विधानसभा निवडणूक: भोसले, पाटील, घाटगे, आत्राम राजघराण्यांचं काय होणार?

फोटो स्रोत, Getty Images
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्यात. सोमवारी मतदान होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागेल. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महाराष्ट्रातल्या राजघराण्यांची निवडणुकीतली ताकद किती, हेही कळणार आहे.
भोसले, घाटगे, पाटील आणि अत्राम या राजघराण्यांचे वंशज विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणची निवडणूक रंगतदार बनली आहे.
राजघराण्याचा वारसा असलेल्यांपैकी उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून पोटनिवडणुकीच्या निमित्तानं लोकसभेच्या रिंगणात आहोत. तर इतर राजघराण्यातील व्यक्ती वेगवेगळ्या पक्षांकडून विधानसभेच्या रिंगणात आहेत. या व्यक्तींच्या मतदारसंघात काय स्थिती आहे आणि त्यांचा राजकीय प्रवास काय राहिलाय, याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतला आहे.
उदयनराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज म्हणून महाराष्ट्रासह देशाला उदयनराजे परिचित आहेत. सोबत राज्याच्या राजकारणात आपल्या हटके स्टाईलनं त्यांनी वेगळी ओळखही निर्माण केलीय.
यंदा लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढून जिंकल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यात त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला. खासदारकीचा राजीनामा देत, दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागलेली आहे.
भाजपकडून उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून लोकसभेचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीनं त्यांच्याविरोधात शरद पवारांचे जुने मित्र श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे.
श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. "त्यांच्याबद्दल आपल्याला आदरच आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून लोक तुम्हाला काय काम केलं हा प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर देणार? या प्रश्नाला मलाही सामोरं जावं लागेल. पण माझ्याकडे कामांची यादीच आहे."
तर दुसरीकडे वाई येथील सभेमध्ये बोलताना श्रीनिवास पाटील यांनी 'ज्या राजांनी प्रजा सोडली आहे, अशांबरोबर लढायला काय हरकत आहे,' असं म्हणत उदयनराजेंना आव्हान दिलं.
"श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजे भोसले यांच्यासमोर निश्चितच मोठं आव्हान उभं राहिलं आहे," असं मत दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी व्यक्त केलं.
शिवेंद्रराजे भोसले
शिवेंद्रराजे भोसले यांनाही राजघरणाचा वारसा आहे. उदयनराजे यांचे काका अभयसिंहराजे भोसले यांचे ते पुत्र. अभयसिंहराजे आणि त्यांचे पुतणे उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे आधी दोघेही राष्ट्रवादीत आणि आता दोघेही भाजपमध्ये आहेत.
अभयसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या काका-पुतण्याच्या वादाची परंपरा पुढेही सुरूच राहिली. अभयसिंहराजे भोसले यांचे पुत्र शिवेंद्रराजे भोसले विरूद्ध उदयनराजे भोसले असा वाद पुढे साताऱ्यात गाजू लागला.

2006 साली सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राजघराण्यातील ज्येष्ठ असलेल्या शिवाजीराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सगळं घराणं एक करायचं ठरवलं. त्यांनी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन घडवून आणलं. मग या दोघांनी मिळून नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली. पुढची 10 वर्षं हे मनोमिलन कायम राहिलं. पण 2016च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते मनोमिलन तुटलं. मात्र, आता शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोघेही भाजपमध्ये आहेत.
शिवेंद्रराजे हे त्यांच्या परंपरागत सातारा मतदारसंघातून पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत. शिवेंद्रराजेंनी आतापर्यंत सलग तीनवेळा या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं आहे.
राजे अंबरीशराव सत्यवान अत्राम
महाराष्ट्राच्या सीमेवरील अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिंरोंचा आणि मूलचेरा अशा पाच तालुक्यांचा मिळून अहेरी विधानसभा मतदारसंघ बनला आहे. हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याचं कारण म्हणजे इथून गोंड राजघराण्याचे सहावे वंशज राजे अंबरीशराव सत्यवान अत्राम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा अत्राम यांचं कायमच वर्चस्व राहिलंय. मात्र, 2014 साली भाजपनं राजे अंबरीशराव सत्यवान अत्राम यांना उमेदवारी दिली आणि ते जिंकूनही आले.

