अमित शाह महाराष्ट्रातील राजकीय संघर्षात लक्ष का घालत नाहीयेत?

उद्धव ठाकरे आणि अमित शाह

फोटो स्रोत, AMIT SHAH @TWITTER

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मी आता महाराष्ट्रात येऊन काही फायदा नाही. भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा," असं भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

अमित शाहांसोबत माझी 2 मिनिटं चर्चा झाली. नितीन गडकरी आणि शिवसेनेचे संबंध चांगले आहेत. सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाहीये. शिवसेना मुख्यमंत्री पदाचा आग्रह करत आहे, तर भाजप मुख्यमंत्री पद द्यायला तयार नाहीये. हा तिढा सोडवण्यासाठी तुमची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं मी अमित शहा यांना म्हटल्याचं आठवले यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

कर्नाटक असो की गोवा, संख्याबळ असो अथवा नसो, भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या सत्तास्थापनेत नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण, महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल लागून 2 आठवडे उलटल्यानंतरही कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाहीये.

महाराष्ट्रासोबतच हरियाणामध्येही विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये भाजपला 40 जागांवर यश मिळालं तर काँग्रेसनं 31 जागा जिंकल्या. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला 10 तर अपक्षांना 9 जागा मिळाल्या होत्या. 90 जागांच्या हरियाणा विधानसभेत भाजप आणि काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं होतं.

बहुमतासाठी 46 आमदार हवे असताना भाजपनं दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीला सोबत घेतलं आणि सरकार स्थापन केलं. मनोहरलाल खट्टर यांनी 27 ऑक्टोबरला, दिवाळीच्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकार स्थापनेत अमित शाहांची भूमिका महत्त्वाची होती.

पण महाराष्ट्रात मात्र पंधरा दिवस झाले तरी परिस्थिती 'जैसे थे' आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजप एकत्र आले होते. स्वतः अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. युतीला 161 म्हणजेच बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवं, या मागणीवर अडून बसल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाहीये.

जे ठरलं होतं, तेच आम्हाला हवं आहे, असं शिवसेना वारंवार म्हणत आहे. कोणत्या मुद्द्यांवर युती करायची याची चर्चा उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झाली होती. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून शब्द फिरवल्याचा होणारा आरोप आणि या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची अनुपस्थिती यावरून चर्चा सुरू झाली आहे.

अमित शाह येत नाहीत, कारण...

"लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं शिवसेनेला वचन दिलं होतं, की विधानसभेत विजय मिळवल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्यात येईल. हे निवेदन लोकसभेच्या जागावाटपानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर दिलं होतं. यावेळी अमित शाह आणि उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

"पण दिवाळीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काहीच ठरलं नव्हतं, अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात अशापद्धतीची बोलणी झाली असल्यास आपल्याला माहिती नाही, असं वक्तव्य केलं. यामुळे मग उद्धव ठाकरे यांनी कठोर पवित्रा घेतला. आता अमित शाह राज्यात आल्यास माध्यमांसमोर त्यांना लोकसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेनेला दिलेलं आश्वासन मान्य करावं लागेल म्हणून ते महाराष्ट्रात येत नाहीत," असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.

पण अमित शाहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेबाबत संदेश दिला आहे, असं मत महेश सरलष्कर मांडतात.

त्यांनी म्हटलं, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन गेले आहेत. त्यांनी इथं अमित शाहांशी चर्चा केली. अमित शाहांनी त्यांना सूचित केलं होतं, की सत्तास्थापनेसाठी तुम्ही बोलणी सुरू करा, त्यासंबंधीचे दिशानिर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार 7 नोव्हेंबरला भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली आहे. सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडी राज्य नेतृत्वावर सुरू आहेत, एकदा त्या पूर्ण झाल्या की त्यानंतर अमित शाह निर्णय घेतील. त्यामुळेच सध्या तरी सत्तास्थापनेबाबत अमित शाह उघडपणे वावरताना दिसत नाहीये. पण असं असलं तरी या स्थितीमुळे राज्यातील सत्तास्थापनेला उशीर होत आहे, हे लक्षात घ्यायला हवं."

