भगत सिंह कोश्यारी: महाराष्ट्रात राहाता तर मराठी यायला हवी, शिका #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजचे पेपर आणि वेबसाईट्स यामध्ये आलेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या
1. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी: महाराष्ट्रात राहाता तर मराठी शिका
"महाराष्ट्रात राहाता तर प्रत्येकाला मराठी भाषा येणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात राहाता तर मराठी भाषा शिका," असं मत महाराष्ट्रचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे.
वाशी येथे उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनच्या लोकार्पण सोहळ्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान आणि एकतेची भावना आहे. मराठी आणि उत्तराखंडातील पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणं फारसं अवघड नाही," असं राज्यपालांनी म्हटलं.
2. जेफ बेझोस यांनी उपकार केले नाहीत - पीयूष गोयल
जेफ बेझोस यांनी भारतात एक अब्ज डॉलर (7,100 कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा करून उपकार केले नाहीत, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे.
"गेल्या वर्षी अॅमेझॉनने म्हटलं होतं की त्यांना 7-8 हजार कोटींचं नुकसान झालं. ते हे नुकसान कसं काय सोसू शकतात?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ई-कॉमर्स कंपन्यांनी भारतातील या क्षेत्रातील कायद्यांच्या कमतरतेचा गैरवापर करू नये असं गोयल यांनी स्पष्ट केलं, जेफ बेझोस हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

फोटो स्रोत, Piyush Goyal/ FACEBOOK
दरम्यान, देशाला आर्थिक प्रगतिपथावर नेण्याची दूरदृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे आहे, असं टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी म्हटलं. गांधीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या इंडियन स्कूल ऑफ स्किल्सच्या शिलान्यास समारंभावेळी ते बोलत होते. ही बातमी दैनिक भास्करने दिली आहे.
3. कट्टरतावादाला निष्रभ करण्यासाठी भारत सज्ज: बिपिन रावत
कट्टरतावादाला रोखण्यासाठी आणि जे कट्टरतावादी बनले आहेत त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना "डिरॅडिकलाझेशन कॅंप"मध्ये पाठवण्यात येईल, असं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी सांगितलं. ही बातमी स्क्रोलने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"जसं याआधी काश्मीरमध्ये कट्टरतावादाला खतपाणी घालण्यात आलं तसं देशात इतर ठिकाणीही दिसत आहे. तशा लोकांना वेगळं काढून त्यांना या छावण्यामध्ये पाठवलं जाऊ शकतं. सध्या काही छावण्या सुरू आहेत," असं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानमध्येही अशा प्रकारच्या छावण्या सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
4. प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट उधळला: श्रीनगर पोलीस
काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनी हल्ला करण्याचा कट जैश-ए-मोहम्मद या कट्टरतावादी संघटनेनी रचला होता. तो उधळण्यात आल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
ही बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.
अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, हातबॉंब आणि इतर सामुग्री जप्त केली आहे. प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याचा यांचा डाव होता, असं पोलिसांनी सांगितलं.
5. भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे करार जाहीर
काल भारतीय क्रिकेट संघाच्या पुरुषांच्या टीमचे नवे करार जाहीर करण्यात आले. त्याच बरोबर महिला क्रिकेट संघाचेही करार जाहीर करण्यात आले आहे. BCCIने एका प्रसिद्धिपत्रकात ही माहिती दिली आहे.
यामध्ये स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि पूनम यादव या तीन खेळाडूंना A ग्रेड म्हणजेच वर्षाला 50 लाख इतकं मानधन निश्चित करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ग्रेड Bमध्ये म्हणजेच वर्षाला 30 लाख रुपये मानधन असलेल्या गटात मिथाली राज, झूलन गोस्वामी, एकता बिश्त, राधा यादव, शिखा पांडे, दिप्ती शर्मा, जेमियाह रॉड्रिग आणि तानिया भाटिया यांचा समावेश आहे.
तर C गटात एकून 11 खेळाडू आहेत. वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी. हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकर, हरलीन देओल, प्रिया पुनिया आणि शेफाली वर्मा यांचा समावेश आहे.
या खेळाडूंना वर्षाला 10 लाख रुपये प्रत्येकी देण्यात येतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








