रजनीकांत यांच्याविरोधात तामिळनाडूमध्ये का व्यक्त होतोय संताप?

फोटो स्रोत, Getty Images
द्रविडी चळवळीचे जनक ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांच्याविषयी सुपरस्टार रजनीकांत यांनी सार्वजनिकरित्या केलेल्या एका वक्तव्यावरून तामिळनाडूत सध्या राजकीय वादळ उठलं आहे.
तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे आणि 2021 ची निवडणूक लढवण्यासाठी आपण स्वतःचा पक्ष काढणार असल्याचं रजनीकांत यांनी 2017 सालीच जाहीर केलं होतं.
'तुघलक' या तामिळ मासिकाच्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्ताने 14 जानेवारी रोजी आयोजित एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी भाषण केलं होतं. या कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एस. गुरुमूर्ती, 'तुघलक' मासिकाचे संपादक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
काय म्हणाले रजनीकांत?
आपल्या भाषणात रजनीकांत यांनी म्हटलं होतं, "तामिळनाडुतील सालेममध्ये आयोजित केलेल्या एका रॅलीत पेरियार यांनी श्री रामचंद्र आणि सीता यांच्या चपलांचा हार घेतलेल्या नग्न मूर्ती फिरवल्या होत्या. ही बातमी कुणीही छापली नाही. मात्र, चो. रामास्वामी ('तुघलक' मासिकाचे संस्थापक आणि माजी संपादक) यांनी ही बातमी कव्हर पेजवर छापली होती."
"यावरून DMKची बरीच बदनामी झाली. त्यामुळे त्यांनी या मासिकाचे बरेच अंक जप्त केले. मात्र, 'तुघलक'ने तो अंक पुन्हा छापला. तो अंक ब्लॅकमध्ये विकला गेला होता. 'आणि अशा प्रकारे करुणानिधी यांनी तुघलकची प्रसिद्धी केली' असं मासिकाच्या पुढच्याच अंकात चो रामास्वामी यांनी कव्हर पेजवर छापलं होतं. यानंतर चो देशभरात लोकप्रिय झाले."
रजनीकांत यांचं हे भाषण व्हायरल झाल्यानंतर द्रवीड कळघम आणि इतर पेरियार समर्थक संघटनांनी रजनीकांत यांच्याविरोधात निदर्शनं सुरू केली. रजनीकांत यांनी धार्मिक भावना भडकावून सामाजिक अशांतता पसरवल्याचा आरोप करत तंतई पेरियार द्रविडर कळघम या संघटनेने त्यांच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल केली.
'मी त्या रॅलीचा भाग होतो'
1971 साली पेरियार यांनी ती रॅली काढली होती. तत्कालीन द्रमुक सरकारने हिंदुत्ववादी संघटना असलेल्या जनसंघाला पेरियार आणि त्यांच्या रॅलीला विरोध करण्याची परवानगी दिली होती.
पेरियार यांच्या रॅलीमध्ये द्रविड कळघमचे सरचिटणीस कली पुंगुंद्रन हेदेखील सहभागी होते. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "रजनीकांत त्या घटनेचं वास्तव मोडून-तोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. 24 जानेवारी 1971 रोजी अंधश्रद्धेविरोधात एक मोठी रॅली काढण्यात आली होती. त्याकाळचे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय संशोधक जी. डी. नायडू यांनी या रॅलीचं उद्घाटन केलं होतं. या रॅलीत पेरियार एका ट्रकमध्ये होते."
"दरम्यान, जनसंघाच्या लोकांना या रॅलीला 'काळे झेंडे' दाखवण्याची परवानगी मिळाली होती. पेरियार यांची गाडी गेली तेव्हा जनसंघाच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर चप्पल भिरकावली. पण ती त्यांना लागली नाही. चप्पलचा नेम चुकला आणि पेरियार ज्या ट्रकमध्ये बसले होते त्या ट्रकच्या मागच्या बाजूला ती लागली. यामुळे द्रवीडर कळघमचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी एका ट्रकमध्ये ठेवलेल्या रामाच्या फोटोला मारायला सुरुवात केली."
राजकीय प्रतिक्रिया
पेरियार यांच्या विचारधारेवर आधारित द्रविडर इयाक्का तमिळ पेरावई नावाची एक संघटना तामिळनाडूत आहे. या संघटनेचे संस्थापक सुबा वीरापंडियन म्हणतात, "1971 साली चो रामास्वामी यांच्या प्रपोगांड्याला अनेक जण बळी पडले आणि द्रमुक विरोधात अनेक निदर्शनं झालं. लोकांनी पेरियार यांचे पुतळे आणि फोटो जाळले. त्यावेळी पेरियार यांनी एक लेख लिहिला होता."
"त्या लेखाचं शीर्षक होतं, 'कॉमरेड्स शांत रहा (Stay Calm Comrades)'. या लेखात त्यांनी लिहिलं होतं, की ही निदर्शनं रामाच्या बाजूने किंवा पेरियार यांच्या विरोधात नाहीत. द्रमुक आगामी विधानसभा निवडणूक जिंकू नये, यासाठी ही निदर्शनं घडवली जात आहेत. त्यांनी मला जाळलं तरी काळजी करू नका. हे डावपेच आपल्यासाठी नवीन नाहीत. द्रविडी जनता आणि द्रविडी विचारसरणीसाठी पेरियार हा सर्व अपमान गिळायला तयार होते. चो किंवा रजनीकांत यांना हे कधीच कळणार नाही."
तामिळनाडुतील VCK पक्षाचे नेते आणि लोकसभा खासदार तोल तिरुमावलावन यांनी म्हटलं, "पेरियार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल रजनीकांत यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. संघ परिवाराच्या अजेंड्यासाठी रजनीने बळीचा बकरा बनू नये."

