PMC बँक : 'माझे 1 कोटी रुपये PMC बँकेत अडकले, आता मग मी काय करू?'

"माझे 1 कोटी रुपये PMC बँकेत अडकले आहेत. मागच्या 26 वर्षांपासून माझं PMCमध्ये खातं आहे. या वयात स्वत:च्याच कमाईचे पैसे मागायला रस्त्यावर उतरावं लागतंय. आमच्या म्हातारपणासाठी ठेवलेले पैसे हे लोक हडप करतायेत," PMC बँकेच्या ठेवीदार अनिता लोहिया सांगत होत्या.
अनिता यांच्यासहित ज्या 15 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना PMC बँकेवरच्या निर्बंधाांमुळे फटका बसला आहे, त्या सगळ्यांचं लक्ष आता 17 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाकडे असेल.
बँकांमधल्या ठेवींना फक्त 1 लाख रुपयांच्या इन्शुरन्सचं संरक्षणकवच असतं. पण PMCच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर 100 टक्के संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली असून त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
याव्यतिरिक्त पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह म्हणजेच PMC बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग, हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड म्हणजेच HDILचे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना मुंबईतल्या एसप्लॅनेड कोर्टानं 23 तारखेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यावर भडकलेल्या PMCच्या ठेवीदारांनी या सुनावणीच्या वेळी आज सकाळी कोर्टाबाहेर निदर्शनं केली. आपल्या हक्काचे पैसे आपल्याला लवकरात लवकर मिळावेत अशी या सगळ्यांची मागणी आहे. पैसे मिळाले नाहीत तर मतदान करणार नसल्याचं या मतदारांनी म्हटलंय. या बँकेच्या ठेवीदार असणाऱ्या अनिता लोहियाही या निदर्शनांत सामील होत्या.
त्यांनी सांगितलं, "मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझे 1 कोटी रुपये PMC बँकेत अडकले आहेत. मागच्या 26 वर्षांपासून माझं PMCमध्ये खातं आहे. या वयात स्वत:च्याच कमाईचे पैसे मागायला रस्त्यावर उतरायला लागतय. आमच्या म्हातारपणासाठी ठेवलेले पैसे ही लोकं हडपं करतायेत. हा बँकेत झालेला घोटाळा आहे. त्यामुळे याला आरबीआय जबाबदार आहे. आम्हाला 1 लाख रुपये देणार सांगितलं. आम्ही काय भिकारी आहे? आमचेच पैसे देताना 10 हजार देतो. 1 लाख देतो सांगतात. या सरकारमधली लोकं प्रचारात गुंग आहेत. आम्हाला पैसे मिळाले नाहीत तर आम्ही मतदान करणार नाही. 'नो नोट, नो वोट'"
PMCच्या अनेक ठेवीदारांनी आपली अनेक वर्षांची कमाई या बँकेत ठेवलेली होती. स्वतःचेच पैसे गरजेला वापरता येत नसल्याने ठेवीदार नाराज असल्याचं चित्र आहे.
बँकेचे ठेवीदार अमरजीत म्हणाले, "माझ्या इतक्या वर्षाच्या कमाईत माझे थोडे पैसे बँकेत ठेवले होते. माझ्या हाताचं ऑपरेशन झालं. त्याला दीड लाख खर्च आला. स्वत:च्या बँकेत पैसे अजून मला ऑपरेशनसाठी कर्ज घ्यावं लागलं… आमचे पैसे कधी देणार... एवढ्या वर्षाची कमाई कशी मिळणार या चिंतेने झोप येत नाही."

जित्सू सेन यांचं या बँकेत गेल्या 20 वर्षांपासून खातं आहे. त्यांचे 20 लाख या बँकेत अडकलेत. ठेवींची रक्कम लहान असो वा मोठी, सर्वांना स्वतःचे पैसे परत मिळायला हवेत, असं त्या म्हणतात.
"माझे 20 लाख रुपये या बँकेत अडकले आहेत. पण माझे किती पैसे आहेत यापेक्षा खातेदारांचे 10 रुपये जरी असले तरी मिळाले पाहीजेत. आज 3 ते 4 लोकांचा मृत्यू झालाय, अजून किती लोकांचे जीव घेणार? ही सर्व RBIची चूक आहे. बँकेच्या कामावर कसली आचारसंहिता? हे लोक भाषणात सांगतात निवडणुकीच्या नंतर पैसे देणार, तोपर्यंत किती लोक जीव देतील याचा विचार पंतप्रधानांनी केला पाहिजे. ज्या लोकांचा मृत्यू झालाय तो RBIनी केलेला खून आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहीजे."
दरम्यान, PMC बँकेचा हा मुद्दा केंद्रात मांडू आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी केंद्राकडे मदत मागणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी म्हटलं होतं. तर PMC बँकेच्या 80 टक्के ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं होतं.
PMC बँकेच्या ठेवीदारांच्या एका गटाने आज मुंबईचे पोलिस कमिशनर संजय बर्वे यांची भेट घेऊन आपलं ग्राऱ्हाणं त्यांच्याकडे मांडलं.

फोटो स्रोत, ANI
तर HDIL कंपनी, त्याचे संचालक, प्रमोर्टस, PMCचे अधिकारी आणि PMC घोटाळ्याशी निगडित व्यक्तींची 3830 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मालमत्ता गोठवल्याचं वा ताब्यात घेतल्याचं ईडीनं जाहीर केलंय.

फोटो स्रोत, Twitter
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








