You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनी फसवलं आहे - अशोक चव्हाण
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या 'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राजभवनात सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा सोहळा झाला.
त्यानंतर शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवार यांच्याबरोबर 10-11 आमदार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. मात्र त्यांना याबद्दल कुठलीही कल्पना नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस यांनी संयुक्तरित्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधी विरोधात तसंच राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच व्हावा अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी या पक्षांच्या वकिलांनी केली आहे.
या संदर्भात उद्या 11.30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
आज दिवसभरात काय काय घडलं? पाहा सगळ्या घडामोडी इथे -
22.18: जयंत पाटील यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड अवैध : आशिष शेलार
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना अजूनही जयंत पाटील यांची विधिमंडळाच्या नेतेपदी नियुक्ती केल्याचं पत्रही दिलं नाही. त्यामुळे अजित पवारांना विधिमंडळांच्या नेतेपदावरून हटवणं अवैध आहे असं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. "अशी निवड सगळ्या आमदारांच्या समक्ष व्हावी लागते, तसं झालं नाही."
20.51: राज्यपालांना दिलेलं पत्र पाठिंब्याचं नाही - नवाब मलिक
अजित पवारांनी आमदारांच्या स्वाक्षरीचं जे पत्र पाठिंब्याचं आहे असं दाखवलं ते खरंतर पक्षांतर्गत हजेरीचं पत्र आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
पाच आमदार सध्या आमच्या संपर्कात नाहीत तर सहा काही वेळात पोहचतील असंही ते म्हणाले.
"आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. महाआघाडी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार येणार. आम्ही प्रस्ताव पारित केला की अजित पवारांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. विधिमंडळ नेतेपदावरून त्यांना हटवलं आहे. जे पत्र पाठिंब्याचं म्हणून दाखवलं, ते खरं आम्ही पक्षांगर्त घेतलेलं हजेरीचं पत्र होतं, त्याला कव्हर लेटर लावून ते राज्यपालांना सबमिट केलेलं आहे. आमचे आमदार मुंबईतच राहाणार आहेत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
20.13: अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी
भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याचं कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. अजित पवारांना आता व्हीप काढता येणार नाही, तसंच त्यांना पक्षनेते म्हणून कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत.
त्याच्या जागी पक्षनेता म्हणून जयंत पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
19.52: देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनी फसवलं
सकाळपासून चालू असलेल्या नाट्याविषयी बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं की अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची फसवणुक केली आहे. "त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची दिशाभुल केली. आमदारांना खोटं बोलून आज सकाळी राजभवनात बोलवलं आहे. तुम्ही आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पाहिली तर चार-पाच आमदार सोडून सगळेच उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. विश्वासमताची आवश्यकताच नाही कारण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळून स्पष्ट बहुमत आहे. अजित पवारांनीही राजीनामा द्यावा आणि आपल्या घरी परत यावं."
18.50: शिवसेना नेतेही राष्टवादीच्या बैठकीला पोहचले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे काही आमदार उपस्थित आहेत.
तसंच शिवसेना नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरही नुकतेच यशवंतराव चव्हाण केंद्रात पोहोचले आहेत.
दुसरीकडे अजित पवार त्याचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुंबईतल्या ब्रायटन या निवासस्थानी आहेत.
17.26: धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीला
अजित पवारांसोबत कोण आमदार आहेत याचे तर्कवितर्क केले जात आहेत. सकाळी शपथविधीला अजित पवारांसोबत असणारे आमदार राजेंद्र शिगणे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांनी स्पष्ट केलं की त्यांना अजित पवारांच्या शपथविधीविषयी काहीही माहिती नव्हती आणि ते पक्षासोबतच आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार धनजंय मुंडे यांचा फोन सकाळपासून नॉट रिचेबल होता. पण आता ते राष्टवादीच्या बैठकीला हजर झाले आहेत.
16.53: मी पक्षाच्या भुमिकेच्या विरोधात नाही : दिलीप बनकर
त्यांनी ट्वीट केलं आहे की, "मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहे. माझा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. अजित पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो. तिथ काय होणार आहे, या बाबत कोणतीही कल्पना नव्हती, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही!"
16.29: राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला
सुनील तटकरे, हसन मुश्रिफ आणि दिलीप वळसे-पाटील असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवारांची समजूत काढून मन वळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. अजित पवार सध्या त्यांचे बंधू श्रीनिवास पवार याच्या मुंबईतल्या नेपियन-सी इथल्या घरी आहेत.
