अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात अशी पाडली उभी फूट

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की..." असं म्हणत अजित पवार यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला.

अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये वेळोवेळी घडल्या. ते वेळोवेळी 'नॉट रीचेबल' झाले. पक्षानं, शरद पवारांनी वेळोवेळी त्यांची समजूत काढली, पण यावेळी मात्र त्यांनी थेट बंडच पुकारला आणि पक्ष तसंच काका शरद पवारांच्या विरोधात ते गेले.

काका शरद पवार यांच्या "शब्दाच्या बाहेर नाही", असं म्हणणारे अजित पवार थेट पक्ष आणि कुटुंबाच्याच बाहेर गेले. असं का घडलं, त्याची सुरुवात कशी झाली, कोण आहे त्याच्या मुळाशी, अजित पवार यांनी एवढी टोकाची भूमिका का घेतली?

पक्षावर नियंत्रण कुणाचं, शरद पवार यांचा उत्तराधारी कोण, यावरून पवार कुटुंबीयांमध्ये मतभेद असल्याचा चर्चा सुरू होत्याच. पण कुणीही पुढे येऊन बोलत नव्हतं. आमचं सर्व सुरळीत सुरू आहे, अशीच उत्तरं पवार कुटुंबातलं प्रत्येकजण देत होता. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच होती.

पवार कुटुंबामध्ये गेल्या काही वर्षांपासून उफळत असलेल्या लाव्ह्याचा अजित पवार यांच्या या कृतीमुळे उद्रेक झाला आहे.

नाराजीची सुरुवात कशी झाली?

2006 मध्येच सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्यावर जरी अजित पवार यांच्या नाराजीचा पाया रचला गेला होता, तरी त्यावर कळस हा अलीकडच्या काळात चढला आहे.

राज्यातली सत्ता गेल्यानंतर अजित पवार यांच्यामागे सिंचन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसनं दरम्यानच्या काळात सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी पक्षात आपल्याला डावललं जात आहे, याची भावना अजित पवारांमध्ये दृढ होत चालली होती.

2009 मध्येही नाराजी

2009 मध्येही अजित पवार असेच नाराज होऊन अनरीचेबल झाले होते.

अजित पवारांच्या त्यावेळेच्या नाराजीबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं की, "राष्ट्रवादी काँग्रेस साधारणतः मराठा समाजाचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षानं सातत्यानं त्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे 2009 साली अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदावरचा दावा डावलून ते छगन भुजबळांना दिलं गेलं. कारण ओबीसी मतांसाठी ते आवश्यक होतं.

"शरद पवारांना 'बेरजेचं राजकारण' करायला आवडतं. त्यामुळे मराठा मतांना ओबीसी जोड असा तो प्रयत्न होता. त्यापूर्वीही 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा निवडून येऊनही अजित पवारांना मुख्यमंत्रिपद मिळालं नव्हतं. ते शल्यही अजित दादांच्या मनात असावं."

अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार 2019 लोकसभा निवडणुकीत हरला

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार 2019 लोकसभा निवडणुकीत हरला

2017च्या दरम्यान राज्यात वेगवेगळ्या जिल्हा परिषदा तसंच पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई आणि इतर महापालिकांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं वाक्-युद्ध गाजत होतं, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एक वेगळंच राजकारण सुरू होतं.

सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीत सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलकडून पद्धतशीरपणे फक्त सुप्रिया यांच्याच सभा आणि इतर गोष्टींना जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली जात होती. मुख्य मीडियातही त्यांचीच चर्चा होती. ठाण्यातल्या प्रचारात वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी बाईकवरून केलेला प्रवासही चर्चेचा विषय ठरला होता.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुप्रिया सुळे आणि अजित पवार

सोशल मीडियावर आणि एकंदरच मुख्य मीडियात आपण कमी पडत आहोत आणि आपल्याला डावललं जात आहे, अशी भावना अजित पवार यांच्या गोटात सुरू होती. त्याची कसर भरून काढण्यासाठी दुसऱ्या कुठल्या एजन्सीची मदत घेऊन काही करता येईल का, याची चाचपणी अजित पवार यांच्या गोटात सुरू झाली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. निवडणुका ऐन भरात आल्या होत्या.

मतदान झालं आणि निकाल लागले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँगेसच्या ताब्यातून निसटल्या होत्या. या दोन्ही शहरांवर एकेकाळी अजित पवार यांचा एकछत्री अंमल होता. त्यांच्या गोटातले जवळपास सर्वच नगरसेवक भाजपमध्ये गेले होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

हे नेमकं काय झालं, अजित पवारांचा हा पराभव आहे की त्यांनीच हे घडवून आणलंय, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. त्यानंतरच्या काळात अजित पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा फारसे कुठे दिसले नाहीत.

