विखे पाटील पिता-पुत्रांमुळे राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला का?

राम शिंदे आणि विखे पाटील

फोटो स्रोत, facebook

भारतीय जनता पार्टीमधील पराभूत उमेदवारांनी आता आपल्या पराभवावर स्पष्टपणे आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्यानंतर आता माजी मंत्री राम शिंदे यांनी आपल्या पराभवामागे पक्षातीलच नेते आहेत असा आरोप करत थेट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मात्र त्यांच्या तक्रारीध्ये कितपत तथ्य आहे याबाबत भाजप निर्णय घेणार आहे.

राम शिंदे यांनीच याबाबत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. आपल्या पराभवाबद्दल आणि राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे-पाटील यांच्याबद्दल आपण आपले अनुभव पक्षासमोर आणले. संघटनमंत्री विजय पुराणिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनुभव कथन केले असं राम शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, "आज प्रथमच मी आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांना समोरासमोर आणून चर्चा केली. आज प्रथमच आम्ही समोरासमोर आलो आहोत. आता विजय पुराणिक याची माहिती देणारा अहवाल मागवतील आणि पुढील कारवाई करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे."

'सर्वच पक्षांमध्ये नाराजी असते'

राम शिंदे यांनी केलेले आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी फेटाळून लावले आहेत. गैरसमजातून शिंदे यांनी टीका केली असावी असं विखे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं.

राधाकृष्ण विखे पाटील

फोटो स्रोत, Getty Images

सर्वच पक्षांमध्ये नाराजी असते. आज आम्ही सर्व नेत्यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि आपापली मतं मांडली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीचे आव्हान आहे. त्याच्याविरोधात लढण्याविषयी चर्चा केली असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्नी शालिनीताई विखे पाटील या अद्याप काँग्रेसमध्ये आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहे त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे पक्षच ठरवेल असं मत खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं.

सुजय विखे पाटलांच्या या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया मागितली असता विखे पाटील म्हणाले हे सुजयचं वैयक्तिक मत आहे.

'नगर जिल्ह्यातल्या निवडणुका लोकांनीच हातात घेतल्या होत्या'

अहमदनगर जिल्ह्यातील यंदाच्या निवडणुका लोकांनीच हातात घेतल्या होत्या असं मत लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. ते म्हणाले, "राम शिंदे यांच्या विखे-पाटील यांच्यावरील आरोपात फरासं तथ्य नसावं असं दिसतं. कारण ग्रामीण भागात भाजपविरोधी वातावरण होतं."

सुजय विखे पाटील

फोटो स्रोत, Sujay vikhe patil/facebook

"विखे-पाटील यांचा या परभवात खरंच हात असता तर इतक्या मोठ्या मतांनी शिंदे यांचा पराभव झाला नसता. विखे-पाटील कर्जत-जामखेडमध्ये इतकी मतं प्रभावित करू शकतात असं वाटत नाही. तसेच नगर जिल्ह्यामध्ये पिचड यांचाही पराभव झाला आहे. बबनराव पाचपुते अगदी थोड्या फरकाने विजयी झाले आहेत. याचाच अर्थ पक्षांतर केलेल्या नेत्यांवरही लोक नाराज होते," असं लंके यांना वाटतं.

"त्यामुळे नगर जिल्ह्यातील मतदानाचे निर्णय लोकांनीच घेतले आहेत. जर विखे-पाटील पक्षातल्याच लोकांविरोधात कार्यरत होते असा आरोप असेल तर मग आ. मोनिका राजळे यांचा विजय कसा झाला? तेथे भाजप कसा पराभूत झाला नाही? असे प्रश्न उपस्थित होतात. कर्जत-जामखेडला मुख्यमंत्री दोनदा प्रचारासाठी येऊन गेले होते. मग त्यांचा प्रभाव मतदानात दिसून आला नाही का? विखे-पाटील यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाला कमी कसे लेखता येईल?" असं लंके विचारतात.

मतदान करताना लोक लोकप्रतिनिधीचा संपर्क, स्थानिक समिकरणांचा विचार करतात. रोहित पवार यांनी इथं गेली दोन वर्षे काम केलं होतं हे विसरुन चालणार नाही.

'नाराजीचा फटका बसला?'

राम शिंदे यांच्याविरोधात असलेल्या अॅंटी इन्कबन्सी तसेच नाराजीचा फटका त्यांना बसल्याची शक्यता स्थानिक पत्रकार अशोक निंबाळकर बोलून दाखवतात. ते म्हणाले, "आपल्याशी लोकप्रतिनिधींचा संपर्क तुटल्याची भावना लोकांमध्ये होती. तर इकडे रोहित पवार यांना त्यांच्या पवार आणि युवा फॅक्टरची मदत झाली. त्यांच्याकडे प्रती पवार म्हणून पाहिलं जात होतं. या सर्व घटकांचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला असावा. विखे पाटील यांचा या निवडणुकीवर फारसा प्रभाव असेल असं वाटत नाही. लोकांनाच बदल हवा होता. अन्यथा इतक्या मतांनी राम शिंदे यांचा पराभव झाला नसता."

कर्जत-जामखेड मतदारसंघात काय झालं होतं?

राम शिंदेयांचा कर्जत-जामखेड हा मतदारसंघ आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघात 2014च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान यंदा झालं आहे. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 66.07% टक्के मतदान झालं होतं, तर यंदा 73.98 टक्के मतदान झालं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

गेल्या निवडणुकीत भाजपचेच राम शिंदे 37 हजार 816 इतक्या मताधिक्याने निवडून आले होते. मात्र यावर्षी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार इथं विजयी झाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)