पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर खरंच रडल्या का? - फॅक्ट चेक

सोशल मीडिया व्हायरल फोटो

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, सोशल मीडिया व्हायरल फोटो

या फोटोमध्ये पंकजा मुंडे रडत आहेत, असंच तुम्हाला वाटत आहे का? हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये परळी इथं झालेल्या पराभवामुळे पंकजा मुंडे ढसाढसा रडत असल्याचं सांगत हा फोटो पोस्ट करण्यात येत आहे.

त्यांचा हा व्हायरल फोटो खरंच पराभवानंतरचा आहे का? आणि त्या खरंच रडल्या का?

पंकजा मुंडे यांचा हा फोटो चुकीच्या कॅप्शनसह शेअर करण्यात येत असल्याचं बीबीसीच्या फॅक्ट चेकमध्ये उघड झालं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाले. त्यामध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा परळीमधून झालेला पराभव सर्वांत महत्त्वाचा मानला जात आहे.

परळीतून भाजपच्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी पराभूत केलं. या निवडणुकीत पंकजा यांना 91 हजार 413 तर धनंजय यांना 1 लाख 21 हजार 555 मतं मिळाली. एकूम 30 हजार 142 मताधिक्याने धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला आहे.

परळीमधला प्रचार अतिशय चुरशीचा राहिला होता. संपूर्ण प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी झाली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात एका व्हीडिओ क्लिपमुळे परळीमधलं वातावरण ढवळून निघालं होतं.

सोशल मीडिया व्हायरल फोटो

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, सोशल मीडिया व्हायरल फोटो

या व्हीडिओ क्लिपमधल्या भाषणात धनंजय मुंडेंनी अपमान केल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना व्यासपीठावरच चक्कर येऊन त्या पडल्याही होत्या. हे सगळं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी 19 ऑक्टोबरला घडलं.

ही फोटो कधीचा आहे?

त्यानंतर सगळ्या राज्याचं लक्ष परळीकडे लागलेलं होतं. त्यानंतर टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने मतदानापूर्वी पंकजा मुंडे यांच्याशी बातचित केली. 21 ऑक्टोबर रोजी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर ही मुलाखत अपलोड करण्यात आलेली आहे.

या मुलाखतीत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी जेव्हा ती क्लिप पाहिली, दोन-तीन वेळा ते सगळं माझ्यासमोरून गेलं. तो राग, तो तिरस्कार, ते हावभाव या सगळ्या गोष्टींनी मला खूप हर्ट केलं. यामुळे माझा आत्मविश्वास गेला होता. तुमचं यातून खच्चीकरण व्हावं म्हणून हे केलं जात असल्याचं काही महिलांनी सांगितलं. तेव्हा मला कळलं की आता आपण बाहेर पडलं पाहिजे."

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे हे बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावाचा स्क्रिनशॉट काढून हा फोटो रडताना असल्यासारखं भासवण्यात आलं. जर पूर्ण मुलाखत पाहिली तर त्यावेळी पंकजा मुंडे रडल्या नव्हत्या, हे लक्षात येईल. पण निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर हाच दुःखी हावभावांचा फोटो विविध सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात येत आहे. पराभव सहन न झाल्यामुळे पंकजा मुंडे ढसाढसा रडल्याचं सांगण्यात आलं. जे की पूर्णपणे चुकीचं आहे.

ज्यांनी ही मुलाखत घेतली ते पत्रकार काय सांगतात?

ही बातमी कव्हर करणारे टीव्ही पत्रकार महेंद्रकुमार मुधोळकर सांगतात, "पंकजा मुंडेंची मुलाखत मी 21 तारखेला मतदानाच्या दिवशी घेतली होती. 19 तारखेला त्या भोवळ येऊन पडल्या होत्या. 20 तारखेला त्या घराबाहेर पडल्या नाहीत. त्यांना अस्वस्थ वाटत होतं, असं त्यांनी नंतर सांगितलं. पण मतदानाच्या दिवशी 21 तारखेला त्या प्रसन्न वातावरणात बाहेर पडल्या. झालं गेलं सगळं विसरुन जोमाने काम करणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं.

पण मतदानाच्या दिवशीच्या मुलाखतीतील काही स्क्रीन शॉट काढून ते सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. मलाही त्यामुळे ट्रोल करण्यात आलं. मतदानाच्या दिवशीच्या मुलाखतीचे फोटो निकाल लागल्यानंतर चुकीच्या कॅप्शनसह पसरवण्यात येत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा फोटो शेअर करणं थांबवावं."

स्थानिक पत्रकार शशि केवडकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "निकालानंतर पंकजा मुंडे एकदाच माध्यमांसमोर आल्या होत्या. त्यांनी निकालानंतर एकच मुलाखत दिलेली आहे. यामध्ये त्यांनी हा पराभव आपण स्वीकारल्याचं सांगितलं तसंच कार्यकर्त्यांना धीर दिला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून त्या माध्यमांसमोर आलेल्या नाहीत. सध्या पसरवण्यात येणारा फोटो हा त्या मुलाखतीचा नसून मतदानाच्या दिवशी घेतलेल्या मुलाखतीचा आहे. हा फोटो चुकीच्या माहितीसह पसरवला जात आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)