हिंदू राष्ट्रवादाला आव्हान देण्यासाठी हे दलित ब्रॅंड्स सज्ज

- Author, चिंकी सिन्हा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतल्या एका महागड्या रिटेल स्टोअरमध्ये दलितांचा उद्धार आणि 'बहिष्कृतांचा' आणि फॅशनच्या दुनियेचा मेळ कसा घालता येईल, यावर शहरातले काही श्रीमंत चर्चा करत होते.
त्यावेळी 32 वर्षांचे सचिन भीमसाखरे बाहेर एका कोपऱ्यात उभे होते.
हे सगळं घडत होतं 5 डिसेंबरला. या दिवशी या स्टोअरमध्ये झालेल्या इव्हेंटदरम्यान 'चमार फाऊंडेशन'च्या सदस्यांनी तयार केलेल्या 66 रबर बॅग्सची विक्री झाल्याचं सचिन सांगतात.
डिझायनर सब्यसाची, राहुल मिश्रा आणि गौरव गुप्ता यांनी एक प्रोजेक्ट सुरू केलाय. चामड्याशी संबंधित कामं करणाऱ्या अनुसूचित जातींमधल्या 10 जणांचा यात समावेश आहे. सचिन भीमसाखरे यापैकीच एक आहेत.
याच प्रोजेक्टअंतर्गत या निवडक विशेष बॅग्स तयार करण्यात आल्या होत्या.

नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या 'चमार फाऊंडेशन'ला या बॅग्सच्या विक्रीतून मिळणारा निधी देण्यात येईल. वाकोला आणि सांताक्रूझमध्ये चमार फाऊंडेशन डिझाईन स्टुडिओ सुरू करणार आहे.
चामड्याच्या शिलाईच्या तंत्रातले बारकावे इथे स्त्री-पुरुषांना शिकवले जातील आणि त्यांना रबर बॅग्स तयार करण्याचं काम दिलं जाईल. या बॅग्सवर 'मेड इन स्लम' अशी टॅगलाईन असेल.
अपमानास्पद मानल्या जाणाऱ्या 'चमार' या जातीसूचक शब्दाला फॅशन ब्रँड बनवत त्याला मान देण्याचा यामागे हेतू आहे. अनुसूचित जातींसाठी 'चमार' शब्द वापरण्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे.

भीमसाखरे म्हणतात, "चमार म्हणजे - चामडं, मांस आणि रक्त. हे सगळं तर प्रत्येक सजीवाच्या शरीरात असतं. मग आमच्या कामामुळे आमच्याकडे अशा वाईट दृष्टिकोनातून का पाहिलं जातं?
दलित ब्रँड्स आणि दलित चळवळ
'बहुजन' दुकानांपासून ते 'जय भीम ब्रँड' आणि रबर बॅग्सद्वारे देशभरात एका नवीन आर्थिक मॉडेलद्वारे दलितांची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
जर दलित समाजाने, दलित ओळख असणारे, दलितांद्वारे तयार केलेले ब्रँड्स स्वीकारले तर यातून मिळणारा पैसा हा दलित समाजातल्या लोकांना आर्थिक स्वातंत्र्य देईल आणि समाजाच्या वर्चस्व गाजवणाऱ्या गटात या लोकांना आपलं स्थान मिळवण्यास याची मदत होईल, असा विचार यामागे आहे.
गेल्या काही वर्षांत जन्माला आलेले हे दलित ब्रँड्स भारतातल्या जाती व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी राजकारण आणि अर्थव्यवस्था या दोहोंची सरमिसळ करत आहेत.

