हिंदू, शीख, बुद्ध, जैनांना NRCमुळे देश सोडावा लागणार नाही: अमित शहा #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1.हिंदू, जैन, शीख, बौद्धांनीNRCला घाबरू नये -अमित शहा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष NRCसंदर्भात जनतेची दिशाभूल करत आहे. मी सर्व हिंदू, बुद्ध, शीख, जैन स्थलांतरितांना हमी देतो की तुम्हाला देश सोडून जावं लागणार नाही. नागरिकत्व विधेयक संमत करण्यात येईल, त्यानुसार भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. मात्र घुसखोरांची गय केली जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं.

NRCसंदर्भात एका सेमिनारमध्ये ते बोलत होते. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. "श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच आज पश्चिम बंगाल भारतीय प्रजासत्ताकाचा भाग आहे," असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, शहा यांच्या वक्तव्यावरून असउद्दीन ओवेसी यांनी शहा यांच्यावर टीका केली आहे. केवळ मुस्लिमांनाच या देशात स्थान मिळणार नाही असा शहा यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो. तुम्हाला मुस्लिमांची अलर्जी आहे. मात्र संविधान सगळ्यांना समान मानतं. धार्मिक आधारे नागरिकत्व हे बेकायदेशीर आहे आणि ते टिकणार नाही असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

2. अॅट्रॉसिटी कायदा शिथिल करणारा नियम मागे

अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील अटक व जामिनासंबंधीच्या कडक तरतूदी शिथिल करण्याचे आदेश देऊन व अधिकारांची मर्यादा ओलांडून आम्ही संसदेच्या अधिकाराचा अधिक्षेप केला अशी कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आधीचा निकाल मागे घेतला. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना ताठ मानेनं जगणं कठीण जात असल्याने अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे असंही नमूद करण्यात आलं.

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात कार्यरत डॉ. सुभाष काशिनाथ महाजन यांच्या अपिलावर गेल्या वर्षी 20 मार्च रोजी न्या. आदर्श कुमार गोयल आणि न्या. उदय उमेश लळित यांच्या खंडपीठाने अट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याचे निर्देश दिले होते. त्याविरुद्ध देशभरात काहूर माजल्यानंतर केंद्राने हा निकाल निष्प्रभ करणारी कायदा दुरुस्ती केली.

3. शरद पवार, अजित पवार हे 'ठग्ज ऑफ ठेवीदार' - आशिष शेलार

"शरद पवार, अजित पवार हे ठग्ज ऑफ ठेवीदार आहेत. लाखो ठेवीदारांचे कोट्यवधी बुडवणाऱ्यांना काय म्हणणार? जिल्हा बँकेला डुबवणाऱ्यांना काय म्हणणार? शेतकरी, कष्टकरी यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणणार? कारवाई होऊ लागली की रडारड करणाऱ्यांना काय म्हणणार? ठग्ज ऑफ ठेवीदार शिवाय दुसरा पुरस्कार काय देणार?" अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी पवार कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

शिखर बँकप्रकरणी EDने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अजित पवारांचंही नाव आहे. सरकार सूडबुद्धीने काम करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता.

दरम्यान, देशाच्या समोरचे महत्त्वाचे प्रश्न मांडायला कोणी तयार नाही. 370 कलम, काश्मीरमध्ये काय केलं, या सगळ्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून भावनेला हात घालत आहेत. देशभक्तीच्या नावाखाली लोकांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हायला नको असं पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी पवार बोलत होते.

"अधिक हातांना काम देण्यासाठी नवीन धोरणं आखली पाहिजेत. परंतु हे सरकार धोरणही ठरवत नाही. शेतकरी, शिक्षित तरुणांना न्याय नाही मग हे सरकार कुणासाठी चालवता," असा सवाल पवार यांनी केला.

4. इतिहासाचे दाखले देत छाती बडवून घेणं दुबळेपणाचे लक्षण- रघुराम राजन

"इतिहासातील घटनांबद्दल वाढवून चढवून सांगणे धोकादायक आहे. इतिहासाची माहिती असणे चांगले मात्र इतिहासाचे दाखले देऊन छाती बडवून घेणं, मोठेपणा सांगणं यामधून असुरक्षितता दिसून येते. याचा देशावरही वाईट परिणाम होतो," असं रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. 'नेटवर्क18'ने बातमी दिली आहे.

"मतभेद दडपल्याने वाईट धोरणं योग्य ठरत नाहीत. एखादं सरकार जनतेकडून होणारी टीका तर त्यांच्यावर होणारी टीका ही त्यांची निंदा समजेल तर ते चुकीचं आहे. सरकारची कायम स्तुती करण्यात येऊ लागली तर सरकार आत्मकेंद्रित होतं. विचारांवर कुणाचीच मक्तेदारी असू नये," असंही राजन यांनी लिहिलं आहे.

5. भारतीय बँकिंग व्यवस्था स्थिर - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

भारतीय बँकिंग व्यवस्था ही स्थिर आणि सुरक्षित असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे. एका पत्रकाद्वारे रिझर्व्ह बँकेने हा खुलासा केला आहे. 'द हिंदू'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर आणण्यात आलेल्या निर्बंधांनंतर खातेदारांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं. त्यापाठोपाठ लक्ष्मी विलास बँकेवरही अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात आली.

काही बँकांबाबत अफवा पसरत आहेत. मात्र भारतीय बँकिंग सुरक्षित आणि स्थिर असल्याचं आम्हाला जनतेला सांगायचं आहे असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)