अजित पवार यांचं बंड शरद पवार कसं करतील थंड? - दृष्टिकोन

काका-पुतणे

फोटो स्रोत, PTI

    • Author, शिवम विज
    • Role, बीबीसीसाठी

महाराष्ट्रातील राजकारणात आज सर्वात मोठं नाव कोणतं असेल तर ते आहे शरद पवार. सत्तेच्या सारीपाटावर त्यांना मात मिळेल, असा विचारही कुणी केला नव्हता. मात्र, राजकारण म्हटलं की शह-काटशह आलाच.

शरद पवारांच्या खेळीचा अंदाज येत नाही, असं त्यांच्याविषयी नेहमीच बोललं जातं. ते अत्यंत धूर्त, चाणाक्ष राजकारणी असल्याचंही मानलं जातं. मात्र, त्यांच्या काळातले राजकारणी तसेच होते. मग ते अहमद पटेल असो वा मुलायम सिंह यादव. या राजकारण्यांनी राजकारणातल्या बुद्धिबळात अनेक यशस्वी खेळी खेळल्या आहेत.

शनिवारी सकाळी आठ वाजता 'ब्रेकिंग न्यूज' आली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. इतकंच नाही तर शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या बातमीने राज्यात राजकीय भूकंप घडवला.

सर्वांच्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे, 'ही शरद पवारांचीच खेळी असणार'. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्याच दिवशी डील झाली असणार. रिपोर्टर पवारांचे जुने व्हीडियो नव्याने चाळू लागले. राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांवेळी शरद पवार यांनी ज्या काही प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या होत्या, त्या बुचकाळ्यात टाकणाऱ्या होत्या. तुम्ही भाजपबरोबर जाणार नाही का, या प्रश्नाचं त्यांनी स्पष्ट उत्तर कधीच दिलं नव्हतं.

मात्र, आज शरद पवार आणि त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी बंड केल्याचं म्हटलं. सुप्रिया सुळे यांनी सकाळीच आपलं व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट केलं - 'Party and family split' (पक्ष आणि कुटुंबात फूट). त्या म्हणाल्या, "कुणावर विश्वास ठेवायचा? आयुष्यात कधीच इतका विश्वासघात झाल्याचं वाटलं नाही. नेहमीच त्यांच्या बाजूने उभी राहिले, त्यांच्यावर प्रेम केलं. बघा, त्या बदल्यात काय मिळालं!"

त्या त्यांचे चुलत भाऊ अजित पवार यांच्याविषयी बोलत होत्या, हे उघडच आहे. मात्र, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, हे सर्वांना आधीपासूनच ठाऊक होतं. शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कोण करणार, ही महत्त्वाकांक्षा दोघांनाही होती.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुप्रिया सुळे आणि अजित पवार

सुरुवातीला ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या कुणाच राजकीय विश्लेषकाचा या कशावरच विश्वास बसत नव्हता. या सर्वांमागे शरद पवारच आहेत, याची 100% खात्री त्यांना वाटत होती. लोकांनाही वाटलं, हे सगळं ठरवून करण्यात आलेलं नाट्य आहे.

आता शरद पवारांना राष्ट्रपतिपद तर सुप्रिया सुळे यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, असे अंदाजही बांधले गेले. अभिषेक मनु सिंघवी यांनी तर आपल्या ट्विटरवरून एका प्रसिद्ध हिंदी गाण्याच्या ओळी पोस्ट केल्या - 'वो जो कहते थे कि हम न होंगे जुदा, बेवफा हो गए देखते-देखते'.

मात्र, त्यानंतर शरद पवारांकडून कळवण्यात आलं की दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येईल. त्यामुळे आता घोडेबाजार सुरू होणार, हे एव्हाना कळून चुकलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार फोडले जातील, याची आकडेवारी दिली जाऊ लागली. 10 ते सर्वच्या सर्व 54 आमदारांची संख्याही दाखवली जात होती. त्यामुळे शरद पवारांना राष्ट्रपतिपदाची ऑफर दिली गेली, असं कुठेच दिसेना. बघता बघता राजकारणातल्या या मातब्बर खेळाडूच्या हातातून डाव निसटला. स्वतःच्या पुतण्यानेच त्यांना शह दिला होता. एका हिंदी गाण्यातून सांगायचं झालं तर "शिकारी खुद यहा, शिकार हो गया...".

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

सत्तेच्या या सारीपाटात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून जसा शरद पवारांचा पराभव झाला तसाच पराभव झाला काँग्रेसचे चाणक्य मानले जाणारे अहमद पटेल यांचा.