यासाठीच समाजाशी संबंधित असणाऱ्या 'जय भीम' आणि 'बहुजन'सारख्या शब्दांचा जाणीवपूर्वक वापर केला जातोय.
2014च्या निवडणूक निकालांकडे बहुतांश दलित हे हिंदुत्ववादी शक्तींचा विजय म्हणून पाहतात. या निकालांनंतर आपण वेगळं पडण्याची भीती त्यांच्या निर्माण झालेली पहायला मिळते.
राजकीय ध्रुवीकरण आणि दलित मध्यमवर्गाचा उदय यामुळे दलित ब्रँडिंगचा जन्म झाल्याचं दलित समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे.
दलित लेखक आणि समाजसेवक चंद्रभान प्रसाद म्हणतात, "आपलं अस्तित्व दाखवून देण्याच्या दलितांच्या प्रयत्नांचं हे एक नवं रूप आहे. 2014मध्ये हिंदुत्वाचा विजय झाल्याने समाज पुन्हा विभागला गेला. आणि दलितांना वेगळं पाडण्यात येण्याची भीती पुन्हा नव्याने निर्माण झाली. म्हणूनच 'Be dalit, buy dalit' सारखं ब्रँडिग आधुनिक दलित चळवळीचं प्रतीक बनत आहे."
चर्मकार समाजातले सुधीर राजभर हे उत्तर प्रदेशातल्या जौनपुरचे. चमार स्टुडिओ आणि चमार फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. आपल्या लेबलच्या माध्यमातून त्यांना फॅशनच्या जगात दाखल व्हायचंय. दीर्घकाळ इथे टिकून राहता यावं म्हणून चामड्याच्या ऐवजी रबराचा वापर करायचं धोरण त्यांनी स्वीकारलंय.

चामड्यावर पारंपरिक पद्धतीने करण्यात येणारी शिवण असणारी त्यांची डिझाईन्स लक्झरी फॅशनच्या जगातला लेटेस्ट ट्रेंड बनली, तर हा तथाकथित 'अस्पृश्यांना' सहन कराव्या लागलेल्या छळासाठीचा सगळ्यात मोठ्या 'न्याय' असेल असं ते म्हणतात.
कोणाकडे किती संपत्ती?
भारतामध्ये 30 लाखांपेक्षा जास्त दलित सरकारी कर्मचारी असल्याचा आदि-दलित फाऊंडेशनच्या संशोधन विभागाचा अंदाज आहे. केंद्र आणि राज्य सरकार आणि इतर सरकारी विभागांतल्या लोकांची ही आकडेवारी असून यांचं उत्पन्न सुमारे 3 लाख 50 हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
भारतीय घटनेने सगळ्यांना समानतेचा हक्क दिलेले आहे आणि अस्पृश्यतेमुळे 'मागास' ठरलेल्या जाती-जमातींना घटनेद्वारे विशेष सुरक्षा आणि फायदे देण्यात आले आहेत.
भारतात अस्पृश्यता पाळणं बेकायदेशीर आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17 टक्के जनता ही अनुसूचित जातींची आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज यांनी मिळून 2015 ते 2017 या कालावधीमध्ये 'वेल्थ ऑनरशिप अॅण्ड इनइक्वालिटी इन इंडिया : अ सोशिओ - रिलीजियर अॅनालिसीस' नावाचा संशोधन प्रकल्प तयार केला होता. कथित उच्चवर्णीय हिंदू लोकसंख्येकडे अनुसूचित जातीच्या लोकांच्या तुलनेत सुमारे चारपट जास्त संपत्ती असल्याचं यात म्हटलं होतं.

उच्चवर्णीय हिंदूंकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या 41 टक्के संपत्ती असली तरी त्यांची लोकसंख्या मात्र एकूण लोकसंख्येच्या 22.28% असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे. अनुसूचित जाती आणि जमातींची एकूण संपत्ती 11.3% असून त्यांची लोकसंख्या 27% पेक्षा जास्त आहे.
जातीवाचक भेदभाव हा बेकायदेशीर असल्याचं भारताच्या घटनेत म्हटलेलं असलं तर त्या तथाकथित खालच्या जातींबद्दल लोकांच्या मनात पूर्वग्रह आहेत.
दलित ग्राहकांवर आधारित मॉडेल
28 डिसेंबरला प्रसाद त्यांच्या bydalits.com या वेबसाईटसाठी फोटोशूट करत होते. यामध्ये सहभागी असणाऱ्या महिला आणि पुरुष मॉडेल्सनी काळे कपडे, चामड्याची हॅट घालत हातात चामड्याची बॅग धरली होती.
लवकरच लाँच होणारी ही ई-कॉमर्स वेबसाईट एक अॅग्रीगेटर आहे. दलितांनी बनवलेल्या आणि दलित व्यावसायिकांद्वारे विकल्या जाणाऱ्या वस्तू या वेबसाईटवर मिळतील. कोट, हॅट्स, पादत्राणं, चांदीच्या वस्तू आणि कपड्यांसोबतच इथे त्या सगळ्या गोष्टी विकल्या जातील ज्या भारतातल्या मध्यमवर्गीय दलित समाजाच्या महत्त्वाकांक्षांचं प्रतीक आहेत.

