शिवसेना भाजप सत्तासंघर्ष : संजय राऊत म्हणतात, भाजपनं सरकार बनवण्यास असमर्थ असल्याचं सांगावं, आम्ही भूमिका जाहीर करू

ओ

फोटो स्रोत, ANI

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

"राज्याला स्थिर सरकारची गरज आहे, शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभं आहे, काळजीवाहू सरकारनं त्या त्या खात्याला आणि शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत," असं काँग्रेस नेते पथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस नेत्यांनी त्यांचं मत हायकमांडकडे मांडल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

...तर भूमिका जाहीर करू - राऊत

"शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला आहे," असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मी निर्णय घेत आहे तो चुकीचा आहे का, असा सवाल या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांची पत्रकार परिषद मी ऐकली, ते सरकार स्थापन करण्याचा दावा का करत नाहीत, राज्यपालांना भेटून ते रिकाम्या हाताने का परत आले, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

दाम, दाम, दंड, भेद हे सत्तेचा माज असेलेल वापरतात, सत्ता गेल्यानंतर ते सगळं गळून पडतं. धमक्या आणि ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही. हे लोक महाराष्ट्रावर राष्ट्रपती शासन थोपवत आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.

"सरकार बनवण्यास असमर्थ आहोत असं भाजपनं सांगावं मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू, लवकरच महाराष्ट्रात एक स्थिर सरकार येईल" असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

"शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा बनेल हे सभागृहात कळेल, आमच्याकडे पर्याय आहे. भाजपनं सांगावं राज्यपालांना की आम्ही सरकार बनवू शकत नाही," असंही राऊत यांनी म्हटलंय.

दरम्यान महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापने मी तिकडं जाऊन सध्या काही फायदा नाही असं अमित शहा म्हणाल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

"महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी उशीर होत आहे, त्या संदर्भात काय काय सुरू आहे. या संदर्भाल्या कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर आता पुढे काय करायचं हे भाजप ठरवणार आहे," असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर सांगितलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

शिवसेना मागण्यांवर ठाम

"परिस्थिती जैसे थे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे बोलणी काहीही झाली नाहीत. ९ नोव्हेंबर पर्यंत काय करावं हा भाजपाचा प्रश्न आहे. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा. पुढचा निर्णय होईपर्यंत शिवसेनेचे सगळे आमदार मुंबईत राहतील," असं संजय राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

"उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल तसंच लोकसभेच्या वेळेला जे ठरलं होतं ते भाजपनं द्याव," असं मातोश्रीवर झालेल्या आमदारांचा बैठकीनंतर शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.

राजभावन

फोटो स्रोत, RajBhavan

या बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये जाणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. तसंच भाजपनं अडिच वर्षांचं मुख्यमंत्रिपद दिलं नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी होईल, असंही सत्तार म्हणाले आहेत.

या बैठकीबाबत शिवसेनेकडून प्रचंड सतर्कता बाळगण्यात आली होती. आमदारांना आतमध्ये मोबाईल फोनही घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

राज्याच्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपच्या गोटात लगबग पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊ शकतात. तसंच नागपूरमध्ये नितीन गडकरी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला गेले आहेत. या बैठकांमध्ये काय खलबतं होतील, यावर बरंचसं पुढचं राजकारण अवलंबून असेल.

नागपूरमध्ये पोहोचल्यावर पत्रकारांशी बोलताना नितीन गडकरी यांनी लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल असं सांगितलं आहे. तसंच मी राज्यात परतणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

स्थिर सरकारसाठी भाजप प्रयत्नशील- मुनगंटीवार

"राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनं भाजप पावलं उचलत आहे. सत्ता स्थापनेचा दावा करायचा की नाही यासंबंधीचा निर्णय आम्ही राज्यपालांशी चर्चा करून घेऊ," अशी भूमिका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

"सेनेशी काही पातळीवर चर्चा सुरू आहे. पण आमची इच्छा ही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचीच आहे," असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस-सुधीर मुनगंटीवार

फोटो स्रोत, Getty Images

देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत असं उध्दव ठाकरे म्हणतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या रूपात शिवसेनेचाच मुख्यमंत्री येईल, असंही मुनगंटीवारांनी म्हटलं. आज आम्ही राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी नाही तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी चाललो असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मातोश्रीवर सेनेच्या आमदारांची बैठक सुरू असून आपले आमदार फुटू नयेत, अशी काळजी सेनेकडून घेतली जात आहे. त्याबद्दल बोलताना मुनगंटीवारांनी म्हटलं, "सेनेचे आमदार इतके मजबूत आहेत, की त्यांना कोणी फोडणार नाही. आमची भूमिका ही विरोधी पक्षात बसण्याची आहे, हे काँग्रेस काय राष्ट्रवादीनंही अनेकदा स्पष्ट केलं आहे."

शिवसेना ठामच

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळीसुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

"भाजपला सरकार स्थापनेचा दावा करायचा असेल तर त्यांनी तो खुशाल करावा. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांनी ते दाखवावं," असं राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटलं.

संजय राऊत

फोटो स्रोत, Twitter

"येत्या काळात शिवसेनेची भूमिका काय असेल, शिवसेना काय करणार आहे, हे गुरुवारी उद्धव ठाकरे आमदारांना सांगणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधण्याची हिंमत कुणामध्येच नाही," असंही राऊत यांनी म्हटलं.

निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाबाबत ठरलेलं समीकरण वापरावं, असं सांगून आक्रमक भूमिका घेतली होती. पण दुसरीकडे महायुतीचंच सरकार स्थापन होईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री बनेल, असं भाजप सातत्याने सांगत आहे.

आजच्या 'सामना' वृत्तपत्रातील अग्रलेखातूनही भाजपवर टीका करण्यात आली.

भाजपसमोर काय पर्याय?

"आता या सगळ्या परिस्थितीत भाजपसमोर पर्याय काय आहे? शिवसेनेनं आपला हट्ट कायम ठेवला तर राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. सहा महिने थंड राहून शिवसेनेत असंतोष कसा वाढेल, हे पाहणं आणि पुन्हा निवडणुकांना सामोरं जाणं, हा भाजपसमोरचा एक पर्याय आहे. पण राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या तर भाजप-शिवसेना सत्तेत येण्याची शक्यता फार कमी आहे," असं लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं.

पवार फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

शिवसेनेला गृह, अर्थ यांसारखी महत्त्वाची खाती देऊन भाजप हा पेच सोडविणार का, या प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत दीक्षित यांनी म्हटलं, "मुळात शिवसेना महत्त्वाच्या खात्यांसाठी हे दबावतंत्र वापरत आहे, असं वाटत नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवं आहे आणि तेही पहिली अडीच वर्षे. कारण भाजपला पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद दिल्यास शिवसेनेला पक्ष फुटण्याची भीती आहे. शिवाय भाजप मुख्यमंत्रिपद सोडेल का, ही धास्तीही आहे. शिवसेनेच्या बाबतीतही भाजपच्या मनात असाच अविश्वास आहे आणि त्यामुळेच ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे."

पक्षाध्यक्ष पाटील आणि शेलार भेटीस जात असल्याने भाजप राज्यपालांशी नेमकी काय चर्चा करणार आहे, याबाबत उत्सुकता आहे. सुरूवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण नंतर पाटील आणि शेलार यांचं नाव समोर आलं. राज्यपालांना भेटायला फडणवीस जात नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा अद्याप भाजपकडून होणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)