उद्धव ठाकरे सरकार स्थापन झालं, पण मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का?

फोटो स्रोत, Getty Images
उद्धव ठाकरे यांनी 29 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
शिवाजी पार्कवर झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्याला 10 दिवस झाले असले, तरी अजूनही राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेतलेल्या सहा मंत्रीही अजून बिनखात्याचेच आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला नेमका मुहूर्त कधी लागणार, अशी चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं, "शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होणार आहे. दहा दिवस झाले, तरी नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही. सहा मंत्र्यांना अजूनही खाती दिलेली नाहीत."
तर माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं, "मंत्रिमंडळ विस्तार अजून का झाला नाही याची कारणं महाविकास आघाडीचेच नेते सांगू शकतील. पण आम्हाला या कारणांशी काही घेणदेणं नाही. पण ज्या गतीमानतेने महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. तीच गतीमानता शेतकऱ्यांच्या दुखाःवर फुंकर घालण्यासाठी, विकास कामांच्या फाईल्स जलद गतीने फिरण्यासाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी या सरकारने दाखवावी एवढचं आम्हाला वाटतं."
पाहा व्हीडिओ -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
महाविकास आघाडीचे नेते काय म्हणतात?
भाजप नेत्यांच्या टीकेसंदर्भात बीबीसी मराठीनं महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी संपर्क साधला.
मंत्रिपदाचं वाटप विचारपूर्वक करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब होत असल्याचं शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
त्यांनी म्हटलं, "सध्याचं सरकार हे तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे खूप विचारपूर्वक खातेवाटप करण्यात येणार आहे. आम्हाला हे सरकार पाच वर्षं चालवायचं आहे. त्यामुळे जे काही करायचं ते सुरुवातीलाच करायचं आहे. जेणेकरून नंतर काही अडचण निर्माण होणार नाही."

फोटो स्रोत, ShivSena/facebook
मंत्रिमंडळ विस्ताराविषयी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "पहिल्यांदाच तीन वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन हे महाविकास आघाडीचं सरकार बनलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागतोय. त्यासंबधीच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल."
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र हा मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असं म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं, "मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री तो लवकरच करतील. मला असं वाटतं, की मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतर ताबडतोब होईल. कदाचित दुसऱ्याचं दिवशी होईल. पण, मी पुन्हा सांगतो, की हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे."
मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का?
"मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे, कारण महाविकास आघाडीचं सरकार तीन पक्षांचं आहे आणि या तीन पक्षांमध्ये महत्त्वाच्या खात्यांसाठी रस्सीखेच आहे," असं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणतात.
त्यांनी म्हटलं, "हे तीन पक्षांचं सरकार आहे. मोठ्या खात्याच्या मंत्रिपदासाठी रस्सीखेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस पक्ष पुन्हा वाढू नये यासाठी निश्चित प्रयत्न होतील. त्यामुळे या चर्चांचं गुऱ्हाळ सुरू आहे. सुरुवातीलाच संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार केला, तर आमदार नाराज होऊ शकतात आणि येणाऱ्या अधिवेशनात ही नाराजी व्यक्त केली जाऊ शकते.
"त्यामुळे अधिवेशनानंतर विस्तार होईल आणि त्यातही आपापल्या कोट्यातील मंत्रिपदं ही काही काळ रिक्त ठेवली जातील. त्यामुळे आमदारांना मंत्रिपदाचं गाजर दाखवत राहता येतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी काँग्रेसच्या कोट्यातली तीन मंत्रिपदं बराच काळ रिक्त ठेवली होती. त्यामुळे हीच खेळी हे सरकार करेल असं मला वाटतं."

फोटो स्रोत, ShivSena/facebook
राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनीही असंच मत मांडलं. पण, मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचाही विचार करावा लागेल, असं ते म्हणतात.
त्यांनी म्हटलं, "मंत्रिमडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला गृह, वित्त आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती हवी आहेत. दुसरीकडे शिवसेनेला गृहमंत्रिपद स्वत:कडे ठेवायचं आहे. काँग्रेसलाही चांगली खाती हवी आहेत. त्यामुळे या तीन पक्षांमध्ये मंत्रिपद वाटपाला वेळ लागत आहे."
"याशिवाय मित्रपक्षांनाही मंत्रिपदं हवी आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना कृषी मंत्रिपदाची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू यांनाही कृषी मंत्रिपद हवं आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या पदवाटपावरूनही मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे."
अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविषयी तीन पक्षांमध्ये वाद आहेत का, याबद्दल बोलताना देसाई यांनी म्हटलं, "अजित पवार यांचा समावेश मंत्रिमंडळात व्हावा की नाही याविषयी वाद असण्याचं कारण नाही. कारण, शरद पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय, की अजित पवारांचा पक्षातल्या विधिमंडळ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना पद मिळण्यात अडचण येणार नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








