जगजीत सिंह यांना जेव्हा विचारलं, 'आपकी आवाज में इतना दर्द कैसे है?'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वसुंधरा काशीकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
(गायक आणि संगीतकार जगजित सिंह यांचा आज जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतिंना दिलेला उजाळा.)
त्याच्या वडिलांना वाटत होतं की त्याने आयएएस अधिकारी व्हावं...त्यासाठी तो इतिहास या विषयात एम.ए. करत होता...संगीत, गझल याच्यामध्ये सगळं मन गुंतलेलं अन् हे एम.ए. इतिहास...सनावळ्या, करार-मदार, लढाया...काय कुठे मेळ बसेना...
वडिलांच्या प्रेमाचा आणि भयाचा दबाव..( हो तो काळ आई-वडिलांना घाबरण्याचा होता. आई-वडिल मित्र असण्याचा नव्हता)...शेवटी त्या मुलाचं मन बंड करून उठलं आणि कोणालाही न सांगता थोडेसे कपडे घेऊन तो तरुण सरळ घरातून निघाला आणि त्याने थेट मुंबई गाठली...तो तरुण म्हणजे गझल सम्राट जगजीत सिंग...!
इथपासून जगजीत सिंग यांचा बऱ्या- वाईटाचा, फायद्या-तोट्याचा, रीती-रिवाजांचा, व्यवहाराचा विचार न करता हृदयाचं ऐकण्याचा प्रवास सुरू झाला...डॉ. बशीर बद्र यांच्या शब्दात...
सोचा नहीं, अच्छा बुरा, देखा सुना, कुछ भी नहीं
मांगा ख़ुदा से रात दिन, तेरे सिवा कुछ भी नहीं..
मुंबई गाठल्यावर लग्नांमध्ये गाणी गाण्यापासून सर्व काही त्यांनी केलं. लग्न कार्यात गाण्याचे दोन फायदे होते. पैसे तर थोडेबहुत मिळायचेच पण मुख्य म्हणजे जेवणही मोफत मिळत असे. जाहिरातींसाठी जिंगल गाण्यापासून सुरूवात झाली. जिंगल गातानाच चित्राजींशी ओळख झाली. आणि मग पुढे ओळखीचं 'साथ-साथ' मध्ये रूपांतर झालं.
'जगजीत सिंह आणि चित्रा यांची कहाणी'
जगजीत-चित्रा जोडीला खऱ्या अर्थानं प्रचंड यश मिळालं ते The unforgettable या अल्बममुळे...मग माईलस्टोन, इकोज, इनसाईट, फेस-टू-फेस,बियाँड टाईम....और कारवाँ बनता गया..
सर्वांत लोकप्रिय, सर्वाधिक ऐकला गेलेला गझल गायक असं जगजीत सिंह यांचं वर्णन केल्यास चुकीचं ठरणार नाही. बेस असलेला, भरदार पण मुलायम आवाज..तरल शब्दफेक.. अचूक आणि सुरेख उच्चार...आणि या सर्वाला भावूक स्वरांची झालर...एवढं वर्णन करूनही काही तरी सुटलं आहेच...असं काहीतरी जे आपल्याला शब्दात पकडता येत नाहीये...असा जगजीत यांचा आवाज होता.
सुरूवातीला तलत मेहमूद यांच्या प्रभावाखाली असलेल्या जगजीत यांनी थोड्याच काळात स्वत:ची स्वतंत्र गायकी निर्माण केली. तलत मेहमूदच्या प्रभावामागची गंमत सांगायलाही मला आवडेल..चित्रा सिंग यांची जेव्हा जगजीतशी ओळख झाली तेव्हा जगजीत यांना कळलं की चित्राजींना तलत आवडतात.. त्यांना इंप्रेस करण्यासाठी त्यांनी तलतची असंख्य गाणी बसवली अन् ते तलत यांना फॉलो करू लागले. अर्थात जगजीत यांना स्वत:लाही तलत आवडत होतेच.

