You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर : 'माणसं आहात, माणसं म्हणून जगा, नकाशेबाजी नको'
- Author, वुसअतुल्लाह खान
- Role, ज्येष्ठ पत्रकार, पाकिस्तानहून बीबीसी हिंदीकरता
भारताने सादर केलेल्या नव्या नकाशात अलीकडेच लडाख या नव्या केंद्रशासित प्रदेशात पाकिस्तान प्रशासित गिलगिट आणि बल्टिस्तानचा समावेश करण्यात आला आहे. तर, याच नकाशात जम्मू-काश्मीर या नव्या केंद्रशासित प्रदेशात मुजफ्फरबाद आणि मीरपूरचाही समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे अर्थातच हा नकाशा फेटाळण्यात आला आहे, कारण पाकिस्तानी नकाशात पहिल्यापासून पूर्ण लडाख आणि जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा हिस्सा असल्याचं दर्शवण्यात येतात.
हे वादग्रस्त भाग असल्याचंही पाकिस्तानी नकाशावर बारीक अक्षरांत लिहिलेलं असतं.
परंतु भारताच्या जुन्या नकाशातही गिलगिट-बल्टिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीर आदी प्रदेश भारताचेच प्रदेश नोंदवण्यात येत आहेत आणि यावर वादग्रस्त क्षेत्र असा उल्लेखही केला जात नाही.
इतकंच नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरही जम्मू-काश्मीर ज्या देशाच्या नियंत्रणात जे भाग आहेत ते त्याच देशाच्या नकाशात दाखवले जातात. केवळ चीन त्यांच्या नकाशात लडाखचा काही भाग आणि अक्साई चीनचा काही भाग आपला असल्याचा दावा करतं.
असं म्हणतात, नशीब कसंही असो, हातावरच्या रेषा, सीमारेषा आणि नदीचा मार्ग कायम बदलत असतात. त्यांचा बदलता मार्ग कुणीही रोखू शकत नाही.
कधीकाळी ब्रिटनच्या नकाशात अर्ध्या जगाचा समावेश होता. परंतु आज युरोपच्या नकाशातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनलाच प्रयत्न करावे लागत आहेत.
कधी अल्जेरिया फ्रान्सच्या नकाशात दिसायचा, कधी तिमोर इंडोनेशियात असायचा, कधी बांगलादेश, ब्रह्मदेश आणि पाकिस्तान भारताच्या नकाशात समाविष्ट होते. आता तर एकाऐवजी चार चार नकाशे दिसू लागले आहेत.
म्हणूनच मला मातृभूमी आणि पितृभूमीचा इतिहास-भूगोल कळलेलाच नाही. आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी शहीद होण्याचा नेमका अर्थ काय आहे, हेही मला कळलेलं नाही.
आम्ही आमच्या सीमेमधल्या लोकांच्या रक्षणासाठी शहीद होऊ असं कुणीच म्हणत नाही.
बाय द वे रक्षण करणं म्हणजे दुश्मन नष्ट करणं आणि त्यासाठी जीव देणं एवढंच उरलं आहे.
डोक्यात राग घालणं, हृदयाचा थरकाप होईल अशा घोषणा देणं यापेक्षा आपण एकमेकांच्या सीमामर्याद, चार भिंती आणि सन्मान यांचा विचार करणं यातच हित आहे.
मित्रांनो तुम्ही जन्मालासुद्धा आला नव्हतात तेव्हाही ही भूमी होती. तुम्ही नसाल तेव्हाही ही भूमी असणारच आहे. हां, तेव्हा या भूमीवर कुणीतरी वेगळं राहत असेल.
सम्राट अशोकाच्या राज्यात अफगाणिस्तानाचाही समावेश होता. आता अफगाणिस्तान एक वेगळा देश आहे.
काय मातृभूमी नि काय पितृभूमी, काय तुझं नि काय माझं... एक इंच पण इकडचं तिकडे झालं तर तुमचा खात्मा करू...
याच भूमीवर आपल्याला शेवटचा श्वास घ्यायचा आहे. कुणीतरी आधी जाणार आहे- कुणीतरी नंतर.
मग कशाला ते नकाशे बनवायचे.
आपण माणसं आहोत, तर माणूस म्हणून जगू या आणि सन्मानानं जाऊ या. नकाशेबाजी नकोच. कृपया नको.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)