फोटो स्रोत, AFP
सूट घालणं हे बाबासाहेब आंबेडकरांसाठी राजकीय विरोध आणि स्वतःचं अस्तित्व ठोसपणे दाखवण्याचं माध्यम होतं, असं प्रसाद सांगतात. असं करत बाबासाहेबांना समाजातल्या जातीवर आधारीत भिंती मोडून काढायच्या होत्या. कारण त्यावेळी दलितांनी कोणते कपडे घालावेत वा घालू नयेत याविषयीचे नियमही समाजाने ठरवले होते.
या अत्याचारांना आणि शोषणाला प्रसाद यांना त्यांच्या 'झीरो प्लस' या ब्रँड आणि पोर्टलद्वारे आव्हान द्यायचंय. याद्वारे त्यांना दलितांमधल्या व्यावसायिकतेला उमेद द्यायची आहे. म्हणजे दलित मध्यमवर्ग जे पैसे कमवेल, त्यापैकी काही याद्वारे दलित समाजाकडेच राहतील.
आंबेडकरांकडे लक्ष वेधत म्हणतात, "त्यांचं अनुसरण करा, त्यांच्यासारखे कपडे घाला. चांगले कपडे घालणं हे मनुस्मृती जाळण्यासारखं आहे. दोन्ही एकत्र केलं तर अजून चांगलं."

प्रसाद म्हणतात, "साडी हे गुलामगिरीची प्रतीक आहे. दलित महिलांमध्ये आत्मविश्वास यावा आणि त्यांना जॅकेट आणि कोट घालावेत अशी माझी इच्छा आहे. 'बाय दलित' आता दलितांच्या गोष्टी असणारा प्लॅटफॉर्म म्हणून समोर येतंय."
"दलित आणि आदिवासींना समान संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यात यावं याविषयी 1950मध्ये भारत सार्वभौम झाल्यावर सहमती झाली होती. पण ही भावना आता कमकुवत झाली असल्याने आता आम्ही हा मार्ग काढलाय. दलित मध्यमवर्गाचा उदय झाल्याने आता हिंदू समाजाला दलितांची इर्षा वाटतेय. मागे पडलेला भूतकाळ आता ते आमच्या भविष्यासमोर आणून उभा करत आहेत."
मायावती आणि पर्स
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींकडे अभिमानाने पाहिलं जातं. त्यांची पर्स ही त्यांची ओळख आणि स्टेटस दाखवण्याचं माध्यम असल्याचं मानलं जातं.
पर्स ही सुखवस्तू जीवनशैलीतली गोष्ट असल्याचं मानलं जातं. आणि एका दलित महिलेकडे पर्स असल्याने त्यांच्या समर्थकांना याचा आनंद वाटत आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पर्ल अॅकॅडमीच्या अध्यक्ष नंदिता अब्राहम म्हणतात, "उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा पोनीटेलपासून 'मेमसाब' बॉब कट, डिझायनर हँडबॅग्स, हिऱ्यांच्या एअर रिंग्स, गुलाबी सलवार - कमीज आणि त्यांना आवडणाऱ्या इतर गोष्टी या दलित सशक्तीकरणाशी संबंधित महत्त्वाकांक्षांशी जोडल्या जाऊ शकतात. वरच्या जातीची जीवनशैली मानल्या जाणाऱ्या गोष्टी मायावतींकडे असणं ही बाब त्यांच्या समर्थकांसाठी विशेषतः दलित समाजाशी संबंधित समर्थकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Getty Images
या महत्त्वाकांक्षांचं रूपांतर ब्रँड्स, संधी आणि मग स्वावलंबन आणि राजकीय ताकदीत केलं जाऊ शकतं असं प्रसाद यांना वाटतं.
बाजारपेठेने समाज बदलू शकतो?
आपल्या लग्नामध्ये सजवलेल्या घोड्यावर बसल्याने 17 जूनला दलित समाजाच्या प्रशांत सोळंकींवर हल्ला करण्यात आला होता.
तर चामड्याचे बूट आणि जीन्स घातल्यामुळे गेल्यावर्षी गुजरातमध्ये 13 वर्षांच्या एका मुलाला मारहाण करण्यात आल्याचं बातम्यांमध्ये म्हटलं होतं.
ऑगस्ट 2019मध्ये तामिळनाडूच्या कुडलकोरे जिल्ह्यामध्ये गॉगल लावल्याने आणि मोटरसायकल चालवल्यामुळे 20 वर्षांच्या दलित तरुणाला मारहाण करण्यात आली.
तर 'पठाणी सूट' घातल्याने डिसेंबरमध्ये गुजरातच्या कच्छमध्ये एका दलित तरुणावर हल्ला करण्यात आला.
वरच्या जातीच्या मानल्या जाणाऱ्या गोष्टी वापरल्याने वा कपडे घातल्याने दलित समाजातल्या लोकांवर हल्ल्याच्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.

