मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ-नारायण मूर्ती #5 मोठ्या बातम्या

मोदी, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ- नारायण मूर्ती

मागील 300 वर्षातील देशाच्या अर्थव्यवस्थेतील हा सर्वोत्तम काळ आहे. पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे.

या परिस्थितीत देशातील गरिबी दूर करण्याची संधी आहे. प्रत्येक भारतीयासाठी उत्तम भविष्यकाळ निर्माण करण्याची संधी सध्याच्या अर्थव्यवस्थेत आहे असं मत इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं.

गोरखपूर इथल्या मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

भारताची अर्थव्यवस्था 6 ते 7 टक्के विकासदराने विस्तारते आहे. भारत हा जगाचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केंद्र झाला आहे. परकीय गंगाजळी 400 अब्ज डॉलरच्या वर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास ऐतिहासिक स्वरुपाचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

2. मंदी आणि बेरोजगारीचं मूळ नोटाबंदीच्या निर्णयात-उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

नोटबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली आहे. मंदी आणि बेरोजगाराचं मूळ नोटबंदीच्या निर्णयात आहे. कोणीतरी खात आहे आणि खाणाऱ्यांना सरकारी पातळीवर पाठबळ मिळत आहे.

पैशांचा काळाबाजार आणि भ्रष्टाचार हा सहमतीने होत असतो. लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर आहे. या संस्थेनं नोटबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड केली आहेत.

नोटबंदीनंतरचा भ्रष्टाचार म्हणजे गेल्या साडेतीन वर्षातला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरं झालं असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'सामना'च्या संपादकीयमधून नोटबंदी निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे.

3. कोहिनूर खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा आला कुठून?-चंद्रकातदादा पाटील

लोकसभा निवडणुकीत भाजपवर टीका केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ईडीची कारवाई झाली असं म्हणणं चुकीचं आहे. कोहिनूर मिल खरेदी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचा विचार सर्वांनी करायला हवा, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात बोलत होते.

'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

मनसे, राज ठाकरे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

विरोधक आपल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतात. परंतु बूथ पातळीवर चांगली बांधणी केल्याने भाजपला यश मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं.

4. देशात आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती-सुप्रिया सुळे

"जम्मू काश्मीरमध्ये बदल करायचे असतील तर जरूर करा, तो अधिकार सरकार म्हणून तुम्हाला आहे. मात्र हे सर्वांना विश्वासात घेऊन करायला हवं. कुणाला अटक करून, डांबून ठेऊन नव्हे असं सांगत भाजप सरकारमुळे देशात अघोषित आणीबाणीपेक्षासुद्धा वाईट स्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकार हकूमशाहीप्रमाणे वागत आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सळे यांनी केला.

महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुप्रिया सुळे

जम्मू काश्मीरमधली परिस्थिती वाईट आहे. नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. मागील आठवड्यापासून फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे चिंता वाढली असल्याचं त्यांनी सांगितलंय

संवाद यात्रेच्या निमित्ताने सुळे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

5. बॅडमिंटन: पी.व्ही.सिंधू जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार?

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने बेसेल, स्वित्झर्लंड इथं सुरू असलेल्या सलग तिसऱ्यांदा जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

सेमी फायनलच्या लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेन यू फेईवर 21-7, 21-14 असा विजय मिळवला. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

सिंधू, बॅडमिंटन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पी.व्ही.सिंधू

सिंधूच्या नावावर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य तर दोन रौप्यपदकं आहेत. पदकाचा रंग बदलण्याची संधी सिंधूला मिळणार आहे. अंतिम लढतीत सिंधूसमोर नोझोमी ओखुहाराचे आव्हान असणार आहे.

पुरुषांच्या लढतीत बी.साईप्रणीतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. केंटो मोमोटाने साईप्रणीतवर 21-13, 21-8 असा विजय मिळवला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)