16.22: देवेंद्र फडणवीस : अजित पवारांच्या समर्थानातून मजबूत सरकार देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयाबाहेर पक्ष कार्यकत्यांना संबोधित केलं. भाजपचे जेष्ठ नेतेही यावेळी उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी समर्थकांचे आभार मानले.
ते म्हणाले, "मी सगळ्या समर्थक आमदारांचे आभार मानतो, आपले सगळे मित्र आपल्या सोबत आहेत, एक मित्र सोबत राहिले नाहीत हे खरंय, पण आमची बांधिलकी महाराष्ट्राच्या जनतेशी आहे. आता अजित पवारांनी जनतेला स्थिर सरकार देण्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे. त्यांच्या समर्थानाने आम्ही मजबूत आणि पाच वर्ष स्थिर राहाणारं सरकार देणार. हे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करेल."
16.07: हा दिवस भारताच्या इतिहासातलं काळं पान - रणदीप सुरजेवाला
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, "23 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळं पान म्हणून ओळखलं जाईल. भाजपनं बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला."
आमदारांच्या निष्ठेची बोली लावणं ही भाजपची ओळख बनली आहे. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी आणि अमित शाहांनी राज्यघटनेला तिलांजली दिली. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपनं लोकशाहीची आत्महत्या केली.
राज्यपालांनी शपथविधीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कोणत्या पत्राच्या आधारे निमंत्रित केलं? माध्यमं आणि महाराष्ट्राच्या जनतेपासून ही गोष्ट लपवून का ठेवण्यात आली? लोकशाहीची ही गळचेपी कधीपर्यंत चालू राहील हा प्रश्न आहे, असंही ते पुढे म्हणाले.
15.20 : जनादेश आम्हालाच, आम्ही बहुमत सिद्ध करणार
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या भल्या पहाटे झालेल्या शपथविधीविषयी बोलताना ते म्हणाले, "ते रात्री बसून मुख्यमंत्र्यांचं नाव फायनल करू शकतात, पण आम्ही सकाळी शपथ घेतली तर तुम्ही लोक आक्षेप घेता?"
अजित पवारांना राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा नाही असं या शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, "त्यांच्या पक्षात अंतर्गत काय चालू आहे ते मला माहित नाही, पण आम्ही बहुमत सिद्ध करणार. अजित पवारांना एका मोठ्या आमदारांच्या गटाचा पाठिंबा आहे."
ज्या अजित पवारांवर घोटाळ्यांचे आरोप केले त्याच अजित पवार आणि त्यांचा समर्थकांना घेऊन सरकार कसं स्थापन केलं या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "शिवसेनाने स्वार्थासाठी आपली 30 वर्षांची दोस्ती तोडली ते चालतं, आणि स्थिर सरकारसाठी आम्ही अजित पवारांना आमच्यासोबत घेतलं तर ती लोकशाहीची हत्या ठरते. अजित पवारांना अनेक आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही बहुमत सिद्ध करणार आणि एक स्थायी, प्रामाणिक सरकार देणार."
"बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शवर जे चालू शकले नाहीत त्यांच्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांनी ठामपणे काँग्रेसला विरोध केला होता. सत्तेसाठी आपल्या विचारांशी समझोता केलेल्यांनी शिवाजींच्या विचाराबदद्ल बोलू नये," असंही ते पुढे म्हणाले.
15.00: अजित पवार शपथ घेणार याची पुसटशी कल्पना नव्हती : राजेंद्र शिंगणे
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे सकाळी अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते.
त्यांनी बीबीसीला सांगितलं, "सकाळी 7 वाजता आम्हाला मुंबईला बोलावण्यात आलं. आम्ही 10 आमदार होतो. पण, नेमकं कशासाठी बोलावण्यात आलं याची काहीही कल्पना आम्हाला देण्यात आली नाही. त्यानंतर आम्हाला राजभवनात नेण्यात आलं. तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला थोडी शंका आली. नंतर तिथं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन आले. थोड्यावेळानं राज्यपाल आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेतील, असं सांगण्यात आलं, त्यावेळी मात्र आम्ही अचंबित झालो. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर मी शरद पवारांना जाऊन भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. नंतर अजित पवार म्हणाले, याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना भेटून सविस्तर माहिती सांगतो."
