चांद्रयान 2: 'विक्रम'चा संपर्क तुटला, इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देण्याचा देशभरातून प्रयत्न

भारताच्या 'चांद्रयान 2'चं मून लँडर 'विक्रम'चा संपर्क तुटल्याची घोषणा इस्रोनं रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास केली.

"विक्रम लॅंडर नियोजित मार्गावरून उतरत होतं. चंद्रभूमीपासून 2.1 किमी दूर असेपर्यंत सर्व सामान्य होतं. त्यानंतर लॅंडरचा ग्राऊंड स्टेशनशी संपर्क तुटला. आम्ही आकड्यांचा आभ्यास करत आहोत," असं इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी सांगितलं.

या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले, "देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या प्रयत्नांमुळेच देश पुन्हा एकदा आनंद व्यक्त करेल."

"इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कामाबद्दल बांधिलकी आणि धैर्य दाखवून दिलंय. देशाला तुमचा अभिमान आहे. आणखी चांगलं घडण्याची आशा व्यक्त करूया," असं भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देताना ट्वीट केलं - "चांद्रयान-2 मोहिमेत तुम्ही केलेलं काम मोठं आहे. तुमचं समर्पण भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही. तुम्ही भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांचा पाया रचलाय."

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्रोच्या मेहनतीला दाद देत अभिमान व्यक्त केला. शिवाय, या क्षणी इस्रोला धीर देणाऱ्या नरेंद्र मोदी यांचेही फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांचा अभिमान असल्याचं ट्विटरवरून सांगितलं. "निराश होण्याची गरज नाही. आपल्या शास्त्रज्ञांनी मोठं काम केलंय. इतिहास रचलाय. आम्हाला शास्त्रज्ञांचा अभिमान आहे."

फेसबुक, ट्विटरसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारताच्या 'चांद्रयान 2' मोहिमेची चर्चा होताना दिसली.

#ProudOfISRO, #VikramLander, #ISRO हे हॅशटॅग आणि Orbiter, Scientists, Mission असे शब्द अनेक तास ट्रेण्डिंग पाहायला मिळाले. हजारो युजर्सनी विक्र मून लँडरसंदर्भात आपापली मतं व्यक्त केली.

विक्रम मून लँडरचा संपर्क तुटल्यानंतर अनेकांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी इस्रोला उद्देशून ट्वीट केलंय.

चांद्रयान 2 चं मून लँडर पूर्णपणे अपयशी झालं नाही, असं म्हणत टनासा स्पेस फ्लाईट' या संकेतस्थळाचे व्यवस्थापकीय संपादक ख्रिस जी यांनी इस्रोला धीर दिलाय.

ट्विटर, फेसबुकवरून अनेक भारतीयांनी इस्रोचं मनौधैर्य वाढवण्याचे प्रयत्न केलेत.

श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून 22 जुलै रोजी 'चांद्रयान 2' चंद्राच्या दिशेनं झेपावलं होतं. पाहा या मोहिमेचे सर्व ताजे अपडेट्स इथे -.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)