आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात घेणं ही 'घराणेशाही' आहे का?

फोटो स्रोत, Ani
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आदित्य ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
ऑक्टोबर 2012 मध्ये भावुक आवाजात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, 'उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या.' त्यावेळी आदित्य 22 वर्षांचे होते आणि युवा सेनेचे अध्यक्ष होते. आता ते 29 वर्षांचे आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
आदित्य यांचा राजकारणातला प्रवेश हा युवा सेनेच्या माध्यमातून झाला. 2010 सालच्या दसरा मेळाव्यात बाळ ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली.
आदित्य यांच्या राजकारण प्रवेशाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं, "आदित्य ठाकरेंना कोवळ्या वयात राजकारणात आणलं गेलं. असं आणायला पाहिजे होतं की नव्हतं ही पुढची गोष्ट आहे. पण ठाकरे घराण्यातली तिसरी पिढी असल्यानं त्यावेळी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या."
"उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून धुरा सांभळल्यानंतर आदित्य ठाकरेंचा उदय झाला. उद्धव यांच्या हृदयावरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्यावर शारीरिक मर्यादा आल्या. या मर्यादांमुळेच आदित्य ठाकरेंना त्यांनी राजकारणात आणलं गेलं," असं मत राजकीय पत्रकार युवराज मोहिते यांनी व्यक्त केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार की नाही, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात होते. या सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत आदित्य यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात आपण वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी आदित्य यांनी महाराष्ट्रात 'जनआशीर्वाद यात्रा' काढली होती.
वरळीमधून आदित्य यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश मानेंचा त्यांनी पराभव केला. आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करणारे आदित्य ठाकरे यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाचीही जबाबदारी स्वीकारली आहे.
"कॅबिनेट मंत्रिपद ही आनंदाची गोष्ट आहे, पण त्याचबरोबर मला जबाबदारीचीही जाण आहे," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. "कोणतं खातं मिळेल हे अजूनही निश्चित नाहीये. त्यासंबंधी मला पक्षाकडून कळवलं जाईल. पण पक्ष जी काही जबाबदारी देईल, ती घ्यायला मला नक्कीच आवडेल," असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. पण प्रशासकीय कामाचा कोणताही अनुभव नसताना आदित्य ही जबाबदारी कशी पार पाडतील हा प्रश्न उपस्थित होत आहे.
'आदित्य यांच्यासाठी संधीसोबतच धोकेही'
"आदित्य ठाकरे यांना संधी द्यायला काहीच हरकत नाही. पण आता त्यांना पाच वर्षातच अगदी माँटेसरी ते पदवीपर्यंतचं शिक्षण घ्यायचं आहे. पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद घेण्याचे जसे फायदे असतात तसे धोकेही असतात," असं मत लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Getty Images
"मंत्री म्हणून काम करत असताना निर्णय घ्यावे लागतात. त्याच्या बऱ्या-वाईट गोष्टींची जबाबदारी स्वतः घ्यावी लागते. त्यासाठी अनुभव असणं केव्हाही फायदेशीर असतं. आदित्य ठाकरेंकडे तो नाहीये, ही त्यांची कमकुवत बाजू आहे," असंही संदीप प्रधान यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रिपद यातून नेमका कोणता संदेश जातो? या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील घराणेशाहीचं चित्र समोर येतंय का? या प्रश्नांवर उत्तर देताना संदीप प्रधान यांनी म्हटलं, "की घराणेशाही ही आता एका पक्षापुरती मर्यादित नाहीये. जे पक्ष पूर्वी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करायचे, त्या प्रत्येक पक्षात कमी-अधिक फरकानं घराणेशाही पहायला मिळते."
"राजकारणात प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे हितसंबंध मोठ्या प्रमाणावर गुंतलेले असतात. अशावेळी बाहेरच्या व्यक्तीकडे सूत्रं सोपविण्यापेक्षा घरातल्याच विश्वासू, सर्वांत जवळच्या व्यक्तीकडेच जबाबदारी दिली जाते. गेल्या काही वर्षांत सर्वच पक्षात ही गोष्ट दिसून आली आहे. शिवसेनाही याला अपवाद नाही," प्रधान सांगतात.
संदीप प्रधान यांनी म्हटलं, "उद्धव ठाकरेंच्या दृष्टिनं विचार करायचा झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत अनुभवाचा विचार करता शिवसेनेची बाजू काहीशी पडती आहे. अशावेळी, ज्यांच्याशी सल्लामसलत करता येईल, ज्यांचा विचार घेतला जाईल असे काही जवळचे लोक आपल्या मंत्रिमंडळात असावेत, असं उद्धव यांना वाटणं स्वाभाविक आहे."
रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक केसरकर या माजी मंत्र्यांना डावलून शिवसेनेनं आदित्यसह काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्याबद्दल बोलताना संदीप प्रधान यांनी म्हटलं, की ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवणं हे एका दृष्टिनं योग्यही आहे. कारण विधान परिषदेतल्या नेत्यांना संधी दिल्याबद्दल गेल्यावेळेस नाराजीही व्यक्त झाली होती. शिवाय रावते किंवा कदम हे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. त्यांच्याकडे सल्लागार समिती किंवा अन्य जबाबदारी सोपविली जाऊ शकते.
'स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी'
"आदित्य ठाकरे यांना मिळालेलं कॅबिनेट मंत्रिपद हा आदित्य ठाकरेंच्या ग्रुमिंगचा भाग आहेच. पण त्यासोबतच पक्षामधील लोकांनाही हा एक थेट संदेश आहे. शिवसेनेचं भविष्यातील नेतृत्व हे आदित्य ठाकरे आहेत, त्यामुळे तुमच्या महत्त्वाकांक्षा फार वाढू देऊ नका, असा स्पष्ट संदेश उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आदित्य यांचा समावेश करून देण्यात आला आहे," असं ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"बाहेरुन गोष्टी बोलणं आणि सरकारमध्ये जाऊन काम करणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे मंत्री म्हणून काम करताना आदित्य ठाकरे यांचा कस लागणार आहे. स्वतःला सिद्ध करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांना कोणतं खातं मिळतंय यावरही बऱ्याच गोष्टी ठरतील," असंही धवल कुलकर्णी यांनी म्हटलं.
आदित्य यांना पर्यावरण किंवा इंडस्ट्री हे खातं मिळू शकतं. महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामागची कल्पना ही आदित्य ठाकरे यांची होती. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये आदित्य हे ठाकरे कुटुंब आणि महत्त्वाच्या उद्योजकांमधील दुवा म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे पर्यावरण किंवा इंडस्ट्रीपैकी एक खातं आदित्य यांना मिळण्याची शक्यताही धवल कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.
नाईट लाईफ ते व्हॅलेंटाईन
त्यांचं शिक्षण सेंट झेविअर्स शाळेत आणि के. सी. महाविद्यालयातून झालं. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.
2007मध्ये वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या 'माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक' या हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतल्या कवितासंग्रहाचं प्रकाशन झालं. नंतर 'उम्मीद' नावाचा 8 गाण्यांचा अल्बमही प्रसिद्ध झाला.
गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरेंनी मोजक्या विषयांवर मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी निवडक मुद्द्यांवर 'आंदोलनं' केली आहेत. या विषयांच्या निवडींवरून आणि 'आंदोलनां'च्या स्वरूपांवरून त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती कळते.

फोटो स्रोत, Getty Images
2010मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक काढून टाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.
आदित्य यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यांसाठीचा आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले.
फक्त मुंबईचे नेते?
आदित्य ठाकरे तरुण पिढीचे नेते असल्याने सोशल मीडियावर खास सक्रिय असतात. त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं तर ते ट्विटरवर प्रतिसादही देताना दिसतात.
पण त्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत गंमतही दिसून येते. जिथे मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत, त्या फेसबुकवर त्यांच्या अधिकृत पेजला 1 लाख 23 हजार लाइक्स दिसतात. तर इंग्रजीचं वर्चस्व असलेल्या ट्विटरवर त्यांचे जवळपास 14 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
आदित्य ठाकरेंवर त्यांचं नेतृत्व शहरी आणि मुंबईकेंद्री असल्याचा आरोपही अनेकदा झाला आहे. त्याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं होतं, की आदित्यजींचं नेतृत्व हे जरी मुंबईच्या विषयांभोवती म्हणजे रूफ टॉप हॉटेल, नाईट लाईफ या मुद्द्यांभोवती फिरत असलं तरी युवा सेना ही राज्याच्या ग्रामीण भागातही वाढली आहे. 2011मध्ये जव्हार, मोखाडा या ठाण्याजवळच्या ग्रामीण भागातून आदित्यजींनी नेतृत्व म्हणून आपल्या कामांना सुरुवात केली. या भागातला कुपोषण आणि पाण्याचा मुद्दा त्यांनी उचलला होता."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