पाहा फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी
14.37: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बहुमत सिद्ध करतील - नितीन गडकरी
आज पहाटेपासून घडलेल्या गोष्टींबद्दल पत्रकरांशी बोलतना भाजप नेते नितीन गडकरी म्हणाले, "मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. राज्यपालांनी 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे, दिलेल्या मुदतीत ते बहुमत सिद्ध करतील, असा मला विश्वास आहे."
14.04: मी माझ्या सोयीनं भूमिका मांडेन अशी अजित पवार यांनी 'एबीपी'शी बोलताना प्रतिक्रिया दिली.
13.39: आजची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांमध्ये लिहिली जाईल- अहमद पटेल
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत बोलताना अहमद पटेल म्हणाले- "आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली शपथ ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांमध्ये लिहिली जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी दिली आहे. हा सगळा प्रकार म्हणजे घटनात्मक व्यवस्थेच्या उडवलेल्या चिंधड्या आहेत असं मला वाटतं.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये एक प्रकारे चर्चा सुरु होती. सगळं चर्चेद्वारे ठरत होतं. त्यासाठीच आम्ही (अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे, के. सी. वेणूगोपाल ) इथं आलो होतो. मात्र काही होण्यापूर्वीच आज जो सकाळी प्रकार झाला तो अत्यंत वाईट आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे वेळकाढूपणा केलेला नाही. काँग्रेसवर वेळकाढूपणाचा आरोप अत्यंत निराधार आहे."
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल, अशोक चव्हाण, के. सी. वेणूगोपाल, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित होते.
13.31: पवार साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकार आमचंच तयार होणार आहे.- संजय राऊत
चंद्रकांत पाटील यांनी तोंड सांभाळून बोलावं, आपला पक्ष सांभाळावा असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. अजित पवार य़ांना ब्लॅकमेल कसं केलंय हे आम्हाला माहिती आहे, त्याचा खुलासा आम्ही सामनामधून करणार आहोत. अजित पवार पुन्हा परतण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
13.06: अजित पवार फुटून जातील असं वाटलं नव्हतं- शरद पवार
बडतर्फीचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घ्यावा लागेल. शिस्तपालन समिती आहे. बैठकीत निर्णय घेता येईल. अजित पवार फुटून जातील असं वाटलं नव्हतं. सुप्रिया सुळे खासदार आहेत. त्यांचा राज्याच्या राजकारणाशी संबंध नाही.आमदारांना कल्पना देता राजभवनात नेण्यात येईल. ईडीच्या चौकशीमुळे काय मला कल्पना नाही. कायदेशीर पेचाचा आता अभ्यास केलेला नाही. गैरसमजुतीतून गेलं असेल तर कारवाईचा प्रश्न नाही. पण जाणीवपूर्वक गेलं असेल तर कारवाई होईल. सकाळच्या शपथविधीसाठी दहा ते अकरा आमदार आम्हाला फोटोत दिसले. तीनजण या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. आणखी काही आमदार परत येत आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.
13.04: सुप्रिया सुळे राष्ट्रीय राजकारणात आहेत. त्या राज्याच्या राजकारणात नाहीत. त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चेत नव्हतं.- शरद पवार
13.03: अजित पवार यांच्यावरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल- शरद पवार
13.02: आम्ही एकत्र आहोत- उद्धव ठाकरे
'शिवसेना जे करते ते उघडपणाने करते. तुम्ही माणसं फोडून राजकारण करताय. रात्रीस खेळ चाले अशी तुमची नीती. हरयाणा, बिहार सगळीकडे तुम्ही जनादेशाचा आदर करत आहात. आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्र पक्ष नको, स्वत:च्या पक्षातील प्रतिस्पर्धी नको.
पाठीत वार केल्यावर शिवाजी महाराजांनी काय केलं हे सगळ्यांना ठाऊक आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा भाव. कायद्यानुसार व्हावं अशी अपेक्षा. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू', असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
12.56: या सरकारकडे बहुमत नाही- शरद पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यात त्यांना यश येणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अजूनही एकत्र आहेत. पुढेही एकत्रच राहाणार आहेत.
12.51: शपथविधीची माहिती नव्हती- आज सकाळी शपथविधीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी आपल्याला शपथविधीची काहीच कल्पना नव्हती असं या पत्रकारपरिषदेत सांगितले.