2019: मुलाचा पराभव आणि आमदारकीचा राजीनामा

पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आलं. पार्थ यांना उमेदवारी देण्यासाठी शरद पवार फारसे अनुकूल नाहीत, अशा बातम्या अजित पवार यांच्या गोटातून येऊ लागल्या.

अखेर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यासाठी शरद पवारांना माढामधून माघार घ्यावी लागली. पुढे पार्थ पवार लोकसभा निवडणुकीत पडले.

त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या पक्षांच्या यात्रा सुरू झाल्या. सर्व पक्षांचा प्रचार जोरदार सुरू असतानाच महाराष्ट्र सहकारी बँकेतल्या गैरव्यवहार प्रकरणी EDनं गुन्हा नोंदवला. त्यात अजित पवारांसह 70 जणांचं नाव आलं खरं, मात्र आरोपपत्रात शरद पवारांचं नाव असल्याचंही पुढे आलं.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजप विरोधकांविरुद्ध सरकारी यंत्रणेचा वापर करतंय, असे आरोप झाले आणि शरद पवार यांनी स्वतःहून 27 सप्टेंबरला EDच्या ऑफिसला चौकशीसाठी जाणार असल्याचं जाहीर केलं.

ज्या दिवशी शरद पवार यांच्या मुंबईत ED कार्यालय भेटीचं हे सगळं नाट्य सुरू होतं, त्याच दिवशी अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते 'नॉटरीचेबल' झाले. पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आपण राजकारणातून बाहेर पडू आणि शेती किंवा उद्योग करू, अशी चर्चा त्यांच्या कुटुंबीयांशी केल्याचं जाहीर केलं.

अजित पवार नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा माध्यमांमध्ये सुरू झाली. पण पुढच्या 24 तासांच्या आतच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन "आमच्या घरात गृहकलह नाही. आमचा परिवार मोठा असला तरी घरातील ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करेल तसंच आम्ही वागतो. आताही शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहे," असं जाहीर केलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

त्यानंतरच्या काळात अजित पवार यांच्या राजीनामा देण्याच्या टायमिंगवर छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

त्यावर "मी योग्य अयोग्य बघत नाही. माझ्या मनात एखादी गोष्ट आली की मी ती करतो. परिणाम बघायला आम्ही बसलेलो नाही. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे वाटतं तेच मी करतो," असं उत्तर अजित पवार यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

अजित पवारांच्या नाराजीबद्दल बोलताना नानिवडेकर यांनी तेव्हा म्हटलं होतं, "अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. मात्र शरद पवारांवर जेव्हा EDने ठपका ठेवला तेव्हा त्यांच्यासाठी पक्ष एकत्र आला. त्यांच्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे दादांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला असेल, की माझ्या अडचणीत, आरोपांमध्ये पक्ष माझ्याबरोबर राहील का? त्यामुळेच अजित पवारांनी 'माझ्यासोबत उभं राहा' हे सांगण्यासाठी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं."

शरद पवारांनाही कल्पना न देता अजित पवारांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनी म्हटलं होतं की अजित पवारांचा हा निर्णय अनाकलनीय आहे. "त्यांची नेमकी नाराजी काय आहे, हे आपल्याला माहीत नाही. त्यांनी ती स्पष्ट केली नाही. राजीनामा देण्याची वेळ अजित पवारांनी चुकीची निवडली," असं आसबेंनी म्हटलं.

'नो कमेंट्स, मी बारामतीला चाललोय'

त्यानंतर निवडणुका होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. त्याच दरम्यान बुधवारी 13 नोव्हेंबरच्या रात्री 8च्या सुमारास शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यातून अजित पवार तडकाफडकी बाहेर निघाले आणि गाडीत बसले.

"नो कमेंट्स, नो कमेंट्स. मी बारामतीला चाललोय," असं म्हणत ते निघून गेले. तसंच त्या दिवसाची नियोजित बैठक रद्द झाल्याचंही त्यांनी सांगून टाकलं.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पुन्हा एकदा सुरू झाली. त्याचवेळी शरद पवार यांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर येऊन तिथं उपस्थित असलेल्या पत्रकारांना चांगलंच सुनावलं.

"अजित पवार कुठेही गेलेले नाहीत. माध्यमांसमोर ते चेष्टेनं म्हणालेत. तुमच्या अशा मागे धावण्यानं काही प्रायव्हसी उरत नाही, त्यासाठी ते असं म्हणालेत," असं शरद पवार म्हणाले.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

यावेळी देखील अजित पवार नाराज नाहीत, त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे असं सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे वेगवेगळे नेते पुढे येऊ लागले.