फोटो स्रोत, Getty Images
चित्राजींचं लग्न झालं आहे, त्यांना एक मुलगी आहे हे माहीत असताना सुद्धा जगजीत चित्राजींच्या प्रेमात पडले... पुढे चित्रा यांचा घटस्फोट झाला. जगजीत यांनी त्यांना लग्नासाठी विचारलं. चित्राजींनी नकार दिल्यावर दोन वर्ष जगजीत यांनी वाट बघितली. त्या काळात मुलीला सांभाळण्यापासून ते घरात बल्ब बदलेपर्यंत जगजीत सिंग यांनी चित्राजींना सर्व प्रकारची मदत केली. आणि अखेर चित्राजींनी होकार दिला..'और साथ साथ ग़ज़ल का सफ़र शुरू हुआ..'
'गझलचं रूप बदललं'
या जोडीनं एक से बढकर एक गझल रसिकांच्या पदरात टाकल्या...जे यश आणि लोकप्रियता या जोडीला मिळाली तसं दुसरं कोणतंच जोडपं मला संगीत क्षेत्रात दिसत नाही.
बहुत पहले से उन कदमों की आहट जान लेते है असो की, इक ना इक शम्मा अंधेरे में जलाये रखिये..
बाद मुद्दत उन्हे देखकर यूँ लगा असो की, किया हैं प्यार जिसे हमने ज़िंदगी की तरह
किती यादी देऊ. गझलला भव्य राजेशाही राजवाड्याच्या दिवाणखान्यातून उचलून मध्यमवर्गीय माणसाच्या बैठकीच्या खोलीत आणण्याचं निर्विवाद श्रेय केवळ जगजीत आणि जगजीत सिंग यांनाच जातं.
बेगम अख़्तर, फरिदा ख़ानुम, मेहदी हसन, गुलाम अली यांच्या गझला या शास्त्रीय संगीताच्या ख्याल, ठुमरी गायकीचा बाज असलेल्या गझला होत्या. त्यांनी निवडलेल्या बहुतांश गझला या समजायला दुर्बोध अशा होत्या. त्यामुळे गझल ही विशिष्ट अभिजन वर्गापुरती सिमीत झाली होती.
हार्मोनियम आणि तबला अशा classy मोड मधून गझलेला काढून तिला जरा स्टायलीश 'मॉड लूक' देण्याचे काम जगजीत यांनीच केले. म्हणूनच सॅक्सोफोन असेल, गिटार असेल अशा वाद्यांचा मुबलक प्रयोग जगजीत यांनी गझलेत केला. सारंगी, संतूर अगदी टाळ सुद्धा जगजीत यांनी गझलेत वापरला आहे. त्यामुळे गझल चार्मिंग झाली, डायनॅमिक झाली. आणि तीला ऐकणारा वर्ग खूपच विस्तारला.
'जगजीत सिंह आणि पाकिस्तानचं नातं'
गाण्यासाठी गझल निवडतानासुद्धा जगजीत यांनी साधे-सोपे शब्द असलेल्या पण तेवढाच सुंदर भाव असलेल्या गझलांची निवड केली. त्यामुळे गझल अधिक पोहोचली. लोकांना गझल आपलीशी वाटू लागली. विशेषत: तरुण वर्ग गझलेकडे वळला.
त्यांच्या गझलांच्या अल्बमची नावही तुम्ही बघितलीत तर ती इंग्लिश होती असं दिसतं. उदाहरणार्थ In search, Unique, Someone somewhere… इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली असलेल्या तरुणांना डोळ्यासमोर ठेऊनच ही नावं दिली असावीत असं मला वाटतं.
पाकिस्तानमध्येही जगजीत ऐकले जायचे. 1999 साली ते पाकिस्तानला गेले तेव्हा मुशर्रफ यांना भेटले होते. स्वत: मुशर्रफ त्यांच्या गझलांचे प्रचंड चाहते होते. मुशर्ऱफ यांच्या घरी जगजीत गझल गायले आणि मुशर्रफ यांनी तबला वाजवला. मेहदी हसन यांना आर्थिक मदत म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कन्सर्ट्स पण आयोजित केल्या होत्या.
