नगंगोम बाला देव- स्कॉटलंडच्या फुटबॉल क्लबकडून खेळणारी पहिली भारतीय महिला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
वयाची तिशी गाठेपर्यंत बहुतेक भारतीय महिला, अगदी खेळाडूही, लग्न करतात, मुलांचा जन्म होतो आणि अनेकींना आपलं करिअर सोडावं लागतं. पण नगंगोम बाला देवीसाठी तिसाव्या वर्षी फुटबॉलच्या मैदानात नवीन सुरूवात होणार आहे.
स्कॉटलंडच्या रेंजर्स फुटबॉल क्लबनं बाला देवीशी करार केल्याचं 29 जानेवरी 2020 रोजी जाहीर केलं. या करारामुळे बाला देवी ही जगात कुठेही कुठल्याही टीमशी व्यावसायिक करार करणारी पहिलीच भारतीय महिला ठरली.
भारतीय टीमच्या या माजी कर्णधारानं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहेच, पण भारतातल्या महिला फुटबॉलसाठीही ही नवीन पर्वाची सुरूवात आहे.
याआधी केवळ भारताची आदिती चौहान 2015 साली वेस्ट हॅम युनायटेड लेडीज संघाकडून खेळली होती. इंग्लंडच्या लव्हबरो विद्यापीठात शिकत असताना आदितीला ही संधी मिळाली होती. पण एखाद्या फुटबॉल क्लबसाठी व्यावसायिक करार मिळवणारी बाला देवी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.
मणिपूरची कन्या
तसं भारतात फुटबॉल लोकप्रिय असूनही, महिला फुटबॉलर्सच्या वाट्याला फारशी लोकप्रियता येत नाही. पण बाला देवी हे फुटबॉल प्रेमींच्या परिचयाच्या मोजक्या नावांपैकी एक नाव आहे.
ती मणिपूरची आहे. ईशान्य भारतातल्या या छोट्याशा राज्यानं गेल्या काही वर्षांत भारताला उत्तमोत्तम फुटबॉलर्स दिले आहेत.
"आमच्या नशीबानं मणिपूरमध्ये मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळं खेळात कारकीर्द घडवताना मला तसा कुठला त्रास झाला नाही. काही टोमणे ऐकावे लागले, पण ते माझ्या पथ्यावर पडलं, कारण त्यामुळं मला आणखी चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध करून दाखवावसं वाटलं."
बाला देवीला घरातूनच खेळाचा वारसा मिळाला आहे. तिच्या वडिलांना फुटबॉल खेळायला आवडायचं. त्यामुळंच बाला देवी आणि तिच्या बहिणीला फुटबॉल खेळण्याची प्रेरणा मिळाली. तिचे दोन्ही भाऊही खेळात रस घेणारे- त्यातला एक बॉडीबिल्डिंगकडे वळला.
"मला स्वतःला टेनिस खेळाडू व्हायचं होतं," बाला देवी हसत हसत सांगते. ती हँडबॉलही खेळायची, पण शेवटी फुटबॉलवर लक्ष केंद्रित केलं.

फोटो स्रोत, Getty Images
"मी अगदी लहानपणीच फुटबॉल खेळू लागले, कारण मला हा खेळ खरंच आवडला. मला फुटबॉलमध्ये रस होता आणि मी रोज आजूबाजूच्या मुलांसोबत खेळायचे. मी मुलगी असूनही माझ्या कौशल्याच्या जोरावर त्यांना हरवायचे."
बाला देवी रोनाल्डो, रोनाल्डिन्हो या ब्राझिलियन स्टार्सची चाहती आहे. सध्या खेळणाऱ्या फुटबॉलर्सपैकी तिला पुरुषांमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि महिलांमध्ये मेगन रॅपिनोचा खेळ आवडतो.
बेमबेम देवीकडून प्रेरणा
'भारतीय फुटबॉलची दुर्गा' म्हणून ओळखली जाणारी बेमबेम देवी हीसुद्धा मणिपूरची आहे आणि बाला देवीची आदर्श आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात 25 जानेवारीलाच बेमबेम देवीला पद्मश्री जाहीर झाला आहे. बेमबेम आणि बालाच्या या यशानं वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय महिला फुटबॉलमध्ये नवी जान ओतली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या आवडत्या खेळाडूविषयी बोलताना बाला देवी सांगते, "लहानपणापासूनच माझी बेमबेमसोबत खेळण्याची इच्छा होती. पण ती वयानं मोठी असल्यानं माझी इच्छा पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. मग 2002 साली आम्ही हैदराबादला झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मणिपूरसाठी एकत्र खेळलो होतो. तेव्हाही मी जेमतेम बारा-तेरा वर्षांची होते. पण मला बेमबेम दीदीसोबत वेळ घालवता आला आणि त्यामुळं मला आणखी चांगलं खेळण्याची प्रेरणा मिळाली."
बाला देवीला मग 2005 साली पंधरा वर्षांच्या वयातच भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. तेव्हापासून धाडस, सातत्य आणि समर्पित खेळामुळे ती भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनली आहे.