पण बाजारपेठेच्या ताकदीने हा सामाजिक बदल घडवून आणला जाऊ शकतो अशी प्रसाद यांना आशा आहे. दलित ब्रँड्स स्वतःची ओळख निर्माण करत असल्याचं ते म्हणतात, "अमेरिकेच्या ब्लॅक मूव्हमेंटसारख्या आंतरराष्ट्रीय आंदोलनांप्रमाणे दलितही आपल्या अधिकारांसाठी अधिक ताकदीने लढू शकतात."
"एका संशोधनानुसार आफ्रिकन-अमेरिकन आणि हिस्पॅनिक लोक एखादी गोष्ट विकत घेताना त्या ब्रँडमागे काही सांस्कृतिक कनेक्शन आहे का, हे तपासतात. हे एकप्रकारे हिंदू राष्ट्रवाद मोडून काढत त्याच्याजागी पाश्चिमात्य संस्कृती आणण्यासारखं आहे. कारण पाश्चिमात्य संस्कृतीत अधिक समता आहे. दलित मध्यमवर्ग आमचा टार्गेट कन्झ्युमर आहे. जर तुम्ही हिंदुत्वाच्या विरुद्ध असाल तर आमची उत्पादनं विकत घ्या," असं प्रसाद सांगतात.
ब्रँडिंगने काम होईल का?
बाजारात 'ब्राह्मण' ब्रँडही आहे. उदाहरणार्थ 'ब्राह्मण' मसाले किंवा मग 'ब्राह्मण फूड्स' चेनची वेबसाईट जी शाकाहारी जेवण पुरवते आणि जातीचा संबंध जेवणाशी जोडते.
जातीशी निगडीत राजकारणाच्या या युगामध्ये जातीमुळे निर्माण होणारी ओळखही आता मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग झाली आहे.

