देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' कसं पार पाडलं?

फडणवीस, अजित पवार

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, फडणवीस, अजित पवार
    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पहाटे 5 वाजून 47 मिनिटांची वेळ. महाराष्ट्र साखरझोपेत असताना... हजार किलोमीटर उत्तरेला नवी दिल्लीत एक महत्त्वाची गोष्ट घडत होती. हिवाळ्यातल्या या भल्या पहाटे राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका महत्त्वाच्या कागदावर सही करत होते.

शनिवारी 23 नोव्हेंबरच्या पहाटे त्यांनी सही करताच... महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली. त्यामुळे नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला.

हे दिल्लीत घडत होतं तेव्हा मुंबई राजभवनात शपथविधीसाठी तयारी सुरू झाली होती. पण हा शपथविधी उद्धव ठाकरेंचा नव्हता. तो होता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा!

बारा तासांपूर्वीच... म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक झाल्यावर शरद पवार म्हणाले होते की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील.

मग या 12 तासांत असं काय घडलं की राज्याचं राजकारण पूर्ण बदललं.. कर्नाटकात जसं भाजपने बहुमत नसतानाही दुसऱ्या पक्षाचे आमदार वळवले होते.. तसंच काहीसं महाराष्ट्रात घडलं का? कसं झालं महाराष्ट्राचं ऑपरेशन लोटस?

रात्री काय घडलं?

शुक्रवारी 22 नोव्हेंबरच्या रात्री 9.30 वाजता देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झाले. त्यांनी आपल्याकडे 173 आमदार असल्याचं सांगितलं आणि सत्तास्थापनेचा दावा केला.

भाजपचे स्वत:चे 105, राष्ट्रवादीचे 54 आणि 14 अपक्ष असा त्यांच्या दाव्याचा अर्थ निघतो. पुढे राष्ट्रवादीने पाठिंबा असल्याचं नाकारलं असलं, तरी रात्री भाजपच्या सत्तास्थापनेच्या दाव्यात राष्ट्रवादीच्या आमदारांचीही मोजणी झाली असावी.

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter/@CMOMaharashtra

त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता स्वत: अजित पवार राज्यपालांकडे गेले आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असणारं पत्र दिलं, असं एबीपी माझा वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत असल्याचं लक्षात येताच राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी रातोरात राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस करणारं पत्र दिल्लीत धाडलं.

राष्ट्रपतींनी कलम 356 (2) अन्वये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहाटे पावणे 6 वाजता महाराष्ट्रातील 12 दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रपती राजवट हटवण्याची परवानगी दिली. त्यामुळे नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला.

मग शनिवारी सकाळी सहा ते 6.30 दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी करण्याचे निवेदन राज्यपालांना दिलं.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांना धनंजय मुंडेंच्या बी4 बंगल्यावर तातडीने जमण्यासाठी फोन गेले. 11 आमदार सकाळी 7 पर्यंत तिथे पोहोचले. त्यांना राजभवनावर नेण्यात आलं.

त्यानंतर 8 वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतली.

पण शपथविधीबद्दल आम्हाला काही सांगण्यात आलं नाही, असा दावा त्यावेळी राजभवनात उपस्थित असलेल्या काही आमदारांनी नंतर केला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दुपारपर्यंत 11 आमदारांपैकी 6 आमदार शरद पवारांकडे परत आले. त्यामुळे 5 आमदार अजित पवारांसोबत असण्याची शक्यता आहे. ज्या धनंजय मुंडेंच्या घरी हे आमदार जमले होते, ते संशयास्पदरीत्या गायब होते. ते थेट संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीत पोहोचले.

पण हे सारं एका रात्रीत झालं?

खरं तर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत म्हणतात तसा हा खेळ फक्त रात्री झाला नाही. त्याची तयार अनेक दिवसांपासून सुरू होती.

पत्रकार पवन दाहट म्हणतात, "ऑपरेशन लोटस जरी निकालानंतर सुरू झालं असलं तरी त्याची बिजं वर्षभरापूर्वीच्या घटनांमध्ये आहे. पार्थ पवारांचा पराभव, रोहित पवारांचा उगम यामुळं अजित पवार नाराज होते. 27 सप्टेंबरला अजित पवारांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हाच हे सारं घडलं असतं. पण तेव्हा शरद पवारांनी त्यांना थांबवलं."

त्यानंतर अजित पवारांनी सातत्यानं पक्षाला अडचणीत आणण्याचाही प्रयत्न केल्याचं ज्येष्ठ पत्राकार श्रीमंत माने सांगतात. तुम्हाला आठवत असेल त्यांनी प्रचारादरम्यान म्हटलं होतं की 'बाळासाहेब ठाकरेंना अटक करणं राष्ट्रवादीची चूक होती. काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई केली गेली.' अजित पवारांच्या या विधानामुळे छगन भुजबळ चिडले आणि राष्ट्रवादीमध्ये ऐन निवडणुकीत संघर्ष पेटला होता.

पुढे निवडणुका झाल्या आणि निकाल लागला. भाजप-शिवसेनेला बहुमत असतानाही दोन्ही पक्षात मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला. दोन्ही पक्ष वेगळे झाले आणि तिथूनच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला नव्यानं सुरुवात झाली.

