महात्मा गांधी : भारतीय नोटांवर गांधींजी कुठून आणि कसे आले?

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्येक देशाच्या चलनी नोटांवर काही विशिष्ट फोटो असतात. भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असावा हे कोणी आणि कधी ठरवलं?
प्रत्येक देशाची केंद्रीय बँक त्या त्या देशाचं चलन प्रसिद्ध करत असते. भारतामध्ये नोटा प्रसिद्ध करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेला आहेत. एक रुपयाची नोट मात्र भारत सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात येते.
भारताच्या चलनातल्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आहे. हा फोटो बदलून त्याजागी लक्ष्मी देवीचा फोटो छापावा, म्हणजे रुपयाची परिस्थिती सुधारेल असा सल्ला आधी सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला होता. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर महालक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे.
पण भारतीय चलनी नोटेवर कोणाचा फोटो असावा हे ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत?
चलनी नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटवला जाऊ शकतो का?
भारत स्वतंत्र झाल्यापासूनच चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापला जातोय का?
महात्मा गांधीजींच्या आधी नोटांवर कोणाचा फोटो होता आणि चलनी नोटेवर गांधीजींचा फोटो पहिल्यांदा कधी छापण्यात आला?
कसा झाला रुपयाचा प्रवास?
भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण देश 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा प्रसिद्ध करायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, RBI
रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर असणाऱ्या माहितीनुसार 1949 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेचं नवीन डिझाईन तयार केलं. यानंतर आता स्वतंत्र भारतासाठीचं नवं चिन्हं निवडायचं होतं.
ब्रिटनच्या राजाच्या जागी नोटेवर महात्मा गांधीचा फोटो लावण्यात येईल, असं सुरुवातीला मानलं जात होतं आणि त्यानुसार डिझाईनही तयार करण्यात आलं होतं. पण शेवटी महात्मा गांधींच्या फोटोच्या ऐवजी चलनी नोटेवर अशोक स्तंभ असावा, यावर एकमत झालं. याखेरीज चलनी नोटेच्या डिझाईनमध्ये फारसे बदल करण्यात आले नाहीत.

फोटो स्रोत, RBI
1950 मध्ये भारतीय प्रजासत्ताकात पहिल्यांदाच 2, 5, 10 आणि शंभर रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या.
2, 5 आणि शंभर नोटेच्या डिझाईनमध्ये फारसा फरक नव्हता, पण रंग वेगवेगळे होते. 10 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूला शिडाच्या होडीचा फोटो तसाच ठेवण्यात आला होता.
1953 मध्ये नवीन चलनी नोटांवर हिंदी प्रामुख्याने छापण्यात आली. रुपयाचं बहुवचन काय असेल, याविषयी चर्चा झाली आणि रुपयाचं बहुवचन 'रुपये' असेल असं ठरलं.

फोटो स्रोत, RBI
1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा छापण्यात आल्या. 1978 मध्ये या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.
म्हणजे 1978 मध्ये एक हजार, पाच हजार आणि 10 हजार रुपयांची नोटबंदी झाली होती.
दोन आणि पाच रुपयांच्या लहान चलनी नोटांवर सिंह, हरीण अशा प्राण्यांचे फोटो छापण्यात आले होते. पण 1975 मध्ये 100 च्या नोटेवर कृषी स्वावलंबन आणि चहाच्या मळ्यातून पानं खुडतानाचे फोटो दिसू लागले.
महात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.

फोटो स्रोत, RBI
20 रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा 1972 मध्ये चलनात आणली आणि याच्या तीन वर्षांनंतर 1975 मध्ये 50 ची नोट चलनात आणण्यात आली.
80च्या दशकात नवीन सीरीजच्या नोटा छापण्यात आल्या. जुने फोटो हटवून त्यांच्या जागी नवीन फोटो आले. 2 रुपयांच्या नोटेवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो होता. 1 रुपयाच्या नोटेवर तेलाची विहीर, 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरने शेत नांगरणारा शेतकरी, 10 रुपयांच्या फोटोवर कोणार्क मंदिराचं चक्र, मोर आणि शालीमार बागेचं छायाचित्रं होतं.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत होता आणि लोकांची खरेदी क्षमता वाढत होती. म्हणून रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या आणि यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र होतं. अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता.

फोटो स्रोत, RBI
सुरक्षिततेसाठीची नवीन फीचर्स असणाऱ्या महात्मा गांधी सीरीजच्या नोटा 1996 साली छापण्यात आल्या. वॉटरमार्कही बदलण्यात आले आणि अंध लोकांनाही नोटा ओळखता याव्यात यासाठीची नवीन फीचर्स यामध्ये सामील करण्यात आली.
9 ऑक्टोबर 2000 रोजी एक हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. भारतीय चलनामध्ये सगळ्यांत मोठा बदल दुसऱ्यांदा नोव्हेंबर 2016 ला करण्यात आला. 8 नोव्हेंबर 2016 ला महात्मा गांधी सीरीजच्या 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा अवैध घोषित करण्यात आल्या.
यानंतर 2000 रुपयांची नवीन नोट चलनात आणली गेली. यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