'शायरीची जाण'
कंपोझ करण्यासाठी गझल निवडणे सोपे काम नाही. त्यासाठी भाषेचा अभ्यास लागतो. आणि अर्थाची जाण.. त्यांची उर्दूची बैठक पक्की होती.
डॉ. बशीर बद्र, निदा फ़ाज़ली, क़तील शिफाई, फिराक़ गोरखपुरी, अशा उत्तमोत्तम शायरबरोबर त्यांनी काम केलं. जावेद अख़्तर यांच्यासोबतही 'सिलसिले' आणि 'सोज़' हे अल्बम जगजीत यांनी केले आहेत. तर 'मरासिम' हा एक अप्रतिम अल्बम गुलज़ार यांच्या सोबत केला आहे.
क़तील शिफाई यांच्या गझलांवर माईलस्टोन तर निदा फ़ाज़ली यांच्या गझलांवर इनसाईट नावाचा अख्खा अल्बम जगजीत यांनी काढलाय. निदा फ़ाज़ली आणि जगजीत यांचे खूपच प्रेमाचे संबंध होते.

फोटो स्रोत, Getty Images
निदांच्या गझलांना जगजीत यांच्या आवाजाने नवी ओळख दिली..त्यातली होशवालों को ख़बर क्या बेख़ुदी क्या चीज़ है .. ही निदांनी लिहलेली गझल...तिने जगजीत यांना नवी ओळख दिली असं म्हणता येईल..सफ़र धूप तो होगी जो चल सको तो चलो किंवा दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है असेल किंवा अपनी मर्जी से कहा अपने सफ़र के हम है असेल...या गझला पृथ्वीच्या अंतापर्यंत चालतील यात शंका नाही.
'पार्श्वगायनापेक्षा हा त्यांचा प्रांत नव्हता'
'अर्थ' आणि 'साथ साथ' हे दोन चित्रपट सोडले तर बाकी चित्रपटात जगजीत यांनी एखाद-दुसरी गझल वा गाणं म्हटलं आहे.
'प्रेमगीत' मध्ये होटों से छूलो तुम, 'सरफरोश' मधली होशवालोंको ख़बर क्या, 'जॉगर्स पार्क'मधली बड़ी नाज़ूक है मंज़िल, 'लीला'तलं जाग के काटी सारी रैना, 'तरकीब' मधलं किसका चेहरा अब मैं देखू..'वीरज़ारा' तलं धीरे धीरे आँखो में छा रहें हो.. अशी कितीतरी नावं घेता येतील.
अर्थात प्ले बॅक सिंगिंग हा आपला प्रांत नाही हे जगजीत यांना पूर्वीच लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांना या प्रकाराकडे जास्त लक्ष दिलं नाही.
'सिलसिले' या जावेद अख़्तर यांच्या सोबत केलेल्या अल्बम नंतर मात्र जगजीत काहिसे एकसुरी झाले होते. त्यांच्या कंपोझिशनमध्ये तोच तोचपणा येऊ लागला होता. माझ्या एका मित्राशी चर्चा करताना मी म्हटलंही की, जगजीत यांनी दुसऱ्यांकडून गझला कंपोझ करुन मग गाव्यात. त्यांच्या प्रतिभेचा ज्वर ओसरला असावा कदाचित.
'भर मैफिलीत रडत'
कलावंत, मोठी माणसं आणि दु:ख यांचं काय गणित आहे ते कळायला खरंच मार्ग नाही. अनेक कलावंताच्या वाट्याला अपत्य शोकाचं महाभयाण असं दु:ख वाट्याला आलेलं आहे. श्रीराम लागू, सुरेश भट, प्रभाकर पाध्ये, प्रोतिमा बेदी ही नावं बोलकी आहेत. तिकडे कार्ल मार्क्स असेल किंवा प्रसिद्ध नृत्यांगना इसाडोरा डंकन असेल...किंवा आपल्याकडे ग़ालिब असतील..ग़ालिब यांची सात मुलं त्यांच्यासमोर गेलीत.