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेच्या युतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं, "आता जी काही युती झालेली आहे, त्यासंदर्भात आमचा निर्णय असा झालाय, की लोकसभेकरता शिवसेना 23 जागा लढेल आणि भाजप 25 जागा लढेल. विधानसभेसंदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे, मित्रपक्षांच्या जागा निश्चित करून आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या-अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप लढेल."

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

"गेल्या 5 वर्षांत आम्ही जी कामं केली आहेत, त्यामुळे जनता आम्हाला पुन्हा निवडून देईल, असा विश्वास आहे. पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा निर्णय देखील आम्ही केलेला आहे. त्यादृष्टीनं पद आणि जबाबदाऱ्या समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील," असं त्यांनी पुढं म्हटलं होतं.

'अमित शाहांचं लक्ष आहे'

अमित शाह राज्यात लक्ष घालत नाहीये अशातला भाग नाहीये, असं मत ज्येष्ठ पत्रकार मंगेश वैशंपायन यांनी व्यक्त केलं.

त्यांनी म्हटलं, "अमित शाह राज्यात लक्ष घालत नाहीये, असं नाही. त्यांना तर काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. त्यासाठीच त्यांना प्रत्येक राज्य हवं आहे. पण, निकालानंतर शिवसेनेनं जी भूमिका घेतली, ती भाजप नेतृत्वाला अनपेक्षित होती. शिवसेना मुख्यमंत्री पदाची मागणी करेल, हा अंदाज भाजपच्या दिल्ली तसंच महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला आला नसावा."

"पण हेही तितकंच खरं आहे, की गेली 5 वर्षं भाजप-सेना युती केंद्रात आणि राज्यात सत्तेत होती. तसंच 2019ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही या पक्षांनी एकत्र लढवली. जो पक्ष आपला सहकारी आहे, तो मुख्यमंत्री पदाबाबत किती आग्रही असू शकतो याचा अंदाज न येणं हे भाजप नेतृत्वाचं अपयश आहे," असंही वैशंपायन पुढे सांगतात.

उद्धव ठाकरे, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह

फोटो स्रोत, TWITTER@AMITSHAH

पण अमित शाह राज्यात का येत नाही, यावर त्यांनी म्हटलं, "मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं ताठर भूमिका घेतली आहे. ते पाहता अमित शाहांनी राज्यात येणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण करणं, असं आहे. आधी 30 ऑक्टोबरला ते राज्यात येणार होते, नंतर 3 नोव्हेंबरला येणार असं ठरलं. पण या दोन्ही वेळा शिवसेनेनं केलेल्या वक्तव्यामुळे अमित शाहांनी राज्यात येऊ नये, असं वातावरण तयार झालं."

...याचा केंद्रीय नेतृत्वाशी संबंध नाही

"सरकार चालवण्याचं, निवडणुकांत जागावाटप, प्रचार असं सगळं स्वातंत्र्य दिल्ली नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांना दिलं होतं. सत्तास्थापनेचा तिढा स्थानिक पातळीवर निर्माण झाला आहे, त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अमित शहा या केंद्रीय नेतृत्वाशी काही संबंध नाहीये. त्यामुळे स्थानिक पातळीवर हा तिढा सोडवायला पाहिजे. मान-अपमान बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी या गोष्टी केल्या पाहिजेत," असं ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

"स्थानिक नेतृत्व आपसातले मतभेद मिटवण्यात अपयशी ठरत असेल, तर हा दोन्ही पक्षांसाठी चिंतेचा विषय आहे. तुम्ही आपल्या पातळीवर हे वाद सोडवा, अशी मुभा अमित शाहांनी दिली होती आणि ते वाद सोडवण्यात अहंकार अथवा इतर कोणत्या गोष्टी आडव्या येत असतील तर तो चिंतेचा विषय आहे," असंही ते पुढे सांगतात.

भाजपचे प्रवक्ते काय म्हणतात?

सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाह राज्यात येतील की नाही याविषयी बीबीसी मराठीनं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी म्हटलं, "सत्ता स्थापनेच्या तिढ्यावर आम्ही बाईट, चर्चा, कमेंट काहीच करत नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)