NEFT सेवा आजपासून मोफत, जाणून घ्या NEFT आणि RTGSचे फायदे-तोटे

ऑनलाईन, इंटरनेट, NEFT, IMPS

फोटो स्रोत, SOPA Images

फोटो कॅप्शन, जाणून घेऊया ऑनलाईन पैसे हस्तांतरणाबद्दल, म्हणजेच NEFT आणि IMPS बद्दल

इंटरनेटमुळे ऑनलाईन बँक व्यवहार करणं शक्य झालं आणि त्यामुळे पैशाची देवाणघेवाण अनेक अर्थाने सोपी झाली.

संगणक किंवा मोबाईलचं एक बटण दाबलं की पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्याची सोय झाली. त्यासाठी तुम्हाला ना बँकेत जावं लागतं, ना चेक लिहून द्यावा लागतो.

पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही, हे ही लगेच ऑनलाईन समजतं. ग्राहक एखादी व्यक्ती असो, उद्योजक किंवा संस्था किंवा विश्वस्त निधी. दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये असलेल्या व्यक्तीही कमीत कमी वेळात पैशाची देवाणघेवाण करू शकतात. काही विशिष्ट सेवांसाठी तर बँकेत खातं असण्याचीही गरज नाही.

एका खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात (दोन्ही खाती स्वत:ची असतील तरी चालेल) ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्यासाठी तीन पद्धती प्रचलित आहेत. NEFT, RTGS आणि IMPS. तीनही पद्धती सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी खुल्या आहेत. पण, तिघांचे नियम आणि उपयोग आणि सेवांसाठी लागणारे दर वेगवेगळे आहेत.

आधी त्यांचे अर्थ समजून घेऊया...

NEFT म्हणजे काय?

शब्दश: NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. देशांतर्गत आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्याची सोय. रिझर्व्ह बँकेनं 2005 पासून भारतीय ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. तुमचं बँक खातं नसेल तर तुम्ही जवळच्या एखाद्या बँकेच्या शाखेत जाऊन तिथं रोखीने पैसे भरु शकता आणि ते पैसे मग तुम्ही सांगितलेल्या खात्यात ऑनलाईन जमा होतील, अर्थात NEFTच्या माध्यमातून...(तुम्ही खातेधारक नसलात तर अशा व्यवहारांसाठी 50 हजार रुपयांची मर्यादा आहे)

बँकेच्या दृष्टीने विचार केला तर दर अर्ध्या तासाला अशा ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यवहारांचा उपसा संबंधित बँक एकत्रपणे करत होती. म्हणजे आपण 8 वाजता पैसे हस्तांतरित करण्यासाठी नोंदणी केली असेल तर पुढच्या सेटलमेंटच्या वेळेला तुमच्या अर्जाची दखल घेतली जाणार. आतापर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध होती. पण, आता 16 डिसेंबर 2019 पासून ही सेवा 24 तास सुरू करण्यात आली आहे.

हे पैसे त्याच दिवशी इच्छित बँक खात्यात जमा होतात. यापूर्वी NEFTचे व्यवहार बँकेला सुटी असेल तर होत नव्हते. आणि व्यवहारांवर रु. 1 ते 25 रुपयांपर्यंत शुल्कही लागू होत होतं. पण, रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्णयानुसार आता 2020 पासून ही सेवा पूर्णपणे मोफत झाली आहे.

रिझर्व्ह बँक, NEFT

फोटो स्रोत, रिझर्व्ह बँक/ट्विटर

फोटो कॅप्शन, रिझर्व्ह बँकेनं NEFT सेवा 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला

तर 16 डिसेंबरपासून ही सेवा 24 तास सुरु राहाणार आहे. त्यापूर्वी सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध होती.

लोकांना ऑनलाईन किंवा डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून रिझर्व्ह बँकेनं NEFT सेवा मोफत आणि 12 महिने 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणि तो घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मध्यरात्री 12 ते सकाळी आठ वाजेपर्यंत असे 11 लाख 40 हजार ऑनलाईन व्यवहार पार पडल्याचं रिझर्व्ह बँकेनं एका ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे.

RTGS म्हणजे काय?

RTGS म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट - हे व्यवहार नावाप्रमाणेच नोंदणी झाल्याझाल्या क्षणी पार पडतात. आणि सांगितलेल्या पूर्ण रकमेचा व्यवहार होतो. पण, हे व्यवहार मोठ्या रकमेचे असतात.

दोन लाखांपेक्षा जास्त पैसे हस्तांतरित करायचे असतील तर या सेवेचा लाभ तुम्हाला घेता येतो. त्यामुळे अनेकदा असे व्यवहार उद्योगधंद्यासाठी होतात.

IMPS म्हणजे काय?

IMPS म्हणजे अलीकडेच सुरू झालेली पैसे हस्तांतरणाची अद्ययावत पद्धत आहे. इमिजिएट पेमेंट सर्व्हिस म्हणजे तात्काळ पैशाची देवाणघेवाण करणारी ही व्यवस्था आहे.