दखल घ्यायला लावणारी कारकीर्द
बाला देवी सध्या भारताकडून सर्वाधिक गोल करणारी महिला फुटबॉलर तर आहेच, पण ती आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आशियातून सर्वाधिक गोल करणारी महिला फुटबॉलरही आहे. भारताकडून खेळताना तिनं 58 सामन्यांत 52 गोल्स केले आहेत.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये बाला देवीनं 102 सामन्यांत 100 गोल्स केले आहेत. इंडियन विमेन्स लीगच्या गेल्या दोन मोसमातली ती सर्वोत्तम गोल स्कोरर आहे. भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) नं तिला 2015 आणि 2016 साली 'विमेन्स फुटबॉलर ऑफ द इयर' या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.
2010 सालापासून ती मणिपूर पोलिसांच्या सेवेत आहे आणि त्यांच्याकडूनच फुटबॉलही खेळते. बेमबेम देवी आणि आशालता देवीसोबत तिनं मालदीवच्या छोट्या लीग्जमध्येही सहभाग घेतला होता. आता रेंजर्स फुटबॉल क्लबकडून खेळून ती नवा इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे.
कसा झाला रेंजर्ससोबतचा करार?
अर्थात रेंजर्ससोबत कराराची वाट सोपी नव्हती. इंडियन सुपर लीग क्लब बंगलोर एफसीच्या प्रयत्नांनी हा करार प्रत्यक्षात आला. बंगलोर एफसीची रेंजर्स एफसीसोबत भागीदारी आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी महिला फुटबॉलवरही लक्ष केंद्रित केलंय. पण बंगलोरची महिला टीम नसल्यानं त्यांनी भारतीय महिला खेळाडूंना रेंजर्ससोबत खेळण्यासाठी पात्रता फेरीतून जाण्याची संधी दिली.
बाला देवीनं गेल्या नोव्हेंबरमध्ये काही दिवस स्कॉटलंडमध्ये ट्रायल्स दिल्या. " मी आधी युरोपियन देशांत खेळले होते आणि मला माहीत होतं, की मी सर्वोत्तम कामगिरी बजावली, तर रेंजर्ससोबत खेळण्याची संधी मिळू शकते."
करार झाला, तरी फिफा रँकिंग आणि वर्क परमिटसंदर्भातल्या नियमांचे अडथळे पार करणं सोपं नव्हतं. त्यासाठी मग AIFFच नाही, तर भारतीय फुटबॉलमधले दिग्गजही बाला देवीच्या पाठीशी उभे राहिले.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या पुढच्या प्रवासाविषयी बाला देवी सांगते, "मला खूप उत्साह आणि उत्सुकता वाटते आहे कारण हा दोन मोसमांसाठीचा करार आहे. आणि मला माझ्या नेहमीच्या दहा नंबरच्या जर्सीमध्येच खेळता येणार आहे. माझ्यासमोर फक्त चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे. मी काहीही खाऊ शकते, आणि मणिपूरची असल्यानं मला थंडीचीही सवय आहे. त्यामुळं स्कॉटलंडमध्ये जुळवून घेण्यास फारशी अडचण येणार नाही. मी फक्त तिथे जाणार आहे, मेहनत घेणार आहे आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी बजावणार आहे. त्यामुळं भारतातल्या नव्या पिढीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल."
भारतीय फुटबॉलमधलं नवं युग
रेंजर्स सोबतचा बाला देवीचा हा करार भारतीय महिला फुटबॉलपटूंसाठी आणखी नव्या संधी निर्माण करेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
खरं तर फुटबॉल हा आजही पुरुषप्रधान खेळ आहे असा समज आहे. पण ती परिस्थिती बदलते आहे, याकडे बाला देवीनं लक्ष वेधलं आहे. "मागचा महिलांचा वर्ल्ड कप हा सर्वाधिक प्रेक्षक लाभलेल्या स्पर्धांपैकी एक होता. भारतात आता अंडर-17 विश्वचषकाचंही आयोजन होणर आहे. आपण जर महिलांसाठी उत्तम लीग तयार करू शकलो, आणि अनेक लहान मुलींना खेळण्याची संधी मिळाली, तर बदल नक्की घडू शकतो. त्यासाठी मी जे काही करू शकते, ते मी करत राहीन."
मणिपूरमध्ये जिल्हा स्तरावरही खूप स्पर्धा आहेत, आणि त्यामुळं हे राज्य भारतीय फुटबॉलचं पॉवरहाऊस बनलं आहे, याकडे ती लक्ष वेधून घेते.
युवा खेळाडू आणि महिलांसाठी तिचा हाच संदेश आहे, "सरावानंच खेळ सुधारतो. मी 15 वर्षांच्या वयापासून देशासाठी खेळते आहे, पण आजही मैदानात गेल्यावर तेवढ्याच पोटतिडकीनं खेळते. प्रत्येक सराव सत्र तेवढ्याच गांभीर्यानं घ्यायला हवं. कसून मेहनत करा, मोठं ध्येय समोर ठेवा. प्रयत्न करत राहा."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