'रात्री बारा वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर. सकाळी सातला एका ठिकाणी बोलावण्यात आलं. त्यानंतर एका ठिकाणी जायचंय असं सांगण्यात आलं. राजभवनावर जाईपर्यंत कशासाठी जातोय याची कल्पना नव्हती. तिथे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे तिथे होते. थोड्याच वेळात शपथविधी झाला. आम्ही अस्वस्थ होतो. शपथविधी झाल्यानंतर तात्काळ पवार साहेबांकडे आलो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहोत', असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.
12.49: पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले- "महाराष्ट्रात राज्य सरकार बनवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी तयारी केली होती. बहुमताचा आकडा या तिन्ही पक्षांकडे होता. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार 56, 54 आणि 44 असे मिळून 156 आणि अपक्ष तसेच स्वतंत्र उमेदवार मिळून 170च्या आसपास होती. काल बैठक झाल्यानंतर, काही गोष्टी घडल्या. मला साडेसहा पावणेसातला सहकाऱ्याने कळवलं. आम्हाला आणलेलं आहे. राजभवनाची एफिशियन्सी खूपच वाढलेय हे लक्षात आलं.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार. अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरुद्ध. शिस्तभंगाचा प्रकार. भाजपबरोबर राष्ट्रवादीचे जे सदस्य गेले त्यांना माहिती असावी, जे जाणार असतील- आपल्या देशात पक्षांतरबंदीचा कायदा आहे. या कायद्याच्या तरतूदी लागू होतात. सदस्यत्व रद्द होऊ शकतं.
महाराष्ट्रात जनमानस बघतो आहेत, भाजपबरोबर सरकार बनवण्याच्या सक्त विरोधात आहे. सर्वसामान्य मतदार कदापि पाठिंबा देणार नाही. सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्यांचा फेरनिवडुकीत पराभव करण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे प्रयत्न करतील. दहा-अकरा सदस्य तिथे उपस्थित. हा प्रकार झाल्यानंतर काही सदस्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात झाली."
12.45: भाजपाच्या सरकारबरोबर गेलेल्या आणि जाऊ पाहाणाऱ्या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याची कल्पना असावी असं मला वाटतं- शरद पवार
12.43 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेस दोन्ही पक्षांचे इतर अनेक नेते उपस्थित आहेत.
12.05: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहोचले.
12.03: वाय बी. चव्हाण सेंटर येथे सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवारांच्याविरोधात घोषणा
11.45: शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, अहमद पटेल वाय.बी. चव्हाण सेंटरवर उपस्थित
11.40: धरसोड वृत्तीचा शिवसेनेला फटका- एकनाथ खडसे, भाजपा नेते
'शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. शिवसेनेनं ही परिस्थिती ओढवून घेतली आहे. शिवसेनेची गोची झाली आहे. धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेला फटका बसला आहे. भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेते कार्यरत होते. त्यामुळे जे घडलं त्यात नवल नाही', असं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
11.29:काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रवाना. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही आहेत
11.14: शिवसेनेबरोबर जाण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसच्या विचारधारेवर कलंक - संजय निरुपम
"काँग्रेसला स्वतःची विचारधारा सोडून जायला भाग पाडण्यात आलं. काँग्रेसची स्वतःची एक धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे. त्यावर कलंक लावण्याचा प्रयत्न झाला. के. सी वेणूगोपाल यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही. परंतु महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी अशा प्रकारचा सरकार स्थापनेचा प्रयत्न काँग्रेससाठी घातक ठरेल अशी सूचना वरिष्ठांना का दिली नाही हे पाहायला हवे.
काँग्रेसनं शिवसेनेबरोबर कधीही जायला नको होतं. पुढेही जाता कामा नये. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये बसलेल्या नेत्यांवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नये असं मी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना करणार आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी बरखास्त करायला हवी. महाराष्ट्र सरकारसाठी झालेल्या घडामोडी काँग्रेसला कमकुवत करणाऱ्या आहेत. या प्रयोगातून काँग्रेसचं नुकसान होणार होतं. ते झालंच." असं मत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे.
