लता मंगेशकर यांची प्रकृती आता स्थिर, सध्या ब्रीच कँडीमध्ये भरती

दोन दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास जाणवल्याने भरती करण्यात आलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती आता स्थिर आणि चांगली असल्याचं त्यांच्यावतीने जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.

सोमवारी त्यांना व्हायरल झाल्यामुळे श्वसनाचा त्रास झाला होता, असं सांगण्यात आलं होतं. आणि ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं.

मात्र आता दीदींची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबीयांच्य वतीने सांगण्यात आलं आहे. "आम्ही त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि उत्तम असण्याची वाट पाहत आहोत, जेणेकरून त्यांना घरी आणता येईल," असं ते म्हणाले.

28 सप्टेंबर रोजी लतादीदींनी 90वा वाढदिवस साजरा केला. आजपर्यंत हजारहून अधिक गाणी गायलेल्या लतादीदी यांना 2001 साली भारत रत्नाने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच त्यांना सिनेक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांना भरती करताना त्यांच्यावतीने जारी एका निवेदनात "त्यांचं वय पाहता त्यांना वेळेवर अँटिबायोटिक्स देता यावे यासाठी ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे," असं म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)