फोटो स्रोत, Facebook/Raje Ambreish Rao
राजे अंबरीशराव अत्राम हे राजे सत्यवानराव अत्राम यांचे पुत्र आहेत. सत्यवानराव आत्राम यांनी नागविदर्भ आंदोलन समितीची स्थापना केली होती. त्यांनी या समितीतून नव्वदच्या दशकात दोनवेळा विधानसभा लढवून जिंकलेही होते. पुढे दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं आणि त्यांचा राजकीय वारसा राजे अंबरीशराव अत्राम यांच्याकडे आला.
2014 साली पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजे अंबरीशराव अत्राम यांना मोदीलाटेचाही फायदा मिळाला होता. त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं. आदिवासी विकास आणि वन मंत्रालयाचा कारभार देण्यात आला. ते गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
मात्र, आता त्यांची पुन्हा एकदा कधीकाळी या मतदारसंघात वर्चस्व गाजवलेल्या धर्मरावबाब अत्राम यांच्याशी टक्कर होणार आहे. त्यामुळे राजे अंबरीशराव अत्राम यांना मोठं आव्हान असेल. शिवाय, दीपक अत्रामही रिंगणात आहेत.
कोल्हापुरातलं घाटगे राजघराणं
राजर्षी शाहू महाराज हे मूळचे कोल्हापुरातल्या कागलच्या घाटगे घराण्यातील. याच घाटगे घराण्यातील समरजीतसिंह घाटगे यंदा कागल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
समरजीतससिंह घाटगे हे कागलचे माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचे पुत्र आहेत. तसंच शाहू महाराजांचे वंशज म्हणूनही त्यांची ओळख आहे.
समरजीतसिंह घाटगे यांना 2016 मध्ये पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देऊन भाजपनं जवळ केलं होतं. कागलमधून ते लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. त्याची उमेदवारीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. मात्र, युतीच्या जागावाटपात कागलची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली.

फोटो स्रोत, Facebook/Samarjeet Ghatge
शिवसेनेनं संजय घाटगे यांना उमेदवारी दिल्यानं समरजित घाटगे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
दुसरीकडे, कागलचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफही पुन्हा एकदा रिंगणात आहेत.
एकीकडे हसन मुश्रीफ यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराचं आव्हान, तर दुसरीकडे शिवसेनेच्या उमेदवारामुळे होऊ शकणारं मतविभाजन, अशा आव्हानांसह समरजीतसिंह घाटगे कागलमधून आपलं नशीब आजमावणार आहेत.
राणा जगजितसिंह पाटील
पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आणि उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. पाटील कुटुंबही राजघराणं म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी गेल्या 40 वर्षांपासून उस्मानाबादचं राजकारण त्यांच्याभोवकी केंद्रीत होतं. 2009 मध्ये ते लोकसभेवरही निवडून गेले होते. पण 2014 आणि 2019 ला त्यांचा पराभव झाला.

फोटो स्रोत, Facebook
त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. नात्याने भाऊ असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचा त्यांनी पराभव केला होता. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण महायुतीमध्ये उस्मानाबादच्या जागेवरचा हक्क शिवसेनेने न सोडल्यामुळे त्यांना बाजूच्या तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागत आहे.
तुळजापूर मतदारसंघात राणा जगजितसिंह यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचं आव्हान आहे. मधुकरराव चव्हाण सातत्याने तुळजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे तुळजापूरची यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं जाणकार सांगतात.
राजघराण्यांना जनता स्वीकारेल का?
महाराष्ट्रातली ही राजघराणी सध्या भाजपमधून किंवा भाजपशी निकटवर्तीय असणारी आहेत. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होईल का किंवा ते भाजपसोबत असल्यानं आव्हानं कमी होतील का, हा प्रश्न उभा राहतो.
यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात, "ऐंशीच्या दशकानंतर महाराष्ट्रातली राजघराणी निवडणुकीच्या प्रक्रियेत येऊ लागली. लोकशाही नेहमीच सर्वसामान्यांच्या हितसंबंधांची असते. या सर्वसामान्य लोकांचे हितसंबंध राजे-रजवाड्यांकडून जपले जात नाहीत, तेव्हा त्यांच्याविरोधात पहिलं बंड जनतेनं केलेलं आहे. त्यामुळे राजघराणं किंवा घराणेशाहीविरोधात लोकांच्या मनात साचलंय, तो स्फोट 2014 साली पहिल्यांदा दिसला."
"भाजपनं आता चूक केलीय की, ही सर्वं राजघराणी किंवा घराणेशाही पक्षात ओढून आणलीय. त्यामुळे भाजपची सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याची क्षमताही कमी झालीय," असं पवार सांगतात.
प्रकाश पवार म्हणतात, "2004 नंतर राष्ट्रवादीनं प्रचंड काम केलं. मात्र जनेतनं त्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, कारण ते राजे-रजवाडे आणि सरंजामदारांची बाजू घेत होते. ही प्रक्रिया कायम घडत असते. आजही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात ही खदखद आहेच. त्याचा परिणाम होईलच."
तसंच, "राजे, सरदार, सरंजामदार, घराणेशाही यांच्याविरोधात लोकांच्या लढाईचं हे युग आहे. हे राजे जनतेशी उठबस करू शकत नाहीत, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे लोक ज्योतिरादित्य सिंधियांनाही स्वीकारत नाहीत आणि राहुल गांधींनाही," असंही प्रकाश पवार म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