पण सामाजिक न्यायाच्या नावाखाली वस्तूंची विक्री होते की नाही, हे आता पहायला हवं. अर्थशास्त्रामध्ये भावनांची मदत मिळत नसल्याचं स्कूल ऑफ आर्ट्स अॅण्ड अॅस्थेटिक्समध्ये शिकवणारे प्राध्यापक वाय. एस. अलोन म्हणतात.
ते सांगतात, "फक्त ब्रँडिंगने काम होणार नाही. याच्याशी संबंधित लोकांना आर्थिक जगतामध्ये आपलं असित्व निर्माण करायचं आहे. जय भीम, आंबेडकर आणि महात्मा फुले सारख्या शब्दांचा उत्पादनांशी संबंध जोडणं या व्यक्तिमत्त्वांचा अपमान आहे. कारण या लोकांनी बदलाची कास धरली होती आणि लोकांना लोकशाहीवादी मूल्यांसाठी प्रेरित केलं होतं."
एन. के. चंदन दलित आहेत आणि त्यांनी गाजियाबादमध्ये चंदन अॅण्ड चंदन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आहे. बायदलित्स.कॉमवर आपल्याला प्लास्टिकचे डबे विकायचे असल्याचं ते सांगतात. या गोष्टीचं ते समर्थन करत असले तरी त्यांना काही गोष्टींची काळजीही वाटते. भारतामध्ये अजूनही अस्पृश्यता मानली जात असल्याने त्यांना काळजी वाटतेय.
ते म्हणतात, "दलित जे काही बनवतील ते वाईट दर्जाचं असेल असा समज लोकांमध्ये आहे. खालच्या जातीच्या लोकांनी बनवल्यामुळे कदाचित लोकं या वस्तू विकत घेणार नाहीत. म्हणजे जर आंबेडकर जयंतीला तुम्ही अन्नछत्र लावलं, तर कोण जेवायला येईल? आणि सत्ताधारी दलित पक्षांचे किती लोक सभेमध्ये जय भीमची घोषणा देतात?"
प्रसाद यांनी या ब्रँड्सच्या समर्थनार्थ ज्या केसस्टडीचा उल्लेख केलाय तो अभ्यास इतर कोणत्यातरी देशात झाला होता आणि हे देखील एकप्रकारचं राजकारण असल्याचं चंदन यांचं म्हणणं आहे.
इंग्रजी देवीपासून 'बायदलित' वेबसाईट पर्यंत
गोव्यातल्या पणजीमध्ये ओल्ड जनरल मेडिकल कॉलेजच्या बिल्डिंगच्या एका खोलीत एक गोष्ट आहे. काळ्या रंगाच्या चार खांबांनी लाकडाचं एक तात्पुरतं देऊळ बनवण्यात आलंय. 'लुक आऊटसाईड धिस हाऊस' नावाच्या प्रदर्शनाचा हे देऊळ एक भाग आहे.

गोव्यात झालेल्या सेरेंडिपीटी आर्ट्स फेस्टिव्हलसाठी मुंबईचे कलाकार सुदर्शन शेट्टी यांनी ही कलाकृती केली होती. यामध्ये 30 इंच उंचीची एक पितळेची मूर्ती आहे. तिच्या हातात कीबोर्ड आणि पेनसारख्या वस्तू आहेत आणि एका हातात भारताचं संविधान आहे. या 'इंग्रजी देवी'च्या मंदिरात तुम्ही बूट घालूनही जाऊ शकता.
या देवीचे केस सोनेरी रंगाचे आहे आणि ती अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसारखी दिसते. नऊ वर्षांपूर्वी प्रसाद यांनी इंग्रजी देवीची अशीच एक मूर्ती उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातही नेली होती. अशा एका देवीची गरज होती, असं ते म्हणतात.
ही इंग्रजी देवी म्हणजे दलित ओळख असणाऱ्या ब्रँडिंगचा पहिला प्रयत्न असल्याचं म्हटलं जाऊ शकतं. साड्यांमध्ये दिसणाऱ्या हिंदू देवींच्या विरुद्ध या देवीसाठी गाऊन निवडण्यात आला. या टेंपल प्रोजेक्टचं पुन्हा उभारी घेणं हे बायदलित्स डॉट कॉमसाठी प्रोत्साहन देणारं असल्याचं प्रसाद म्हणतात.
आतापर्यंत ही वेबसाईट अधिकृतरित्या लाँच करण्यात आली नसली तरी गेल्या महिनाभरात या वेबसाईटच्या माध्यमातून एक लाख रुपयांच्या वस्तू विकण्यात आल्याचा प्रसाद यांचा दावा आहे.
दलित उद्योजकांचे ब्रँड्स
प्रसाद एक टेक्स्ट मेसेज लिहीतात, "अॅलर्ट...बायदलित्स डॉट कॉमवर महिलांसाठी लवकरच येत आहे ही हेअर-ऑन-क्रॉस-बॉडी बॅग."
'हेअर-ऑन' ही चामड्यावर प्रक्रिया करण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये चामड्यावर त्या जनावराचे केस तसेच राहतात. दोन दलित बहिणी या पद्धतीने बॅग बनवत आहेत.
आलिया (21 वर्षं) आणि अवंतिका चौहान (20वर्षं) या दोन बहिणींनी 10 डिसेंबर 2019ला प्रसाद यांची भेट घेतली होती. या बहिणींची RAD नावाची कंपनी आहे. कानपूरमध्ये असणारी ही कंपनी चामड्याच्या अॅक्सेसरीज बनवते.