11.07:साडेबारा वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं अधिकृत स्टेटमेंट येईल- सुप्रिया सुळे
शरद पवार, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांची बैठक होईल. त्यानंतर ते साडेबारा वाजता अधिकृत भूमिका मांडली जाईल आणि त्यानंतर मी माध्यामंशी बोलेन असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
11.04: पक्ष आणि कुटुंबात फूट- सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस
11.03: अजित पवारांबरोबर गेलेले आमदार शरद पवारांना भेटले- नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
'आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राचा गैरवापर. बैठकीला उपस्थितीसाठी हजेरीचं पत्र पाठिंब्याचं म्हणून वापरण्यात आलं. काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.
10.45: शिवसेनेनं युतीचा घोर अपमान केला- प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री
'देवेंद्र फडणवीस यांचं मन:पूर्वक अभिनंदन. राज्यात जे पंधरा दिवस चाललं होतं ते शिवसेनेचं विश्वासघात राजकारण. शिवसेनेने भाजपबरोबर युती करून मतं मागितली. आम्ही चांगलं सरकार चालवू असा प्रचार केला. काँग्रेससोबत जाण्याचं पाप त्यांनी केलं.
ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला. त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राष्ट्रवादीबरोबर ते गेले तर चांगलं, राष्ट्रवादी आमच्याबरोबर आलं तर वाईट असं राजकारणात होत नाही. युतीचा घोर अपमान शिवसेनेने केला', असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
10.42: काँग्रेसची मुंबईत तातडीची बैठक
आज घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने बैठक बोलावली आहे. या बैठकीला मल्लिकार्जून खर्गे, के. सी. वेणूगोपाल हे ज्येष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत
10.40: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनोद तावडे यांच्या ट्वीटरवरून शुभेच्छा
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासपर्व उंचावत राहील असा विश्वास वाटतो. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन:पूर्वक शुभेच्छा. राज्याच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस. वैयक्तिक मतभिन्नतेपेक्षा राज्यातल्या जनतेचं कल्याण महत्वाचं', असं भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
10.34: मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
10.28: भाजपाला जनादेश होता त्याचा सन्मान झाला- पंकजा मुंडे, भाजपा नेत्या
'राज्याला अस्थितरेमधून बाहेर पडणं अत्यंत आवश्यक होतं. ते केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. पुन्हा मुख्यमंत्रिपदी आल्याबद्दल आनंद आणि मनापासून अभिनंदन. भाजपला जनादेश होता त्याचा सन्मान झाला', असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
10.12:बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देवेंद्र फडणवीस सरकारला देण्यात आली आहे.
10.07: संजय राऊत यांनी युतीची वाट लावली- गिरिश महाजन, भाजप नेते
संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली. अजित पवार यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. ते राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत आहे. आमचा बहुमताचा आकडा 170च्या पुढे जाईल. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली. देवेंद्र फडणवीस पाच वर्षांकरता मुख्यमंत्री असतील.
एक महिन्यांपासून संजय राऊत काय बोलत आहेत हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. मला तर वाटतं त्यांना व्हर्बल डायरिया झाला आहे. त्यांनी युतीची वाट लावली.
शिवसेनेने गद्दारी केली. निकाल येताच आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत असं शिवसेनेने म्हटलं. आम्ही एकत्र होतो. एनडीएत त्यांचा समावेश होता. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारला. युतीचा सत्यानाश केला. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना फसवलं. संजय राऊत बकवास बोलत होते. संजय राऊंतावर शिवसेनेचे आमदार नाराज आहेत अशी प्रतिक्रिया गिरिश महाजन यांनी दिली आहे.
10.05: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद.
10.00: भाजपच्या आमदारांची उद्या बैठक
भाजपच्या विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार, अपक्ष, सहकारी यांची बैठक वसंत स्मृती, दादर इथे रविवारी तीन वाजता होणार असल्याचं चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
09.58: छ. शिवाजी महाराजांनी प्रशासन कसं करायची याची प्रेरणा आणि दिशा दिली- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला प्रेरणा दिली. त्यांनी आम्हाला प्रशासन कसं करावं याची दिशा दिली, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
09.53:'पाप के सौदागर'- संजय राऊत यांचं ट्वीट
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका ओळीचं ट्वीट करून भाजप आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
09.52: संजय राऊत तुम्ही शिवसेनेची वाट लावलीत- चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष, भाजप
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, "24 ऑक्टोबरला निकाल लागेल. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला. 144 जागा लागतात. 164 मिळाले. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला. एकदाही चर्चा केली नाही. सगळे पर्याय खुले असं म्हटलं.