या परिस्थितीचं विश्लेषण करताना संदीप प्रधान यांनी सांगितलं होतं, "2014ला राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता गेली. 2019च्या लोकसभेला अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. तसंच 2004ला हाती आलेल्या मुख्यमंत्रिपदानं अजित पवारांना हुलकावणी दिली, या सगळ्या घडामोडी बघता अजित पवार अस्वस्थ असू शकतात."

अखेर मोठं बंड

अजित पवार यांच राजकारण जवळून पाहाणारे ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात, "ठाकरे आणि मुंडे यांच्या घराण्यात ते स्वतः हयात असताना फूट पडली. मात्र पवारांच्या घरात ते हयात असेपर्यंत तरी तसं काही होणार नाही, असं म्हटलं जात होतं. पण आता तसं राहिलेलं नाही. अजित पवार नाराज आहेत, हे वेळोवेळी नाकारलं जात होतं, ते आता खरं ठरलं आहे.

"अजित पवार यांचा कोंडमारा, हे त्यामागचं मुख्य कारण आहे. पार्थचं निवडणूक हरणं, रोहितचं निवडून येणं. संभाव्य मंत्रिमंडळात रोहितच्या नावाची चर्चा. पार्थच्या भवितव्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून असलेला दबाव. पक्षात आपण डावलले जात आहोत, अशी भावना, आणि EDच्या चौकशीची टांगती तलवार, अशा स्थितीत त्यांचा हा स्फोट झाला आहे."

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

"शिवाय सध्या सुरू असलेल्या तिन्ही पक्षांच्या चर्चांमध्ये कुठेही अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा होताना दिसत नव्हती. आपल्या वाट्याला काही ते पद येत नाही, हे लक्षात आल्यावरच अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असावा, कारण शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असं जाहीर केल्यानंतच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या आधीही EDच्या चौकशीवरून पवारांनी तयार केलेल्या फुग्याला अजित पवार यांनी टाचणी लावली होती," अशी आठवण मेहता करून देतात.

पण "अजित पवार यांचं हे वेडं साहस आहे. बारामतीमध्ये लोक नाराज आहेत. त्यामुळे लाँगटर्मसाठी त्यांना याचा फायदा होणार नाही," असं मेहता यांना वाटतं.

पवार कुटुंबात पॉवर गेम?

राजकारणात असलेल्या प्रत्येक कुटुंबात पॉवर गेम असतो तसा तो पवार कुटुंबामध्ये सुद्धा आहे. शरद पवार यांच्यानंतर पक्षावर नियंत्रण कुणाचं, यावरून वाद आहेत. तेच आता चव्हाट्यावर आले आहेत. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि त्यांचा पुतण्या रोहित पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतर तो संघर्ष अधिक तीव्र होत गेला.

त्यातच शरद पावर यांनी 'माझं पंतप्रधानपदाचं स्वप्न रोहित पवार पूर्ण करेल', असं कर्जत-जामखेडमध्ये म्हटल्याच्या सोशल मीडिया पोस्ट मधल्या काळात व्हायरल झाल्या होत्या. प्रत्यक्षात शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात असं काहीतरी बोलल्याचं मात्र दिसून आलं नाही.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

मधल्या काळात "वैचारिक वारसदार कुणी असू शकतो, असं शरद पवारांनी वेळोवेळी सांगितलं आहे. त्यांनी याआधी सुद्धा छगन भुजबळ किंवा आर. आर. पाटलांना संधी दिली होती," अशी आठवण मेहता करून देतात.

राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात, "अजित पवार यांच्या कृती अविवेकी आहेत, त्या अनेकदा शरद पवारांना पटत नाहीत. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयातून ते दिसून आलंय. 2004 नंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत स्कॉर्पिओ कल्चर आणलं, असा त्यांच्यावर आरोप होत होता. त्यामुळेच शरद पवारांना अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रियाच वारसदार ठरतील, असं पवारांना वाटत असावं."

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

अजित पवार यांचं कुटुंब एका बाजूला

अजित पवार यांच्या या कृतीमुळे मात्र त्यांचं कुटुंब आता पवार कुटुंबापासून एका बाजूला गेल्याचं दिसतंय. स्वतः अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलं पार्थ आणि जय, हे चार जण या राजकीय भूकंपामुळे आता मुख्य कुटुंबापासून बाजूला गेले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 4

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)