फेब्रुवारी 2019मध्ये या बहिणींनी आपल्या कंपनीची नोंदणी केली आणि आता त्या अमेरिकेला उत्पादनं निर्यात करतात. 'अँटिक' म्हणून तिथे या वस्तूंची विक्री होते. अर्जेंटिनातल्या गायीच्या चामड्यापासून त्यांनी बनवलेले बूट अमेरिकेत सुमारे 14,500 रुपयांना विकले जातात.
अमेरिकन बाजारपेठेत निर्यात करता यावी म्हणून या बहिणींनी 30 कारागीर कामावर ठेवले आहेत. आणि आता आपली उत्पादनं इतर कोणाच्या मार्फत विकण्याऐवजी त्यांनी स्वतःचा ब्रँड रजिस्टर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आलिया सांगते, "आम्ही लवकरच बॅग डिझाईन करू. दलित ब्रँड्सची संकल्पना आम्हाला आवडली कारण यामुळे आम्ही अधिक स्वतंत्र आणि स्वावलंबी होऊ."
यामागे काय विचार आहे?
गाजियाबादचे 49 वर्षांचे सतीश कुमार बायदलित्स.कॉमवर आपली उत्पादनं विकण्यासाठी तयार झालेल्या दलित उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांच्या ब्रँडचं नाव - सम्यक लेदर. त्यांनी प्रसाद यांना लेदर कोट आणि स्कर्टसचे 50 पीस पाठवून दिले आहेत.
ते म्हणतात, "लोकांमध्ये जागृती आणण्याचा हा चांगला मार्ग आहे. लोक याची चेष्टा करतील हे मला माहीत आहे. पण याच लोकांनी काशीराम यांचीही थट्टा केली होती. आणि त्यांनीच नंतर देशाचं राजकारण बदललं. जर जय श्रीकृष्ण धूप असू शकतो तर मग आमच्याकडे आमचे ब्रँड्स का असू नयेत?"
61 वर्षांच्या प्रसाद यांनी यापूर्वी dalitfoods.com चीही सुरुवात केली होती. पण नंतर काही खासगी कारणांमुळे त्यांनी ही वेबसाईट बंद केली. प्रसाद आजमगढचे आहेत आणि पासी समाजाचे आहेत.

2016मध्ये त्यांनी दलितफूड्स.कॉमला सुरुवात केली तेव्हा ते आंब्याचं लोणचं, हळद, धणे पावडर इत्यादीची विक्री करत. त्यांना असं आर्थिक मॉडेल तयार करायचंय जिथे दलितांनी तयार केलेले खाद्यपदार्थ कोणीही विकत घेऊ शकेल. त्यानंतर झीरो प्लस नावाचा कपड्यांचा ब्रँड 2017मध्ये लाँच करण्यात आला.
याशिवाय साबणापासून टी शर्ट्स आणि मसाल्यांची विक्री करणारे जय भीम आणि बहुजन स्टोअरसारखे अनेक ब्रँड्स आधीपासूनच बाजारात अस्तित्त्वात आहेत.
यातील जय भीम प्रॉडक्ट्स 2017 मध्ये तर बहुजनस्टोअर.कॉम 2015मध्ये अस्तित्त्वात आलं.
दलित घोषणांचा वापर केल्याबद्दल टीका
जय भीम प्रॉडक्ट्सची सुरुवात 2017मध्ये हरियाणातल्या झज्जरमध्ये करण्यात आली. आवळ्याचं तेल आणि साबणासह 'जय भीम' टॅग असणारी 12 उत्पादनं ही कंपनी तयार करते.
राजस्थानातल्या भिवंडीत या कंपनीचं मुख्यालय आहे. आपल्या उत्पादनांच्या किंमती पतंजलीच्या उत्पादनांइतक्याच असून हा दलित महत्त्वाकांक्षेचा उदय असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या कंपनीची टॅगलाईन आहे - स्वाभिमान की बात, जय भीम की बात.

या कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आहेत बिजेंद्र कुमार. आपण हँडवॉश आणि डिटर्जंटसारख्या अनेक इतर गोष्टीही विकणार असल्याचं ते सांगतात.
महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या सुमारे 80 लहान दुकानदारांसोबत त्यांनी जाळं निर्माण केलं आहे.
ते म्हणतात, "आम्हाला उद्योजकतेला प्रोत्साहन द्यायचं होतं. जे घडून गेलं त्याविषयी रडत बसण्याऐवजी आम्हाला भविष्यात अभिमानाने पुढे जायचंय. आम्ही सुरुवात केली तेव्हा लोकांच्या मनात 'जय भीम' घोषणा वापरण्याविषयी शंका होती. पण आम्ही त्याची पर्वा केली नाही.
जय भीम हा जाती विरोधी आंदोलनातला नारा आहे. जातीविषयक ओळखीवरून होणाऱ्या राजकारणाने विभाजित देशामध्ये जय श्रीराम या घोषणेप्रमाणेच जय भीम ही घोषणा दलित विचारसरणीचं द्योतक आहे.
दलित समाजाने राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अशी तीन आंदोलनं पाहिली असल्याचं भरतिया म्हणतात. पण "आम्हाला आर्थिक आंदोलनाची गरज होती" असं त्यांचं म्हणणं आहे.

वस्तूंची निर्मिती करणारे आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांनी अशी काही लोकं जोडली आहेत जी दर रविवारी गावांमध्ये दलित ओळखीशी निगडीत राजकारण आणि उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करायचा प्रयत्न करतात.
टीका होऊनही या दलित ब्रँड्सनी बाजारात आपलं अस्तित्त्वं टिकवून ठेवलं आहे.
सहारनपूरच्या रविदास कॉलनीत भीम आर्मीशी निगडीत एका तरुणाने 'बुद्ध भीम डिर्टजंट'नावाने उद्योग सुरू केलाय. भीम आर्मीचे सदस्य हे दलितांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. तर दुसऱ्या एका व्यक्तीने 'भीम मसाला' नावाने व्यवसाय सुरू केलाय.
यामागचा त्यांचा विचार सरळ आहे. की जर ते लोकसंख्येच्या साधारण 40 टक्के असणाऱ्या त्यांच्या समाजाच्या लोकांना या वस्तू विकणार असतील तर त्यातून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि याद्वारे त्यांना सन्मानही मिळेल.
अडथळे
पण हे सगळं इतकं सोपंही नाही. 5 डिसेंबरच्या संध्याकाळी मुंबईच्या ऑनसाँबल नावाच्या स्टोअरमध्ये सचिन भीमसाखरे आणि इतर काहीजण आपल्याकडचे सर्वोत्तम कपडे घालून विक्रीसाठी हजर होते.
इतरांपेक्षा आपण फारसे वेगळे दिसणार नाही याची काळजी सचिननी घेतली होती. कारण इतरांप्रमाणे दिसणंही गरजेचं होतं. इव्हेंट प्रमोट करणाऱ्यांनी सुरुवातीला सोशल मीडिया पोस्ट्समध्ये त्यांचं नाव डिझायनर्ससोबत लिहीलं नसल्याने ते सुरुवातीला निराश होते.
जाती व्यवस्था कदाचित विचित्र पद्धतीने काम करत असल्याचं ते म्हणतात. पण लाँचच्या आधी त्यांचं नाव सोशल मीडियावर इतर डिझायनर्ससोबत झळकलं. ही नावं तिथे लिहीली जातील याची काळजी आपण घेतल्याचं सुधीर राजभर म्हणतात.

