सोनिया गांधी भेटीनंतर शरद पवार म्हणाले, 'सत्तास्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची आज भेट झाली. या भेटीनंतर सत्तास्थापनेबाबत काहीच चर्चा झाली नाही असं शरद पवार यांनी सांगतिलं.

या भेटीदरम्यान, मी सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत माहिती दिली असं शरद पवार यांनी सांगितलं. दोन्ही पक्षाचे नेते (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) पुन्हा चर्चा करतील असं शरद पवार यांनी सांगितलं.

या भेटीमध्ये आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दलच बोललो. तुम्ही शिवसेनेबरोबर आहात की नाही असा प्रश्न शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारला त्यानंतर ते म्हणाले की आम्ही कुणाविरोधात निवडणूक लढवली हे तुम्हाला माहीत आहे.

त्यानंतर शरद पवारांना असं विचारण्यात आलं की तुम्ही शिवसेनेबरोबर नाहीत असं का जाहीर करत नाहीत. त्यावर शरद पवार म्हणाले आम्ही काय जाहीर करावं आणि काय नाही हा आमचा प्रश्न आहे.

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या वक्तव्यांबदद्ल भाष्य करण्यास नकार दिला.

महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. शरद पवार देशाचे कृषीमंत्री होते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडण्याच्या अनुषंगाने त्यांची भेट घेतली. तसंच सर्वांत मोठा पक्ष भाजपा पळून गेल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असंही ते पुढे म्हणाले.

दरम्यान शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होत आहे असं भाजप नेते माधव भंडारी म्हणाले.

सोनिया गांधींचा शिवसेनेबरोबर जाण्यास विरोध आहे का?

सोनिया गांधी यांचा शिवसेनेबरोबर जाण्यास विरोध आहे म्हणून सत्तास्थापनेला उशीर होत आहे का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर शरद पवार म्हणाले की आम्ही सत्तास्थापनेबाबत काहीच बोललो नाहीत. ही बैठक फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतच होती.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 17 नोव्हेंबरला नवं सरकार स्थापन होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र इतक्या लवकर सरकार स्थापन होऊ शकत नाही असं पवारांनी याआधी सांगितलं होतं.

शिवसेनेने 170 आकडा कुठून आणला?

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणत आहेत की आमच्याकडे बहुमत आहे. याबाबत शरद पवारांना विचारलं असता पवार म्हणाले, मला शिवसेनेजवळ बहुमत आहे याबाबत काहीच माहीत नाही. याबद्दल तुम्ही शिवसेनेलाच विचारा.

शरद पवार यांच्या विधानावर भाष्य करण्यास संजय राऊत यांनी नकार दिला आहे. जर पवार साहेबांनी सोनिया गांधींशी चर्चा केली नसेल तर याबाबत मी त्यांना कसा प्रश्न विचारू असं राऊत म्हणाले. राज्यातली राष्ट्रपती राजवट दूर व्हावी याबाबत आमचं एकमत असल्याचं राऊत म्हणाले.

राजू शेट्टी यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

आज राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादी आणि बीजेडी या पक्षांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावर राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये. सर्वसामान्य जनतेला ते कदापि मान्य होणार नाही. असं ट्वीट त्यांनी केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)