अशोक चव्हाणांच्या 'त्या' व्हायरल कॉलमुळे बाळू धानोरकर खासदार बनले होते...

फोटो स्रोत, Facebook
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं आज (30 मे 2023) गुरुग्राममधील (हरियाणा) मेदांता रुग्णालयात निधन झालं. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचं नेतृत्त्व करत होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची फक्त एकच जागा जिंकली होती, ती म्हणजे चंद्रपूरची. मात्र, या जागेचाही किस्सा आहे. तो म्हणजे, माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा एक कॉल व्हायरल झाला होता, त्यामुळे बाळू धानोरकरांना चंद्रपुरातून काँग्रेसचं तिकीट मिळालं होतं.
अशोक चव्हाणांनी चंद्रपूरच्या जागेसाठी बाळू धानोरकरांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणलं होतं. धानोरकर त्यावेळी शिवसेनेचे आमदार होते. मात्र, ते काँग्रेसमध्ये आले, पण त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याऐवजी स्थानिक काँग्रेस नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना जाहीर झालं.
प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाणा या गोष्टीमुळे नाराज झाले. कारण त्यांनीच बाळू धानोरकरांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये लोकसभा उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर आणलं होतं आणि त्या आश्वासनालाच तडा गेला होता.
मात्र, त्यानंतर अशोक चव्हाणांचा चंद्रपुरातील एका काँग्रेस कार्यकर्त्यासोबत बोलतानाचा कॉल व्हायरल झाला आणि जाहीर केलेला उमेदवार बदलला गेला.
'त्या' व्हायरल कॉलमध्ये काय संवाद झाला होता?
साधारण 23-24 मार्च 2019 ची ही गोष्ट, म्हणजे बरोबर दोन महिन्यांपूर्वीची. चंद्रपूरहून राजूरकर नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याचा फोन कॉल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना जातो. या कॉलमधील संवाद असा होता :
राजूरकर: सर, चंद्रपूर येथून विनायक बांगडे यांना तिकीट जाहीर झालं आहे. चंद्रपूरमधून आपला उमेदवार खात्रीशीर आहे ना.
अशोक चव्हाण : "तुम्ही जे म्हणताय ते तिकडे मुकूल वासनिकांशी बोलून घ्या. माझं पूर्ण समर्थन आहे, पण काही लोकांना समजत नाही. मी तुमच्याबरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये.
राजूरकर: मुकूल वासनिक काहीच नाही ना सर तुमच्यापुढे. तुम्ही सगळा महाराष्ट्र सांभाळता.
अशोक चव्हाण: माझं इथं कुणी ऐकायला तयार नाही. मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे. तुम्ही जरा वासनिकांशी बोला, आमची बाजू मांडा.
ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचं चव्हाण यांनी तेव्हा बीबीसीशी बोलताना मान्य केलं होतं.
पण राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले होते, "मी कुठंही काही जाहीर भाष्य केलेलं नाही. कार्यकर्त्याच्या भावना समजून घेणं, तिथले विषय समजून घेणं, हे अध्यक्ष म्हणून माझं कामच आहे. कार्यकर्ते फोन करतात, ते काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळेच करतात."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"लोकसभा तिकीट वाटपासंदर्भात मी हतबल असण्याचा विषय नाही, पण काही ठिकाणी मतांमध्ये भेद असू शकतात. विदर्भातले विषय मुकूल वासनिकांना माहिती आहेत, म्हणून त्यांच्याशी बोलायचा सल्ला मी कार्यकर्त्याला दिला," असं ते पुढे म्हणाले.
मात्र, ही क्लिप लीक झाली की जाणीवपूर्वक करण्यात आली, यावर चव्हाणांनी स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं होतं. मात्र त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते.
या क्लिपची चर्चा राज्यभरात झाली आणि त्यानंतर चंद्रपूरचा उमेदवार बदलण्यात आला. तोच एकटा आता लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेसचं प्रतिनिधित्व करणार आहे.
बदललेला उमेदवार महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार ठरला
अशोक चव्हाणांच्या या व्हायरल कॉलनंतर चंद्रपुरातील काँग्रेसचा उमेदवार बदलला गेला. माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना जाहीर झालेली उमेदवारी मागे घेण्यात आली आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांना उमेदवारी देण्यात आली.
त्यावेळी विनायक बांगडे नाराजही झाले होते. ते म्हणाले होते, "आज पैसा जिंकला, प्रमाणिकता हरली. काँग्रेस पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना दिलेली तिकिट 'श्री. विनायकजी बांगडे' यांना शिवसेनातील एका व्यक्तीस दिली गेली आहे."
नंतर झालेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेस नेस्तनाबूत झाली. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली, ती म्हणजे चंद्रपूरची.

फोटो स्रोत, Facebook
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44,763 मतांनी पराभव केला.
अगदी धानोरकरांना उमेदवारी मिळवून देणारे तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून हरले.
पण चंद्रपूरची जागाही काँग्रेसच्या हातून गेली असती, जर एका फोन कॉलची ऑडियो क्लिप बाहेर आली नसती. त्या एका फोन कॉलनंतर काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला आणि तोच निवडून आला.
धानोरकरांचा प्रवास : शिवसेना ते काँग्रसचे एकमेव खासदार
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास त्यांनी शिवसेनेत केला.
वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघात ते काम करत असताना, त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.
2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला आणि परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.

फोटो स्रोत, Facebook
2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला.
लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








