीत केली. "आम्ही कणखर राहण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, आमचं आयुष्यच बदलून गेलं आहे," सांगताना दोघींच्या डोळ्यात अश्रू तरळले.

दरम्यान, देशद्रोहाच्या कलमाचा गैरवापर करण्यात आला, असं या दोघींच्या वकिलांचं म्हणणं आहे.

'खोटी माहिती' पसरवणे, 'मुस्लीम समाजात भीती निर्माण करणे' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करण्यासाठी मुलांचा वापर करणे, असे आरोप या दोघींवर लावण्यात आले आहे.

ज्या नाटकावरून नझबुन्नीसा आणि फरिदा बेगम यांना देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आली ते सुधारित नागरिकत्व कायद्यावर आधारित नाटक होतं.

केंद्र सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करत नवीन कायदा अस्तित्त्वात (CAA) आणला. या कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या भारताच्या तीन शेजारील देशांमधल्या बिगर मुस्लीम नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. मात्र, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशीप (NRC) देशभर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या मनोदयाच्या पार्श्वभूमीवर हा नवा कायदा आल्याने भारतातील 20 कोटी मुस्लिमांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

NRC अंतर्गत प्रत्येकाला आपण भारतीय असण्याचे पुरावे सरकारला द्यावे लागणार आहेत. मात्र, त्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत, हे अधिकाऱ्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही. मात्र, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून बिगर मुस्लिमांना भारताचं नागरिकत्व द्यायचा आणि NRCच्या माध्यमातून मुस्लिमांना देशाबाहेर हाकलण्याचा सरकाचा डाव असल्याचं या दोन्हींचा विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

केंद्रातल्या भाजप सरकारने मात्र, या आरोपांचं खंडन केलं आहे. भारतातल्या मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा

फोटो स्रोत, Getty Images

केंद्राच्या याच CAA आणि NRC विरोधात कर्नाटकातल्या एका शाळेत विद्यार्थ्यांनी नाटक सादर केलं. हे नाटक एका पालकाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रसारित केलं. बघता बघता नाटक व्हायरल झालं.

नीलेश रक्षल नावाच्या एका स्थानिकानेही नाटक पाहिलं. स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारे नीलेश रक्षल सांगतात की "नाटकातल्या एका दृश्यात एक तरुण मुलगा म्हाताऱ्या आजीकडे जातो आणि तिला म्हणतो तुम्ही आणि तुमचे पूर्वज भारताचे नागरिक आहात हे सिद्ध करणारी कागदपत्रं नरेंद्र मोदी तुम्हाला मागणार आहेत आणि कागदपत्रं सादर केली नाही तर तुम्हाला देश सोडून जायला सांगण्यात येईल.

यावर ती वृद्धा म्हणते मी अनेक पिढ्यांपासून इथेच राहतेय आणि कागदपत्रं मिळवण्यासाठी आता मला माझ्या पूर्वजांच्या कबरी खोदाव्या लागतील. त्यानंतर ती म्हणते 'चहा विकणारा मुलगा' (पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून) तिला तिची कागदपत्रं मागणार.

ती म्हणते पुढे, 'मी त्याला त्याची कागदपत्रं मागणार आणि त्याने ती मला दाखवली नाही तर मी त्याला चपलेने मारेन."

हे बघितल्यावर आपण तात्काळ पोलीस तक्रार दाखल केल्याचं रक्षल सांगतात.

'शाळेत मुलांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणं आणि द्वेषभावना पसरवणं' या आरोपाखाली त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

शाळेचे अध्यक्ष आणि शाळा व्यवस्थापन समितीतल्या इतरही काही जणांविरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी कोर्टाला कळवलं आहे. त्यांनी सध्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. ज्यावर 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

यावर प्रतिक्रिया देताना शाळेचे सीईओ तौसिफ मदिकेरी म्हणाले, "शाळेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला हे माहिती नाही. हे सामान्या माणसाच्या कल्पनेच्या पलिकडचं आहे. आम्ही याविरोधात कोर्टात लढा देऊ."

या प्रकरणात पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांचीही चौकशी केली. पोलीस विद्यार्थ्यांची चौकशी करत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चौकशीवरून बरीच टीकाही झाली.

