रजनीकांत: माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न - #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न - रजनीकांत
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चा रजनीकांत यांनी फेटाळल्या आहेत.
"भाजपनं मला पक्षात येण्याचं आमंत्रण दिलेलं नाही. मात्र काही माध्यमं आणि ठराविक लोक माझं भगवणीकरण करण्याचा प्रयत्न करतायत," असं रजनीकांत म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
भाजपचे ज्येष्ठ नेते पोन राधाकृष्णन आणि रजनीकांत यांची नुकतीच भेट झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू झाली. मात्र, भाजपनंही रजनीकांत पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा केला नाही, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय.
2) यंदा ऑक्टोबरपर्यंत तब्बल 725 शेतकरी आत्महत्यांची नोंद
महाराष्ट्रात यंदा 725 शेतकरी आत्महत्या नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील 525 आत्महत्या शेतीच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे झाल्या असल्याचे प्रशासकीय पडताळणीतही समोर आलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images
जानेवारी ते मार्च या कालावधीत 60 पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद होती. एप्रिलमध्ये 71 आत्महत्या झाल्या होत्या. मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत हा आकडा वाढत गेला. जुलैमध्ये सर्वाधिक 85 आत्महत्यांची नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये 59 आत्महत्या झाल्या. म्हणजेच, ऑक्टोबरमध्ये हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
चार वर्षांचा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळं शेतकरी त्रस्त झालाय. आता पाऊस पडल्यामुळे आशा वाढली आहे. नुकसान झाले असले तरी पाणी असल्यामुळे रब्बी हंगामात अधिक चांगले पीक घेता येईल किंवा भाजीपालासह आणखी एक नगदी पीक घेता येईल, असं शेतकरी ठरवताना दिसतंय. मात्र, त्यासाठी विजेची उपलब्धता हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळं येत्या काळात पाणी उपसा करण्यासाठी विनाअडथळा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
3) भाजप-सेनेत केवळ मंत्रिपदासाठी वाद सुरू - सुभाष देशमुख
भाजप आणि शिवसेनेत केवळ मंत्रिपदावरून वाद सुरू आहे. जास्त जागा असणाऱ्याचा मुख्यमंत्री आणि त्या जागांच्या तुलनेत मंत्रिपदं, हा युतीचा जुना फॉर्म्युला आहे, असं माजी सहकार मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुभाष देशमुख म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter/@DeshmukSubhash
भाजप-शिवसेनेतला सध्याचा वाद मंत्रिपदावरून असून, वरिष्ठ नेत्यांनी यात लक्षही घातलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर तोडगा निघून सत्ता महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा दावाही सुभाष देशमुखांनी केला.
शिवसेना जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली, तर जनतेचा घोर अपमान होईल, असंही देशमुख म्हणाले.
4) अनिल अंबानींविरोधात तीन चिनी बँकांनी कोर्टाचं दार ठोठावलं
चीनमधील तीन मोठ्या बँकांनी रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांच्याविरोधात लंडनमधील कोर्टाचं दार ठोठावलं आहे. 680 मिलियन डॉलर (म्हणजेच, सुमारे 47,600 कोटी) न चुकवल्यानं खटला दाखल करण्यात आलाय. आज तकनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images
इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन बँकांनी अनिल अंबानींविरोधात कोर्टात धाव घेतलीय.
या आधीही अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीविरोधातील तक्रार कोर्टापर्यंत पोहोचली होती. एरिक्सन प्रकरणात अनिल अंबानींविरोधात खटला चलला होता. यात एरिक्सनला 550 कोटी देण्याचे आदेश अनिल अंबानींना देण्यात आले होते. त्यावेळी भाऊ मुकेश अंबानी हे अनिल अंबानींच्या मदतीला धावून आले होते.
5) सीबीआयच्या अधिकऱ्याविरोधात सीबीआयकडूनच खंडणीचा गुन्हा दाखल
गुजरातमधील व्यापाऱ्याकडून पाच कोटींची खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली सीबीआयच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा सीबीआयनेच दाखल केलाय. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images
ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईची धमकी देत या अधिकाऱ्यानं व्यापाऱ्याकडून खंडणीची वसुली केल्याचा आरोप आहे.
सुनील नायर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे पोलीस निरीक्षक म्हणून असलेल्या नायर यांनी शैलेश भट्ट या व्यापाऱ्याकडून गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खंडणी वसुली केली. या कटात किरीट मधुभाई पलाडिया यांचीही साथ मिळाली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








