शरद पवार 2024 साली पंतप्रधान होऊ शकतात - रोहित पवार #5मोठ्याबातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1) शरद पवार 2024 साली पंतप्रधान होऊ शकतात - रोहित पवार

महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढल्यास 2024 शरद पवार भारताचे पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. औरंगाबादमधील कार्यक्रमात ते बोलते होते. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

"शरद पवारांवर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठं जातात, तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे त्याची माहिती घेतात," असं म्हणत रोहित पवार पुढे म्हणाले, "महाविकास आघाडी म्हणून लोकसभेत एकत्र येऊन लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही."

दरम्यान, यावेळी रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. "भाजप नेत्यांनी सरकार फोडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही, त्यांना आशेवर राहू द्या," असं ते म्हणाले.

2) NRC मध्ये हिंदू भरडले जातील - उद्धव ठाकरे

NRCचा त्रास केवळ मुसलमानांनाच होणार नाही, तर तुम्हा-आम्हाला आणि देशातील हिंदूंना, तसंच सर्व धर्मांना त्रास होईल, अशी भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं.

CAA हा कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही, या अमित शहांच्या वाक्याशी सहमती दर्शवत पुढे उद्धव ठाकरेंनी NRC ला मात्र विरोध दर्शवलाय.

उद्धव ठाकरे म्हणाले, "NRC केवळ मुसलमानांना त्रासदायक आहे, असं नाहीय. मुळात NRC येणार नाही. आम्ही येऊच देणार नाही. NRC चा त्रास हिंदूंसह सर्व धर्मियांना होईल."

"NRC मुळं आसाममध्ये 19 लाख लोकांना नागरिकत्व सिद्ध करायला लागलं. त्यात 14 लाख हिंदू आहेत. त्यात आमदार, खासदारांचे कुटुंबीयही आहेत," असंही उद्धव ठाकरे महणाले.

3) शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा 'आप'चा कार्यकर्ता - पोलीस

दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा कपिल गुज्जर हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलाय. दिल्ली पोलिसांनी कपिल गुज्जरचे 'आप'च्या कार्यक्रमातील काही फोटोही समोर आणले. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

आम आदमी पक्षानं मात्र दिल्ली पोलिसांचा दावा फेटाळलाय.

आरोपी कपिल गुज्जरचे वडील आणि भाऊ यांनीही दिल्ली पोलिसांचा दावा फेटाळला असून, त्यांनी आप पक्षात प्रवेश केला नसल्याचं म्हटलंय.

तर दुसरीकडे, देशभरात NRC लागू होणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयानं लोकसभेत दिलं. "संपूर्ण भारतात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदली लागू करण्याबाबत सध्यातरी कोणताही निर्णय घेतलेला नाही," अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.

4) विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे प्रशिक्षण आता 'यशदा'मध्येच

विद्यापीठ आणि महाविद्यालयीत प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांना पुण्यातील यशदा किंवा अध्यापक विकास संस्थेतच प्रशिक्षण देण्यात यावेत, दसे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

यशदा ही राज्य सरकारची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक शिक्षण पद्धतीतले बदल लक्षात घेऊन सरकारनं अध्यापक विकास संस्था स्थापन केली. या दोन संस्था वगळता कुठल्याही खासगी संस्थेत प्रशिक्षण दिले जाऊ नये, असे आदेश मंत्र्यांनी दिलेत.

विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण देत असल्यावरुन काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

5) PMC घोटाळा: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला RBIचं सुप्रीम कोर्टात आव्हान

पंजाब महाराष्ट्र बँक (PMC) प्रकरणात HDILची संपत्ती विकण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.

15 जानेवारी 2020 रोजी मुंबई हायकोर्टानं HDILची संपत्ती विकण्यासाठी माजी न्या. एस. राधाकृष्णन यांच्या नेतृत्त्वात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली होती.

HDIL कपंनीनं PMC बँकेचे बुडवलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले होते.

PMC बँकेत 4,355 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर RBI नं बँकेवर निर्बंध लादले. त्यामुळं हजारो खातेधारकांचे पैसे बँकेत अडकले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)