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी डील करायला खूपच वेळ लावला." राज्यात जवळपास दोन आठवड्यांपूर्वी 12 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू झाली. तोपर्यंत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र यावं, यावर तिन्ही पक्षांचं एकमत झालं होतं.

मात्र, 12 ते 23 नोव्हेंबरच्या मधल्या काळात या त्रिकोणी आघाडीत सरकार कसं स्थापन करावं, याबाबतच्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून चर्चेची गुऱ्हाळ सुरू होती. आघाडीचं नावं काय असेल, किमान समान कार्यक्रमाची भाषा कशी असेल, अशा गोष्टींवरून खलबतं सुरू होती.

हे सगळं असं सुरू होतं जणू भाजपनं सत्तेवरचा दावा सोडलाच आहे, याची खात्रीच त्यांना होती. मात्र, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असं भाजपकडून वारंवार सांगितलं जात होतं.

तिन्ही पक्षांच्या या त्रांगड्यात बरेच घोळ असल्याचं लक्षात येताच भाजपने डाव साधला आणि अजित पवारांनाच गळाला लावलं. अजित पवार यापूर्वीही एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. येऊ घातलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाशिवआघाडीत किंवा महाविकासआघाडीत त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पदच दिलं जाणार, अशी शक्यता होती. तर मग आपल्याच काकांविरोधात बंडाळी करून अजित पवारांना असं काय वेगळं मिळणार होतं?

अजित पवारांनी भाजपची ऑफर स्वीकारली, कारण...

भाजपने दिलेली ऑफर स्वीकारण्यासाठी 60 वर्षीय अजित पवार यांच्याकडे अनेक कारणं होती. पहिलं आणि सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपसोबत गेल्याने त्यांच्यावर असलेली तुरुंगवारीची टांगती तलवार जरा दूर गेली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे 'भाजपच्या गंगेत स्नान करून पवित्र होणं' त्यांच्यासाठी गरजेचं होतं.

गोडाधोडाचं ताट आणि उपासमार, यापैकी एकाची निवड करायची असेल तर तुम्ही उपासमार का निवडणार?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत जवळपास 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या वर्षी निवडणुकीच्या आधी म्हणजे ऑगस्ट महिन्यात या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच EDने अजित पवारांचीही चौकशी सुरू केली होती. याशिवाय अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्याचा खटलाही न्यायालयात सुरू आहे.

त्यामुळे आता भाजपसोबत गेल्याने अजित पवार तुरुंगात जाणार नाही, हे तर निश्चित झालं आहे. याशिवाय आणखीही काही कारणं आहेत, ज्यामुळे अजित पवारांनी भाजपची ऑफर स्वीकारली असणार.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात ते यशस्वी झाले तर ते शरद पवारांचे वारस ठरतील. सुप्रिया सुळेंना आव्हान देत महाराष्ट्रातला प्रमुख मराठा नेता होण्याचा ते प्रयत्न करतील. अजित पवार यांची सध्याची प्रतिमा ही भ्रष्ट बाहुबली नेत्याची आहे. महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा तशीच आहे जशी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांची. कदाचित भाजपला साथ देणं, याकडे ते स्वतःची नकारात्मक प्रतिमा पुसण्याची संधी म्हणूनही बघत असतील.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

मात्र, 30 नोव्हेंबरला होणाऱ्या फ्लोअर टेस्टमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस ही आघाडी आता सर्वतोपरी प्रयत्न करेल.

शिवाय, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले आहेत. अशी सगळी परिस्थिती असली तरी देवेंद्र फडणवीस त्याआधी राजीनामा देतील, अशी काही शक्यता दिसत नाही. मात्र, राज्यात ज्या पद्धतीने सर्व चित्रच पालटलं आहे, ते बघता काहीही अशक्य नाही.

यानंतर भाजपची कसोटी 30 नोव्हेंबरला लागणार आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा फटका बसू नये, यासाठी भाजपला राष्ट्रवादीच्या दोन तृतीयांश आमदारांची गरज असेल. किंवा किमान 30 नोव्हेंबरला होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादीचे दोन तृतीयांश आमदार सभागृहात हजर हवेत.

राष्ट्रवादीकडे 54 आमदार आहेत. यापैकी भाजपला किमान 35 आमदारांची गरज आहे. मात्र, भाजपकडे केवळ 10 ते 12 आमदार आहेत, असं शरद पवारांचं म्हणणं आहे. याचाच अर्थ - नाट्याचा हा शेवटचा अंक नक्कीच नाहीये. हिंदी चित्रपटात म्हणतात तसं पिक्चर अभी बाकी है...

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)