ही सेवा 24 तास सुरू असते, अगदी सुटीच्या दिवशीही. ऑनलाईन बँकिंग, रिझर्व्ह बँकेनं निर्देशित केलेल्या निवडक प्री-पेड माध्यामाद्वारे किंवा एटीएम केंद्रांवर जाऊन तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

IMPS, ऑनलाईन, इंटरनेट

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, IMPS फोनवरून वापरता येत असल्याने तरुणांची पसंती

मोबाईल, इंटरनेट किंवा एटीएममधून तुम्ही व्यवहार पार पाडू शकता. ही सेवा सुरक्षित आणि भरवशाची मानली जाते. शिवाय पैशाचा व्यवहार पूर्ण झाला तर तुम्हा बँकेकडून तसा एसएमएसही येतो. अलीकडच्या तरुण पिढीमध्ये IMPS विशेष लोकप्रिय आहे. या सेवेसाठी रुपये 5 ते 25 पर्यंत खर्च येतो. किती पैसे हस्तांतरित करायचे आहेत त्यावरुन साधारणत: हा दर ठरतो.

यातील कुठली सेवा निवडायची?

RTGS सेवा 2 लाखांवरील रकमेच्या व्यवहारांसाठी असल्याने त्याचा उपयोग आपल्याला नेहमीसाठी होणार नाही. पण, NEFT आणि IMPS या सेवांमधील कुठली सेवा निवडायची असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार.

खासकरून NEFT सेवा आता निशुल्क आणि 24/7 तासांसाठी उपलब्ध झाल्यावर हा प्रश्न नक्कीच पडला असणार.

रिझर्व्ह बँक, NEFT, IMPS

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE

फोटो कॅप्शन, NEFT, IMPS व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेचा अंकुश असतो

बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या 'सर्वत्र टेक्नॉलॉजी'चे संस्थापक आणि उपाध्यक्ष मंदार आगाशे यांना आम्ही हाच प्रश्न विचारला.

'दोन्ही सेवांचा तुलनात्मक अभ्यास केला असता, IMPS सेवेअंतर्गत दोन लाखांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित करता येते. तर अशी कुठलीही मर्यादा NEFTवर नाही. घराचे खरेदी-विक्री व्यवहार किंवा मोठे आर्थिक व्यवहार करणं त्यामुळे सोपं होईल. आणि या व्यवहारांची नोंदणीही सोपी होईल,' हा पहिला फायदा आगाशे यांनी सांगितला.

'व्यवहार जितके ऑनलाईन होतील, तेवढी काळ्या बाजाराची शक्यताही कमी होणार आहे. आणि अशा सेवांसाठी मनुष्यबळ कमी लागून त्या स्वस्त होणार आहेत, त्यासाठी सरकारचा डिजिटल व्यवहारांसाठी आग्रह आहे,' ही गोष्टही आगाशे यांनी स्पष्ट केली.

रिझर्व्ह बँकेनं NEFT सेवा निशुल्क करताना एक पत्रक काढलं आहे. आणि त्यातही डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय.

16 डिसेंबरपासून NEFTचे व्यवहार नि:शुल्क झाले. पण, IMPS सेवेसाठी अजूनही शुल्क आकारलं जातं. हे शुल्क रुपये पाच ते 25 पर्यंत आहे. त्यानुसार कुठली सेवा निवडायची याचा निर्णय ग्राहकांना घेता येईल.

NEFT आणि IMPS सेवांमधील आणखी एक व्यावहारिक फरक मंदार आगाशे यांनी सांगितला.

ऑनलाईन, इंटरनेट, NEFT, IMPS

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, ATM केंद्रांवरूनही NEFTचे व्यवहार करता येतात

NEFT सेवेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला लाभार्थी खातेदारांबद्दलची माहिती ऑनलाईन का होईना, नोंदणीकृत करावी लागते. 'NEFTच्या नोंदणीसाठी खातेदाराचा खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड अशी माहिती ऑनलाईन अर्जात द्यावी लागते, त्याची पडताळणी झाल्यावर तुमचा अर्ज स्वीकारला जातो.

आणि मग व्यवहार पूर्ण होतो. दुसरीकडे IMPS सेवा मोबाईलवर अॅपच्या सहाय्याने बँकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी बनवली आहे. IMPSच्या नोंदणीसाठी मोबाईल मनी आयडेंटिफायर क्रमांक लागतो. (हा सात आकडी क्रमांक बँक नोंदणी करताना देते ) त्यानंतर लगेचच तुम्ही पैसे हस्तांतरित करू शकता.'

या कारणामुळेच IMPS सुटसुटीत आणि तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

पण, NEFT आणि IMPS सेवांची काही खास वैशिष्ट्यं आहेत. आणि गरजेनुसार यातला कुठला पर्याय निवडायचा हे ग्राहकांनी ठरवायचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)