देवेंद्र फडणवीस केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री झाल्याचा भाजप नेत्याचा दावा

केंद्र सरकारचे 40 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे औट घटकेचे मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे. कर्नाटकात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

"महाराष्ट्रातील आमचे नेते देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी हा ड्रामा कशासाठी केला, माहिती आहे का? कारण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 40 हजार कोटी रुपये मिळाले होते. विकासासाठी आलेल्या या निधीचा महाविकास आघाडीकडून गैरवापर केला जाईल, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे हा ड्रामा करण्याचं ठरलं होतं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या 15 तासांत त्यांनी 40 हजार कोटी केंद्र सरकारकडे परत पाठवले," असं अनंत हेगडे यांनी म्हटलं आहे.

अनंत हेगडे यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं असून मी मुख्यमंत्री असताना याप्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे सगळे आरोप खोटे आहेत, असं त्यांनी म्हटलं.

"बुलेट ट्रेनसाठी देखील केंद्राकडून महाराष्ट्राला कुठलाही निधी मिळालेला नाही. त्यासाठी एक कंपनी तयार करण्यात आली आहे, त्यामुळे यासाठी आलेला पैसा थेट त्या कंपनीकडे जाईल. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालेल्या माहितीवर वक्तव्य करण्यापेक्षा पुराव्यानिशी बोलण केव्हावी चांगलं," असंही फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनंतकुमार हेगडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊत यांनी म्हटलं, की "अनंतकुमार हेगडे म्हणतात त्याप्रमाणे केंद्र सरकारचे 40 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. असं असेल तर ही महाराष्ट्रासोबत केलेली गद्दारी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)