शिवसेनेचे नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली. जनतेने खेळ पाहिला. भाजपने शिवसेनेची साथ नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. शिवसेनेला निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांचं तोंड फुटलं. प्रेम आणखी वाढत गेली. 80 टक्के जनता त्रस्त आहे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, सावरकरांना भारतरत्न देण्याचा पर्याय सोडला, शिव नाव सोडलं. पाठीत तुम्ही खंजीर खुपसलात. आम्ही मातोश्रीची गरिमा राखली. उद्धवजींना सिल्व्हर ओकला जावं लागलं. हॉटेलवर जावं लागलं. बाळासाहेब थोरात यांना भेटाय. संजय राऊत, तुम्ही महाराष्ट्राची आणि शिवसेनेची वाट लावलीत."
09.48: राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याचे माहिती नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
09.45: मला सुरुवातीला फेक न्यूजच वाटली- अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेस प्रवक्ते
महाराष्ट्रात जे घडतंय ते अविश्वसनीय आहे. मला सुरुवातीला ही फेक न्यूज वाटली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकासआघाडीची चर्चा खूप लांबली. तीन दिवसांच्या वर ही चर्चा जायला नको होती. फास्ट मूव्हर्सने ही जागा भरून काढली., असं ट्वीट अभिषेक मनू सिंघवी यांनी केलं आहे.
09.42: सरकार स्थापन करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही- संजय राऊत
आज अजित पवार यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन करणं हा शिवसेनेला दगाफटका नाही. शिवरायांच्या विचारांना फटका. जनता माफ करणार नाही. आयुष्यभर तडफडत राहतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
09.35: अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे- संजय राऊत
अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तुरुंगात जावं लागू नये म्हणून भीतीपोटी हा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचंही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, "अजित पवार काल रात्री आमच्याबरोबर होते. पण बैठकीत आमच्या नजरेला नजर भिडवत नव्हते. हे शरद पवार साहेबांच्या लक्षात येत होतं. ते अचानक बाहेर पडले. त्यांचा फोन बंद झाला. वकिलाकडे बसले होते असं सांगण्यात आलं. शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात वातावरण निर्माण झालं. तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला. तेव्हात त्यांच्या मनात काळंबेरं आहे हे लक्षात आलं. अजित पवारांना फोडण्याचा निर्णय झाला त्याला जनता उत्तर देईल.
अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवारांची जागा ऑर्थर रोड जेलमध्ये असल्याचं म्हटलं होतं. दबाव आणून अजित पवार आणि काही आमदारांना फोडलं. महाआघाडी स्थापन करत होतो त्या स्थापनेमुळे या देशातलं वातावरण बदलणार होतं.
हा राजभवनाचा गैरप्रकार आहे. रात्रीच्या अंधारात पाप होतं. चोरून डाका घातला जातो. राज्याचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताय मग दिवसाढवळ्या का घेतली नाही. तुम्ही पाप केलंय, तुम्ही चोरी केली आहे, तुम्ही डाका घातलाय, जनतेला फसवलंय, याची किंमत चुकवावी लागेल. शिवसेना खंबीर आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद ठाकरे भेटतील. या वयात शरद पवारांसारख्या मोठ्या नेताला दगा देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. काहीतरी चांगलं घडत असताना स्वाभिमाला तडा. हे सर्व पडद्यामागून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून करण्यात आलं आहे. हे पाप ठोकरून लावण्याशिवाय राहणार नाही. "
09.27: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चेसाठी फार वेळ घेतला- अभिषेक मनू सिंघवी
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना चर्चेने खूप वेळ घेतला. ही संधी फास्ट मूव्हर्सने भरून काढली असं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं आहे.
09.26 : अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा नाही- शरद पवार
भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे.
09.25: अमृता फडणवीस यांनी केलं अभिनंदन
राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तुम्ही करून दाखवलंत! असं त्यांनी लिहिलं आहे.
09. 15: पहाटे 05.47 वाजता राष्ट्रपती राजवट मागे घेतली- पीटीआय
पहाटे 5.47 वाजता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली.
09.10: जे. पी. नड्डा यांनी केलं 'भाजप-राष्ट्रवादी' काँग्रेसच्या सरकारचं अभिनंदन
भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शुभेच्छा देताना भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असा उल्लेख केला आहे. 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्राला विकासाच्या नव्या शिखरावर नेईल याची खात्री वाटते', असं नड्डा यांनी म्हटलं आहे.