तामिळनाडू सरकारमधील मत्सव्यवसाय मंत्री जयकुमार यांनी या सर्व वादावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "एक काल्पनिक घटना सांगून रजनीकांत लोकांचं लक्ष वेधू इच्छितात. 50 वर्षांपूर्वी जे घडलं त्याविषयी ते आता का बोलत आहेत? अशाप्रकारची घटना घडलेलीच नव्हती, असा लेख 'इंडियन एक्सप्रेस'ने छापला आहे. स्वतः चो यांनीसुद्धा कोर्टात सांगितलं होतं, की लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ही माहिती छापली होती. याव्यतिरिक्त त्यांना काहीही माहिती नाही."
जयकुमार यांचा अण्णाद्रमुक पक्ष तामिळनाडूत भाजपचा मित्रपक्ष आहे.
'मी माफी मागणार नाही'
द्रविड कळघम बुधवारी (22 जानेवारी) रजनीकांत यांच्या चेन्नईमधल्या घराबाहेर निदर्शनं करण्यार होती. निदर्शनांपूर्वीच रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पेरियार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर माफी मागणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.

फोटो स्रोत, Getty Images
या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं, "अनेक जण म्हणत आहेत, की मी ज्या घटनेचा उल्लेख केला ती घटना कधी घडलीच नव्हती. माझ्याजवळ 'आउटलुक' मासिक आहे. हे मासिक 'द हिंदू' ग्रुपचं आहे. आउटलुकच्या 2017 सालच्या एका अंकात छापलेल्या लेखात या घटनेचा उल्लेख आहे. राम आणि सीता यांच्या मूर्तींना मारण्यात आलं आणि त्यांना चपलांचा हार घालण्यात आला होता, असं या लेखात म्हटलेलं आहे. जे घडलंच नाही ते मी बोललेलो नाही. हे कपोलकल्पित नाही. मी त्याविषयीच बोलतोय जे यापूर्वी अनेक जण म्हणाले आहेत आणि त्याविषयी छापूनदेखील आलं आहे. त्यामुळे मी नम्रपणे सांगू इच्छितो की मी माझ्या वक्तव्यासाठी माफी मागणार नाही."
'तो लेख मी लिहिला होता'
2017 साली आउटलुक मासिकाच्या एका अंकात 'The Tamil Gang Raj' या नावाने एक लेख छापून आला होता. तामिळनाडू सरकारवर टीका करणारं व्यंगचित्र काढणाऱ्या व्यंगचित्रकाराला झालेल्या अटकेविरोधात तो लेख लिहिण्यात आला होता. तोच लेख रजनीकांत यांनी पत्रकार परिषदेत दाखवला होता. तो लेख लिहिणारे पत्रकार जी. सी. सेकर यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.
या लेखात त्यांनी 1971 च्या रॅलीच्या फोटोसह चुकीची माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल तत्कालीन तामिळनाडू सरकारने चो. रामास्वामी यांच्याविरोधात कशी कारवाई केली, त्याचा उल्लेख केला आहे.
(ज्या ठिकाणी ती रॅली झाली त्या सालेममधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून आपण बातमी छापल्याचं म्हणत चो. रामास्वामी यांनी कनिष्ठ न्यायालयात माफी मागितली होती.)

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL / getty images
जी. सी. सेकर म्हणाले, "अनेक वर्षांपूर्वी टेलिग्राफसाठी काम करत असताना मी एका बातमीसाठी चो. रामास्वामी यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी त्यांच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. त्याचवेळी त्यांनी मला 1971 सालेम जिल्ह्यात झालेल्या रॅलीविषयी बातमी छापल्यामुळे आपल्याला आणि तुघलक मासिकाला तामिळनाडू सरकारकडून कसा त्रास सहन करावा लागला, याबद्दल सांगितलं. मीदेखील तो अंक त्यांच्या कार्यालयात बघितला होता."
पेरियार यांच्या मुद्द्याव्यतिरिक्त आउटलुक हे मासिक 'द हिंदू' ग्रुपचं नाही, यावरूनही नेटकरी रजनीकांत यांना ट्रोल करत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)