मदिकेरी यांनी सांगितलं की एकदा पोलिसांनी बाल कल्याण अधिकारी उपस्थित नसताना विद्यार्थ्यांची चौकशी केली. मात्र, पोलिसांनी या आरोपाचा इनकार केला आहे.

मदिकेरी म्हणाले, "पाच वेळा विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. हा मुलांचा मानसिक छळ आहे. याचे त्यांच्या मनावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात."

शिक्षक
फोटो कॅप्शन, रक्षल यांच्यामते नाटकामुळे द्वेष पसरत होता.

पोलिसांनी मुलांची पाच वेळा चौकशी का केली, असा सवाल कर्नाटकच्या बाल हक्क आयोगानेही पोलिसांना विचारला आहे. त्यावर सर्व विद्यार्थी एकावेळी हजर नव्हते, त्यामुळे वारंवार चौकशी करावी लागली, असं उत्तर पोलिसांनी दिलं आहे.

पोलिसांच्या चौकशीमुळेच नझबुन्नीसा आणि शिक्षिका फरिदा बेगम यांना अटक झाल्याचं मदिकेरी यांचं म्हणणं आहे.

तर पोलिसांच्या चौकशीमुळे आपली मुलगी शाळेत जायला घाबरत असल्याचं एका पालकाने सांगितलं.

ते म्हणतात, "माझ्या मुलीने सांगितलं की नाटकातले संवाद शिकवणारे शिक्षक कोण होते, असं पोलीस वारंवार विचारत होते. मला कळत नाही त्या नाटकात काय चुकीचं होतं. देशात जे घडतंय ते मुलं बघतात. त्यांनी सोशल मीडियावरून संवाद घेतले."

तर तुरुंगात असलेल्या नझबुन्नीसाही गोंधळलेल्या आहेत. आपल्याला का अटक झाली, त्यांना कळत नाहीय.

त्या म्हणतात, "माझी मुलगी घरी नाटकाचा सराव करत होती. पण, ते कशाबद्दल आहे, मला माहिती नव्हतं. NRC, CAA चा वाद काय आहे, हेसुद्धा मला माहिती नाही. मी तिचं नाटक बघायलाही गेले नव्हते."

तुरुंगात गेल्यापासून नझबुन्नीसा एकदाच आपल्या मुलीला भेटल्या आहेत. त्या म्हणतात, "काही मिनिटंच मी तिला भेटले. तेही मध्ये खिडकी होती. मला रडू कोसळत होतं. पण मी स्वतःला सावरलं. मला तिला आणखी घाबरवायचं नव्हतं."

नझबुन्नीसाची मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी राहतेय. ती रात्री झोपते घाबरून उठते, आईसाठी रडत असते, असं मैत्रिणीचे पालक सांगतात.

ते म्हणतात, "ती म्हणते आपल्या चुकीसाठी आपल्या आईला शिक्षा नको. जे घडलं त्याचा तिला पश्चाताप आहे."

शिक्षिका फरिदा बेगम यांना उच्च रक्तदाब आहे. त्यांना भविष्याची काळजी वाटतेय. त्या जेलमध्ये गेल्यामुळे आमच्या मुलीच्या लग्नात अडथळे येऊ शकतात, अशी भीती फरिदा बगेम यांचे पती मिर्झा बेग यांना वाटतेय.

ते म्हणाले, "जे काही घडतंय ते बरोबर नाही."

पण स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र सरकारनं उचलेल्या पावलावर आक्षेप घेतला आहे. धर्माच्या आधारावर भेदभाव होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

"दक्षिण कर्नाटकात एका शाळेत बाबरी मशिद पाडल्याचं नाटक करण्यात आलं होतं. त्या प्रकरणी फक्त एफआयआर होते आणि पण पुढे काही कारवाई होत नाही. पण बिदरच्या या प्रकरणात मात्र महिलांना अटक होते आणि लहान मुलांची चौकशी सुद्धा होते. हा कुठला न्याय आहे. मुलांनामध्ये आणून तुम्ही राजकारण का करत आहात" असा सवाल स्थानिक कार्यकर्त्या लक्ष्मी बावगी यांनी उपस्थित केला आहे.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)