08.55: या सरकारला शरद पवार यांचा पाठिंबा?- एएनआयची सूत्रांद्वारे माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला आहे की फक्त अजित पवार यांनी आपल्या काही आमदारांच्या गटाद्वारे पाठिंबा दिला आहे हे अद्याप न समजल्यामुळे पाठिंब्याबाबत संभ्रम आहे. एएनआयने या एनसीपीमधील कोणताही निर्णय शरद पवार यांच्या सहमतीशिवाय होत नाही असं लिहिलं आहे. सरकार स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत शरद पवारही सहभागी होते असं ट्वीट एएनआयनं केलं आहे.
08.50: हे सरकार राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असेल- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या दोघांचेही मन:पूर्वक अभिनंदन. राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी हे सरकार कटिबद्ध असेल आणि राज्य विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित करेल असा विश्वास वाटतो. असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी केलेलं विश्लेषण -
महाराष्ट्राच्या राजकारणातला हा खऱ्या अर्थाने राजकीय भूकंप आहे असं म्हणायला हवं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा सुरू होती. त्यांची चर्चा अखेरच्या टप्प्यात आलेली असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांना पाठिंबा मिळाला आहे तो अजित पवारांचा.
त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्यासोबत काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाले आहेत असा त्याचा अर्थ निघू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असण्याची शक्यता आहे. अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
अजित पवार अनेक दिवसांपासून नाराज होते. त्याची बातमी बीबीसी मराठीने वेळोवेळी दिली होती. अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. रातोरात हे सगळं नाट्य घडलं. पण त्याची जुळवाजुळव अनेक दिवसांपासून सुरू असेल. भाजप शांत बसून नव्हतं हे स्पष्ट आहे.
माध्यमांचं लक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीकडे असताना भाजपच्या हालचाली पडद्याआड सुरू होत्या हे आता उघड झालं आहे. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं आहे. शरद पवारांसाठी ही सगळ्यात चिंतेची बाब आहे कारण त्यांचा पक्षच नव्हे तर कुटुंबसुद्धा आता फुटलं आहे असं म्हणावं लागेल.
08.40: ट्वीटर हँडलवर पुन्हा 'मुख्यमंत्री'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या काळात आपल्या ट्वीटर हँडलवर महाराष्ट्रसेवक अशी स्वतःची ओळख लिहिली होती. ती आता शपथविधीनंतर पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं तिथं लिहिलं आहे.
08.30: पंतप्रधानांनी केलं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन
'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी हे सरकार काम करेल असा विश्वास मला वाटतो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
08.18: राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी- मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे आभार मानतो. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता. शिवसेनेने युती नाकारून आघाडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात किती काळ राष्ट्रपती राजवट लागू राहणार? खिचडी सरकार नको. इतक्या मोठ्य़ा राज्याला स्थिर सरकारची गरज. शरद पवार यांचे आभार मानतो. आमच्याबरोबर येण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काही दिवसातच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. विश्वासदर्शक ठरावात आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू. आम्ही आमचा दावा राज्यपालांना सादर केला. राष्ट्रपती राजवट मागे घेऊन आमचं सरकार स्थापन झालं आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांवर संकट आहे. त्यांच्या मागे उभे राहू. जनादेश वेगळा होता. शिवसेनेने भाजपऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला."
08.15: महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्यासाठी घेतला निर्णय- उपमुख्यमंत्री अजित पवार
'निकालाच्या दिवसापासून कोणताही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू शकला नाही. महाराष्ट्राला वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. राज्याला स्थिर सरकार हवं या भूमिकेतून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे', असं अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बोलताना सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची पसंती उद्धव ठाकरे यांच्या नावाला होती. काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र आज सकाळी अचानक हा शपथविधी सोहळा झाला आणि सर्वांनाच धक्का बसला.
काल राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची बैठक मुंबईतील नेहरू सेंटर इथे झाली. बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "अजून चर्चा सुरू आहे. आम्ही असं ठरवलं आहे की कोणतीही गोष्ट अनुत्तरित ठेवायची नाही. अनेक मुद्यांवर एकमत झालं आहे. थोडे बारकावे शिल्लक आहेत. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)