अजित पवार, शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

पवन दहाट म्हणतात, अजित पवारांच्या नाराजीवर आणि हालचालींवर भाजपचं व्यवस्थित लक्ष होतं आणि तेच पुढे त्या नाराजीचा फायदा करून घेतला.

गेल्या काही दिवसांत माध्यमांचं आणि लोकांचं लक्ष शिवसेन-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या न संपणाऱ्या बैठकांवर होतं, तेव्हा भाजप शांतपणे बसली होती, असं अनेकांना वाटलं. पण प्रत्यक्षात फडणवीस पडद्याआडून हालचाली करत होते.

एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम म्हणतात, "महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 4 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले. त्या दिवशी ते अमित शाह यांना भेटून आले होते. विशेष म्हणजे याच दिवशी अजित पवारही दिल्लीत होते."

धनंजय मुंडेंचा रोल?

ऑपरेशन लोटससाठी राणा जगजितसिंह पाटील आणि धनंजय मुंडे यांची मदत घेतल्याचं फ्री प्रेस वृत्तपत्राचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार म्हणतात: "पद्मसिंह पाटील हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे सावत्र भाऊ. पद्मसिंहांचा मुलगा राणा जगजीतसिंह पाटील हे भाजपमध्ये जाऊन आमदारही झालेत. त्यामुळं घरातलाच माणूस भाजपमध्ये होता. दुसरीकडे, धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांशी उत्तम संबंध आहेत. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावलं होतं. धनंजय मुंडे आणि अजित पवार हे दोघेही तिथं गेले होते."

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

यावर बीबीसी मराठीने धनंजय मुंडेंचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण ते उपलब्ध नव्हते.

विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या घडामोडी दिल्ली आणि मुंबईत कोणत्याही पत्रकाराला किंवा वृत्तसंस्थेला काहीही कळलं नाही. पत्रकार उदय तानपाठक म्हणतात, "अशा घटना नेहमीच मध्यरात्री होता. माध्यमांचं दुर्लक्ष झालं, कारण भाजप सत्तेच्या बाहेर आहे आणि राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस हेच सरकार बनवणार असं दिसत होतं. मात्र, हीच वेळ भाजपनं साधली."

अजित पवारांनी दिले होते संकेत

गेल्या काही दिवसातील अजित पवारांच्या हालचालींमुळे भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'चे संकेत मिळत होते. ते सिल्वर ओकच्या बैठकीतून सरळ बारामतीला निघून गेले होते. ते बैठकांमध्येही नाराज होते, असं नंतर संजय राऊत म्हणाले.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

संजय राऊत: "अजित पवार काल रात्री आमच्याबरोबर होते. पण बैठकीत आमच्या नजरेला नजर भिडवत नव्हते. हे शरद पवार साहेबांच्या लक्षात येत होतं. ते अचानक बाहेर पडले. त्यांचा फोन बंद झाला. वकिलाकडे बसले होते असं सांगण्यात आलं. शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात वातावरण निर्माण झालं. तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला. तेव्हात त्यांच्या मनात काळंबेरं आहे हे लक्षात आलं."

यादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका मांडताना सातत्यानं काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून नवाब मलिक दिसत होते. अजित पवार हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असतानाही ते माध्यमातून पक्षाची भूमिका मांडत नव्हते, किंबहुना ते नाराज असल्याचीच चर्चा अधिक होत राहिली.

गोड बातमीची कशी होती खात्री?

अजित पवारांप्रमाणे 'ऑपरेशन लोटस'ला भाजपच्या गोटातूनही अप्रत्यक्षपणे संकेत दिले गेले होते का, अशी शंका घेण्यास वाव आहे.

याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर यांसह अनेक भाजप नेत्यांनी वारंवार हेच सांगितलं होतं की, महाराष्ट्रात भाजपचंच सरकार येईल.

  • देवेंद्र फडणवीस : 14 नोव्हेंबर 2019 रोजी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, भाजपला वगळता कुणालाही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येणार नाही.
  • नितीन गडकरी : काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले होते, राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. एखाद्यावेळी तुम्ही सामना हरताय असं वाटतं, पण निकाल नेमका उलटा लागतो.
  • चंद्रकांत पाटील : 15 नोव्हेंबर रोजी प्रदेश भाजपची मुंबईत बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाजपचीच सत्ता महाराष्ट्रात येण्याचा दावा केला होता.
  • सुधीर मुनगंटीवार : माजी अर्थमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं 'लवकरच गोड बातमी मिळेल' असं म्हटलं होतं. मुनगंटीवारांच्या या वक्तव्याची सोशल मीडियासह सर्वत्र चर्चाही झाली होती.

आता महाराष्ट्राला गोड बातमी मिळाली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. पण आता भाजपला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आणि ते होईपर्यंत हे ऑपरेशन लोटस सुरूच राहील, अशी चिन्हं आहेत.

बाजारात अनेक पक्षांचे बरेच आमदार उपलब्ध आहेत, असं भाजप नेते नारायण राणे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले आहेतच.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)