1990 साली जगजीत यांचा एकुलता एक मुलगा विवेक कार अपघातात वारला. अतिशय भीषण असा दिवस होता तो जगजीत आणि चित्रांसाठी.
28 जुलै 1990 नंतर चित्रा सिंग यांचा आवाज कोणीही ऐकला नाही. चित्रा सिंग यांनी गाणं कायमचं सोडलं. जगजीत हे एक वर्ष गायले नाहीत. त्यानंतर जगजीत परत गायला लागले. जगजीत यांच्यासाठी गाणं आणि गझल हाच दु:खावर तात्पुरती का होईना मात करण्याचा उपाय होता. त्यानंतर कित्येकदा गझल गाताना जगजीत भर मैफिलीत गझल गाताना अचानक भडभडून रडत असत.
बेनाम सा ये दर्द ठहर क्यूँ नहीं जाता
जो बीत गया है वो गुज़र क्यूँ नहीं जाता...हे जगणं त्यांच्या वाट्याला आलं होतं..
विवेकला जगजीत-चित्रा 'बाबू' म्हणायचे. तो उत्तम ड्रम वाजवत असे. त्यांच्या म्युझिक कन्सर्ट्समध्ये त्यांना मदत करत असे. अत्यंत देखणा असा मुलगा. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी Someone Somewhere हा अल्बम काढला.
'आपकी आवाज इतना दर्द कैसे?'
एकदा जगजीत यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला होता की, 'आपकी आवाज़ में इतना दर्द हैं इसका क्या राज़ हैं'...जगजीत यांनी मोठं अंतर्दृष्टी असलेलं उत्तर दिलं होतं. जगजीत म्हणाले, 'ज़िंदगी के बारें में गहराईसे सोचना शुरू किजीये. आवाज़ में दर्द अपने आप आयेगा'.
निदा फ़ाज़लींच्या पत्नी मालती जोशी-फ़ाज़ली यांनी सांगितलं, की "जगजीत त्या काळात प्रचंड सैरभैर झाले होते. कित्येकदा रात्र रात्र ते निदाजींकडे येऊन बसत. निदांशी बोलत. त्या काळात निदांनी त्यांना खूप साथ दिली. योगायोग किती विलक्षण आहे...जगजीत यांचा 8 फेब्रुवारी हा वाढदिवस तर निदा फ़ाज़ली यांचा मृत्यूदिवस.."
माझी आणि त्यांची एकदाच भेट झाली. मी आणि माझा मोठा भाऊ अंधेरीला त्यांच्या स्टुडिओत गेलो. गप्पा गोष्टी झाल्या. चित्रा सिंह बसल्या होत्या. मी चित्रा सिंह यांच्याजवळ गेले. त्यांना म्हणाले, चित्राजी मैंने आपकी सारी की सारी ग़ज़ले सुनी हैं..त्यांना बहुदा मी खोटं बोलतेय वाटलं असावं. मग मी त्यांना म्हटलं, 'ये किसका तसव्वूर हैं से लेकर...इक ना इक शम्मा तक...तुम आओ तो सही तक..'
तेव्हा त्यांना वाटलं की मुलगी जेन्युईन आहे. मग त्यांनी स्वत: माझ्यासाठी चहा केला. मग जगजीत सिंह यांच्याशीही थोड्या-फार गप्पा झाल्या.
जिंदादिल...साधा माणूस...जगजीत...तुम्ही अपार आनंद दिला...भावनांचा निचरा केला..तुमच्या गझलांनी आयुष्यातले अनेक क्षण साजरे केलेत..आजही निराशेत तुमची गझलच साथ देते...
तबीयत अपनी घबराती है, जब सुनसान रातों में
हम ऐसें में तेरी यादों की चादर तान लेते है.....
जगजीत तुमचे अनंत उपकार आहेत. कलावंताचं हेच भाग्य की तो अमरच असतो...तुम्ही आहातच...तुम्हाला जन्मदिनाच्या असंख्य शुभेच्छा...!!
(वसुंधरा काशीकर या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्राध्यापक आहेत. या लेखात त्यांनी व्यक्त केलेली मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