31 वर्षांच्या भीमसाखरेंचे वडील 2003मध्ये एका अपघातात गेले. त्यांचं चामड्याच्या वस्तू बनवण्याचं दुकान होतं. वडिलांच्या निधनानंतर सचिन यांनी नोकरी सोडली आणि वडिलांच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. दिवसभरात मिळणाऱ्या 100 रुपयांच्या कमाईतून त्यांना कुटुंब चालवावं लागत होतं.
मुलानेही याच व्यवसायात यावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा नव्हती. आज अखेरीस आपल्याला एका कलाकारासारखं, डिझायनरसारखं वाटत असल्याचं त्यांनी स्टोअरमध्ये झालेल्या कार्यक्रमात सांगितलं. एक असा डिझायनर ज्याच्या मेहनतीने तयार झालेल्या बॅगची विक्री 10 हजारांपेक्षा जास्त किमतीला होत होती.
सुधीर राजभर हे आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी प्रशिक्षणही घेतलेलं आहे. मुंबईतल्या कांदिवलीतल्या झोपडपट्टीमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या सुधीर यांची गाठ सचिन यांच्याशी झाली.
दोघांमध्ये बोलणं झालं आणि त्यांनी भागीदारी केली. 2015मध्ये महाराष्ट्रात रेड्याच्या हत्येवर बंदी आली आणि चामड्याच्या वस्तूंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या धारावीला मोठा झटका बसला.
त्याचवेळी राजभर यांच्या मनात चमार स्टुडिओ सुरू करण्याची कल्पना आली. जिथे रिसायकल्ड रबरापासून बॅग्स आणि अॅक्सेसरीज बनवल्या जातील आणि 'चमार स्टुडिओ' हा टॅग या शब्दाला सन्मान मिळवून देईल.
भीमसाखरे हे मुंबई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागमध्ये अंशकालिन सुपरव्हायजर आहेत. बॅगच्या टॅगवर आपलं नाव आल्यावर आपल्याला अभिमान वाटल्याचं ते सांगतात. तर ही गोष्ट जातीने अंगावर टाकलेल्या ऐतिहासिक ओझ्यातून मुक्त करणारी असल्याचं राजभर सांगतात.
मुंबईतच राहणाऱ्या फराह सिद्दीकी या आर्ट कन्सल्टंटनी या प्रोजेक्टसाठी मदत केली आणि रीटेल फॅशन चेन स्टोअर ऑनसाँबलने मुंबईतल्या कुलाबा भागातल्या स्टोअरमध्ये लाँच ठेवला. पण या जातीविषयक ओळख या इव्हेंटमध्ये वापरणं सोपं नव्हतं.
या प्रोजेक्टला मदत करणाऱ्यांच्या आणि प्रमोटर्सच्या मनातही सुरुवातीला 'चमार' शब्द वापरण्याविषयी शंका होती. 1989च्या कायद्यानुसार दलितांचा अपमान करण्यासाठी 'चमार' या शब्दाचा वापर करणं, अपशब्द वापरणं, त्यांचं शोषण आणि हिंसेसाठी वरच्या जातीच्या लोकांसाठी सहा महिन्यांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
पण आता मात्र हे सगळे हेच ब्रँडिंग वापरणार आहेत. जोधपूरचे कैलाश पंवार जोडे बनवतात आणि त्यांनी प्रसाद यांच्या पोर्टलासाठी 25 जोडी चपला पाठवलेल्या आहेत. आपला ब्रँड रजिस्टर करण्यासाठीही त्यांनी सहमती दिली आहे.
आशा
त्या रात्री मुंबईमध्ये काही बॅग्सवरच्या टॅग्समध्ये ती बनवणाऱ्यांचीही नावं होती. देशात सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि दलित चवळवळीमध्ये नुकतीच उदयाला आलेली संपत्ती, ताकद आणि राजकीय महत्त्वाविषयी बोलणारी पिढी, यामुळेच या बॅग्सची विक्री झाली.

या लाँचसाठी जमा झालेले लोक जरी जातीय संघर्ष समजू शकत नसले तरी सामाजिक न्यायाच्या या लढाईत योग्य गोष्टीच्या बाजूने उभं राहण्याची त्यांची तयारी होती.
त्या रात्री सचिन भीमसाखरे या कार्यक्रमातून हसऱ्या चेहऱ्याने बाहेर पडले.
ते म्हणतात, "आता सगळीकडे आपलं अस्तित्त्वं दाखवून देण्याची वेळ आलीय..."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








