PMC बँक : 'माझा सगळा पैसा अडकला, आता लेकीचं लग्न कसं करू?'

- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठीसाठी
"15 तारखेला मला गावाला जायचंय... माझ्या मुलीचं लग्न आहे. काम करून मी तिच्या लग्नासाठी पैसे जमवले... आता मी काय करू? माझा सगळा पैसा इथे आहे. बँकवाले म्हणतात फक्त एक हजार मिळतील. काय करू त्या एक हजारांचं?" चिंताग्रस्त आवाजात अन्वरबी शेख सांगत होत्या.
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांबाहेर अशाच चिंतातूर, हवालदिल खातेदारांची आणि ठेवीधारकांची गर्दी आहे.
अनेकांची आयुष्यभराची कमाई इथे होती. अनेकांचा पगार इथल्या खात्यात जमा होत होता आणि त्यातून सगळा खर्च भागायचा.
कामावरून सुट्टी काढून आलेल्या प्रभाकर ठळकर यांची या बँकेत फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत. त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं खातंही याच बँकेत आहे.
इतर कोणत्याही बँकेत त्यांचं अकाऊंट नाहीये. पण आता बँकेवर निर्बंध आल्याने सगळंच अडचणीत आलंय. त्यांना पैशांची गरज असली तरी बँकेत असलेले त्यांचे स्वतःचेच पैसे त्यांना मिळत नाहीयेत.
19 वर्षे ज्या बँकेकडे आपण विश्वासाने पैसे ठेवले, ती बँक आता त्यांना त्यांच्याच खात्यातले 1000 रुपयेही चेकशिवाय द्यायला तयार नाही.

इथे आलेल्या 79 वर्षांच्या आजींना तर आपले अश्रू आवरत नव्हते. त्यांचं एक मूल ऑटिस्टिक आहे. त्याच्यासाठी केलेली सगळी आर्थिक तरतूद त्यांनी पीएमसीमध्ये ठेवली होती. आणि दुर्दैवी योगायोग म्हणजे निर्बंध येण्याच्या एकच दिवस आधी त्यांनी आपल्या मुदत ठेवींचं नूतनीकरण केलं.
आपल्याला वर्षानुवर्षं ओळखणाऱ्या या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला पूर्वकल्पना का दिली नाही, असा प्रश्न आता त्यांना पडलाय.
सरोज झांगियानी यांचीही अशीच परिस्थिती आहे. त्यांचे पती गेली 5 वर्षं अल्झायमर्समुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची औषधं, वॉर्डबॉय या सगळ्याचा खर्च त्या पीएमसी बँकेतल्या गुंतवणुकीवरून मिळणाऱ्या व्याजावर भागवत होत्या. आता पुढे काय? असा प्रश्न त्यांना पडलाय.
पीएमसीच्या याच शाखेत आलेल्या आणखी एका ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "मी माझ्या पीपीएफमधले पैसे काढले होते घरातल्या एका ऑपरेशनसाठी. ऑपरेशन पुढे गेलं म्हणून पैसे या बँकेच्या मुदत ठेवीत घातले. खरंतर ती मुदत संपली, पण तेव्हा मी बाहेरगावी होतो. काल ही बातमी समजताच मी मुंबईत परतलो. पण आता पैसे मिळत नाहीत. तेव्हाच काढून घ्यायला हवे होते."
निवृत्त झालेल्या अश्रफ अलींनी त्यांच्या बाहेरगावी राहणाऱ्या मुलांनी पाठवलेले पैसे पीएमसी बँकेत ठेवले होते. मुलांनी कष्ट करून पाठवलेले पैसे असे अडकल्याने ते व्यथित आहेत.
पण पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे असेही काही ग्राहक भेटले, ज्यांचा अजूनही बँकेवर विश्वास आहे.
"आम्हाला आमचं मासिक व्याज किंवा पैसे आता मिळणार नसले तरी लवकरच सगळं नीट होईल असं मला वाटतं. ही बँक तशी सुस्थितीत आहे, जुनी आहे. म्हणून मला तशी भीती वाटत नाही," सत्तरीतल्या माया बॅनर्जींनी सांगितलं.

दुसरीकडे बँकही ठेवीदारांना हाच दिलासा द्यायचा प्रयत्न करतीये. बँकेचे कार्यकारी संचालक जॉय थॉमस यांचा संदेश प्रत्येक ठेवीदाराला पाठवण्यात आला. "बँकेचा कार्यकारी संचालक म्हणून मी याची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. पण ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. सहा महिने पूर्ण होण्याच्या आतच त्रुटी भरून काढण्यात येतील."
पीएमसीमधून व्यवहार करता येणार नसल्याने ग्राहकांना इतरही अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. ज्यांचे गृहकर्जाचे वा गुंतवणुकीचे हफ्ते या बँक खात्यातून जात होते, त्यांना आता ते दुसऱ्या बँकेकडे वळवावे लागतील. शिवाय कोणत्याही प्रकारच्या सेवांची बिलंही या खात्यातून थेट वळती करता येणार नसल्याने (ECS - Electronic Clearing Service) आता पीएमसीच्या ग्राहकांना या सेवाही दुसऱ्या खात्यांकडे वळवाव्या लागतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









